नाशिक : गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले दादांच्या ब्रॅण्डिंगचे रंग उसळले;… पण त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले!! Pink colour branding of ajit pawar’s NCP
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये येऊन 11 महिने उलटल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगला परफॉर्मन्स दाखवत आला नाही. अजितदादांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीतून निवडून आणता आले नाही, तरी देखील त्यातून खचून न जाता अजितदादांनी सुनेत्रा पवारांची वर्णी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर लावून घेतली. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र आणि वेगळे ब्रॅण्डिंग सुरू केले आहे. या ब्रँडिंग मधूनच अजितदादांच्या अंगावर गुलाबी जॅकेट दिसले. बारामतीत गुलाबी मंडप दिसला आणि गुलाबी पोस्टरनी तो सजवला होता.
अजितदादांच्या राष्ट्रवादीने दिल्लीतल्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला ब्रँडिंगचे काम दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. या ब्रँडिंग मधूनच ते आपल्या पक्षाचे सॉफ्ट हिंदुत्व जनतेच्या विशेषतः महिलांच्या मनामध्ये ठसविण्याचे काम करत आहेत. अजितदादा आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले. त्यानंतर बारामतीतल्या मेळाव्यात सगळीकडे गुलाबी रंग दिसले अजितदादांनी म्हणे तातडीने 12 गुलाबी जॅकेट शिवून घेतली. आता इथून पुढे ते गुलाबी जॅकेट मध्येच सार्वजनिक कार्यक्रमात वावरणार असल्याचे सांगितले जात आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी जाहीर केल्या. त्यातली लाडकी बहीण योजना क्लिक झाली या योजनेचे जनक अर्थमंत्री म्हणून आपणच असल्याचे महाराष्ट्रातल्या बहिणींच्या मनावर ठसविण्याचे काम गुलाबी जॅकेट मार्फत करण्याचा अजितदादांचा इरादा असल्याचे बोलले जात आहे.
ज्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ब्रँडिंगचे काम दिले आहे, त्या कंपनीने आधी राजस्थान अशोक गहलोत आणि कर्नाटका डी. के. शिवकुमार यांच्यासाठी काम केल्याचे सांगितले जाते.
पण हा झाला अजितदादांच्या ब्रँडिंगचा आणि नरेश अरोरांच्या कंपनीचा पॉझिटिव्ह भाग. पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांना कंपनीने जो गुलाबी रंग सुचवला आहे, त्या गुलाबी रंगाचे राजकारणाशी त्या पलीकडे देखील संबंध आहेत. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंना गुलाब आवडायचा म्हणून ते त्यांच्या शेरवानीवर नेहमी गुलाब लावायचे. त्याचे अनुकरण तत्कालीन बाकीच्या नेत्यांनी केले होते. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे देखील शेरवानीवर गुलाब लावायचे.
त्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये गुलाबी रंगाचे ब्रँडिंग तेलंगण मधील सुरुवातीची तेलंगण राष्ट्र समिती आणि आत्ताची भारत राष्ट्र समिती या पक्षाने केले. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 10 वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यावेळी ते गुलाबी उपरणे अंगावर बाळगत असत. त्यांचा पक्षाचे पक्षाचा अधिकृत रंग देखील गुलाबी आहे पण या गुलाबी रंगाच्या ब्रँडिंगचा तेलंगणाच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांना फायदा झाला नाही काँग्रेसने तिथे त्यांचा दणकून पराभव केला.
आता नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गुलाबी रंगातूनच ब्रॅण्डिंग करायला सांगितले आहे. हा गुलाबी रंग महाराष्ट्रातल्या मतदारांना भावेल का आणि अजितदादांचा राजकीय गुलाब महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात फुलेल का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Pink colour branding of ajit pawar’s NCP
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!!