नाशिक : मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कोणाचीही हिंमतच होईना!! अशी महाराष्ट्रातल्या राजकारणाची स्थिती झाली आहे. No party dare to announce chief ministerial candidate
भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल, तर आमच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी करून मनातल्या मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेला नव्याने चालना दिली. वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशा अटकळी सर्वांनीच बांधल्या होत्या. परंतु, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगळाच डाव टाकत त्यावेळी कोणाच्याच मनात नसलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात सगळ्यांना धक्का दिला होता.
बाकी मनातल्या मनात मुख्यमंत्रीपदाचे मांडे खाणारे अनेक नेते महाराष्ट्रात आज विद्यमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीत तर या मनातल्या मुख्यमंत्र्यांची “भाऊ गर्दी” आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती राजकीय कर्तृत्वात अतिशय तोकडी आहे, पण महत्त्वाकांक्षेत मात्र सगळ्यांचे घोडे पुढे धावतात, अशी अवस्था आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाच्या प्रवृत्तीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे यांची नावे त्यांचे समर्थक नियमितपणे “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर वर चढवत असतात. रस्त्या रस्त्यांवर मोठमोठे फ्लेक्स लावतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात पण वाढदिवस संपला की ते मोठे फ्लेक्स भावी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षांसह गुंडाळून ठेवावे लागतात.
राष्ट्रवादीतली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाल्याचे पाहूनच अखेर स्वतः शरद पवारांना आमच्या पक्षातून मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचेही नाव नाही, असे जाहीर करावे लागले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होईल, हे संख्याबळावर ठरेल, पण आमच्या पक्षातून कोणाचे नाव सध्या तरी नाही, असे पवार म्हणाले. पवारांना देखील मनातल्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा उच्चार करणे अवघड गेले.
काँग्रेसमध्ये नाना पटोले समर्थकांनी त्यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून भल्या मोठ्या लाडू वर लिहिले. त्यांची लाडू तुला केली. पुण्यातल्या कार्यक्रमात तर भावी मुख्यमंत्री म्हणून नानांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतले. पण काँग्रेसमध्येच पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे नेते नानांना सीनियर असल्याने मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आपोआपच त्यांचे नाव आले, पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्याची प्रथा परंपरा नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून काँग्रेसमधल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांच्या इच्छांवर तर बोळा फिरवलाच, पण त्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आधी जाहीर करा असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या इच्छेवरही बोळा फिरवला. 11 कोटी जनतेच्या मनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, असे संजय राऊत म्हणाले. पण त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना काही फरक पडला नाही. त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही.
महायुतीत अजितदादांना घेतल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षांचे धागेदोरे दिल्लीतल्या नेत्यांच्या हातात आले. ते जरी अधून मधून मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा बोलून राहिले, तरी त्या पूर्ण करायच्या की नाही हे त्यांच्या कर्तृत्वापेक्षा दिल्लीतल्या नेत्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, हे उघड गुपित आता महाराष्ट्रात तरी सर्वमान्य झाले आहे.
मध्यंतरी भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत अशा भावना बोलून दाखविल्या होत्या. परंतु, त्या पलीकडे त्यांनी फारशा कुठल्या हालचाली केल्याचे दिसले नाही. कारण त्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षात तशी राजकीय पद्धत नाही.
एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली नाही. कारण आपले मुख्यमंत्रीपद हे दिल्लीच्या नेत्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. याची राजकीय आणि मानसिक अशी दोन्ही जाणीव या दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, एवढ्याच मर्यादेपर्यंत हे दोन्ही नेते बोलत आहेत. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार याविषयी दोघांचे हात वर आणि तोंडे बंद आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीन मोठे घटक पक्ष आणि महायुती तीन मोठे घटक पक्ष अशी सहा पक्षांची कुस्ती रंगणार असल्याने महाराष्ट्राची राजकीय स्थिती अशी विचित्र झाली आहे, की “मनातले मुख्यमंत्री” अनेक तयार झाले आहेत. पण त्यांची नावे जाहीर करण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण तसे कुणाचे नाव जाहीर केले, तर त्याला विरोध करणारे एकत्र येऊन त्याच्यावर तुटून पडतील ही भीती सर्वांना वाटत आहे.
No party dare to announce chief ministerial candidate
महत्वाच्या बातम्या
- Arvind Kejriwals : ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
- Prashant Kishore : प्रशांत किशोर यांनी घेतली शपथ, म्हणाले ‘सत्तेवर येताच हे निर्बंध….’
- Tejas Mark-2 : हवाई दलाला मिळणार नवी ताकद! 2025 मध्ये तेजस मार्क-2 घेऊ शकते पहिले उड्डाण
- Kejriwal & Thackeray : मोदींची तिसऱ्या टर्मची सत्ता उद्ध्वस्त करण्याचे पाहिले स्वप्न; पण दोन मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला लागला सुरुंग!!