विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील कार्यालय म्हणजे मोतीबाग. हे मोतीबाग कार्यालय नव्या, भव्य रूपात लवकरच साकारणार आहे. त्या निमित्ताने मोतीबागेशी संबंधित काही आठवणींची पुन्हा एकदा उजळणी झाली. Motibaugh : nostalgic memories of growing RSS
मोतीबाग हे संघाचे कार्यालय होण्याआधी संघाची दोन कार्यालये पुण्यात होती. एक गोष्ट नक्की आहे की, सार्वजनिक किंवा सामाजिक काम करणार्या कोणत्याही संस्थेची कार्यालय ही आवश्यक गरज आहे. संघाचे काम तर लोकांशी निगडित असे काम आहे. ज्याच्यात कार्यकर्ते एकत्र येणे, बैठका, परस्परांच्या गाठी-भेटी या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. संघाच्या कार्यपद्धतीमध्येही सुरुवातीला कार्यालय ही रचना नव्हती; पण जशा शाखा वाढत गेल्या, संघाचे काम वाढत गेले, काम मोठे होत गेले तसतशी कार्यालयांची आवश्यकता निर्माण झाली. प्रचारकांच्या निवासाचीही व्यवस्था करणे आवश्यक होते. सुरुवातीला कार्यकर्त्यांची घरे हीच कार्यालये होती. त्यानंतर थोडी छोटी, मग नंतर थोडी मोठी जागा घेऊन, मग स्वतःची जागा घेऊन अशी कार्यालयांची पूर्तता झाल्याचे सर्वसाधारणपणे दिसते.
पुण्यात संघाचे काम १९३३ साली सुरू झाले. सध्याचे टिळक स्मारक मंदिर जेथे आहे, तेथे संघाची पहिली शाखा लागली. त्याच्या आधी दोन-तीन वर्षे संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे पुण्यात येणे-जाणे झाले होते. जुन्या काळची माहिती असलेली कार्यालये म्हणजे विनायकराव आपटे जेथे राहायचे तेथील राम मंदिरात संघाचे कार्यालय होते. हे कार्यालय म्हणजे एक कपाट होते. त्याच्यावर निरोप-सूचना यांचे कागद लावलेले असायचे. तेव्हा तेच शहराचे कार्यालय समजले जायचे. दुसरे होते ते भांडार कार्यालय म्हणून ओळखले जायचे. स्काऊट ग्राउंडच्या समोर जेथे उद्यान प्रसाद कार्यालय आहे, ते व्हायच्या आधी त्या ठिकाणी एक तीन मजली इमारत होती. त्या इमारतीचे नाव होते, किकाभाई बिल्डिंग. संघाचा गणवेश आणि इतर साहित्य तेथे मिळायचे. संघ शिक्षा वर्गाला आलेल्या स्वयंसेवकांचा निवास शाळांमध्ये असायचा आणि बौद्धिक वर्ग या बिल्डिंगमध्ये व्हायचा.
सरदार बिवलकरांची जागा
पुण्यात जशी शाखांची संख्या वाढू लागली, तशी मोठ्या कार्यालयाची आवश्यकता निर्माण झाली. सरदार बिवलकरांना समजले की संघाला कार्यालयाची गरज आहे. तेव्हा ते आपणहून संघाच्या अधिकार्यांना भेटले आणि त्यांनी त्यांची जागा कमी किमतीत देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार १९५२ मध्ये जी जागा संघाने घेतली तीच ही मोतीबाग. सुरुवातीला बाबाराव भिडे यांच्या नावावर ही जागा घेतली गेली. कार्यालयाला अनेक अर्थांनी उपयुक्त अशी ही जागा होती. मैदान तर होतेच, शिवाय जुन्या काळच्या वाड्यांना जसे दिंडी दरवाजे असायचे तसा मोठा दरवाजाही होता. जाड लाकडाचा. आता आल्यावर डावीकडे तीन मजली इमारत होती. जुन्या काळची बांधणी असलेली आणि लाकूडकाम भरपूर असलेली अशी ही सुरेख इमारत होती. जिन्यांचे कठडे लाकडी होते. लाकडी गॅलरी होती. अतिशय उत्तम दर्जाचा कोबा खोल्यांमध्ये होता. टाईल्सहून उत्तम असा तो कोबा होता. त्या इमारतीला दोन दरवाजे होते. समोर कोपर्यात एक गॅरेज आणि दोन-तीन बैठ्या खोल्या होत्या. पूर्वेलाही तीन-चार बैठ्या खोल्या होत्या. मोतीबाग घेतल्यानंतर हळूहळू कार्यकर्त्यांचे येणे वाढले. नंतर प्रचारकांचा निवास सुरू झाला. त्यानेही वापर वाढला.
पहिले दोन सवाई गंधर्व महोत्सव
काही ऐतिहासिक क्षणांची आणि प्रसंगांची तसेच समाजात ज्या गोष्टी त्या काळात घडल्या, त्याची देखील मोतीबाग साक्षीदार आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी त्यांचे संगीतातील गुरु रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ १९५२ साली ‘सवाई गंधर्व महोत्सवा’चा प्रारंभ केला. या महोत्सवाची कीर्ती आज देशातच नाही, तर परदेशातही पोहोचली आहे. मोतीबाग ज्यावर्षी संघाने घेतली, त्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी अशी दोन वर्षे हा महोत्सव मोतीबागेच्याच मैदानावर झाला होता. आलेल्या श्रोत्यांची मैदानावर सतरंज्या अंथरून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
गोवा – दादरा नगर हवेली मुक्ती
गोवा आणि दादरा नगर हवेलीचा जो मुक्ती संग्राम झाला, त्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी ज्या तुकड्या पुण्यातून गेल्या, त्यांचे एकत्रीकरणही आधी मोतीबागेत झाले होते आणि तेथून त्यांना निरोप देण्यात आला होता. तेव्हाचे माननीय शहर संघचालक विनायकराव आपटे यांचे भाषण त्या तुकडीसमोर व्हायचे आणि मग ती तुकडी गोव्याकडे कूच करायची. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या अनेक मोठ्या सभा पुण्यात झाल्या, त्या सभांचे वक्ते भाषणापूर्वी मोतीबागेत येत असत. तेथून ते भाषणाला जात. त्यातील काही जण निवासालाही मोतीबागेत यायचे.
पानशेतचा प्रलय
१९६१ च्या पानशेत प्रलयाने पुण्यात मोठे नुकसान झाले. तेव्हा मोतीबागेच्याही पहिल्या मजल्यावर कमरेइतके पाणी होेते आणि सर्व साहित्य चिखलात मिसळून वाया गेले होते. नंतर संघाचे मदतकार्य सुरू झाले. पूरग्रस्तांना मदतीसाठी जाणारे स्वयंसेवक आधी मोतीबागेत यायचे. तेथून त्यांना आवश्यक ठिकाणी पाठवले जायचे. संघावर विश्वास दाखवून अनेक नागरिकांनी मदत म्हणून संघाकडे दिलेल्या सतरंज्या, धान्य याचे वाटप केंद्रही मोतीबागेतून चालविण्यात आले होते.
नवे बांधकाम आणि विस्तार
संघाने १९५२ मध्ये ही वास्तू घेतली. सुरुवातीला जागा भरपूर आणि तुलनेने राहणारी माणसे कमी होती. कामही कमी होते. संघाचे काम वाढत गेले, तसतशी ही जागा कमी पडत गेली. काळाप्रमाणे कार्यालयासाठी टिकाऊ इमारत हवी होती. बौद्धिकवर्ग, एकत्रीकरण यासाठी सभागृहाची आवश्यकता होती. स्वयंपाक एका खोलीत केला जायचा. मात्र स्वयंपाकासाठीही आवश्यक सोयी-सुविधा हव्या होत्या. त्यानुसार १९६२ साली नव्याने काही बांधकाम करण्यात आले. हा बांधकामाचा पहिला टप्पा. मा. बाळासाहेब दीक्षित तेव्हा संघचालक होते. त्यांची दीक्षित-आपटे ही कंपनी होती. त्यांनीच नागपूरचे स्मृतिमंदिर बांधले होते. या क्षेत्रातील ते जाणकार होते. या नव्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर दीक्षित होते आणि वास्तुरचनाकार होते शरदभाऊ साठे. अनेक अवजड गोष्टी आणि हिवाळी शिबिराचे साहित्य, तसेच वीज विभागाचे साहित्य ठेवण्यासाठी मोठे तळघर, त्यावर एक सभागृह म्हणजे ‘मोरोपंत पिंगळे सभागृह’, अन्नपूर्णा, त्यावर एक हॉल आणि एक खोली एवढे बांधकाम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. अत्यंत दर्जेदार असे हे काम झाले. भरपूर हवा, प्रकाश टाईल्स, सर्व आवश्यकतांचा विचार असे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.
तळजाई शिबिर
१९८३ मध्ये तळजाई शिबिर झाले आणि नंतर मोतीबागेचे दुसर्या टप्प्यातील बांधकाम झाले. एक छोटी इमारत त्यावेळी बांधण्यात आली. तसेच मूळ इमारतीवर एक मजला वाढवून तेथे ‘माधव सभागृह’ बांधण्यात आले. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अप्पासाहेब वज्रम होते आणि वास्तुविशारद म्हणून शरदभाऊ साठे यांनीच काम केले होते. बांधकामाचा जो तिसरा टप्पा झाला, अलिकडच्या काळात त्याचे प्रमोद उर्फ राजन गोरे हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आणि कैलास सोनटक्के वास्तुविशारद होते. दरवाजातून आत आल्यानंतर पूर्वी समोर काही खोल्या होत्या. गॅरेज होते. ते पाडून ही नवी इमारत सन २००३ मध्ये उभी करण्यात आली. तळ मजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर प्रांताच्या अधिकार्यांची, दुसर्या मजल्यावर केंद्राच्या अधिकार्यांची निवास व्यवस्था आणि वरती एक सभागृह बांधण्यात आले. त्याला ‘रज्जूभय्या सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच माधव सभागृहाच्यावर एक सभागृह बांधण्यात आले, ते ‘केशव सभागृह’. मोठ्या बैठका, कार्यक्रमांसाठी वगैरे आधुनिक ध्वनी-प्रकाश तंत्राचा विचार करून सुव्यवस्थित अशा पद्धतीने हे सभागृह करण्यात आले आहे. अशा तीन टप्प्यांमध्ये ही बांधकामे झाली.
मंगल कार्यालय
मोतीबागेच्या उभारणीत अगदी पहिल्यापासून प्रत्येक स्वयंसेवकाचे चांगले योगदान राहिले आहे. सरदार बिवलकर यांच्याकडून ही वास्तू संघाने जेव्हा विकत घेतली तेव्हाची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपासची होती. पण तेवढेही पैसे एकरकमी देणे शक्य नव्हते. त्यामुळे जमतील तसे पैसे द्यायला सुरुवात झाली. पैशांची ही गरज लक्षात घेऊन तेव्हाचे एक कार्यकर्ते बाबा सरदेशपांडे यांनी मोतीबागेच्या जागेत मंगल कार्यालय सुरू केले. हेतू हा की, त्यातून काही पैसे मिळतील. त्या मंगल कार्यालयाची सर्व व्यवस्था बाबा पाहात असत. लग्न असले की, जमिनीवर चटया, पाट मांडून जेवणाच्या पंगती होत. बाबांनी भारत दुग्धालय या नावाने दुग्धालय देखील सुरू केले. काही दिवस मोतीबागेत मेसही चालवली गेली. नोकरी करून राहणार्यांसाठी आणि महाविद्यालयांमध्ये शिकणार्यांसाठी ही मेस होती. मोतीबागे जे विविध उपक्रम झाले त्याचे असे हे वेगवेगळे टप्पे आहेत.
मोतीबाग हे कार्यालय स्वयंसेवकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरते, हे जितके महत्त्वाचे, तितकेच हे कार्यालय सर्वांना आपले वाटते, हेही महत्त्वाचे.
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. श्रीधरपंत फडके यांनी सांगितलेल्या आठवणींचे शब्दांकन.)