नाशिक : विदर्भातल्या काँग्रेसच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली हॅट मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत टाकल्याबरोबर महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे कान उभे राहिले. शरद पवारांपासून संजय राऊत या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महायुतीत नानांच्या हॅट मुळे काही चलबिचल निर्माण झाली नाही, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र पुरती खळबळ माजल्याचे त्यामुळे दिसून आले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या भोवती ठेवण्याचा ठाकरे + पवारांचा “डाव” असताना काँग्रेस मधून नानांचे नाव समोर आले, त्याला विदर्भातून आमदारांचे पाठबळ मिळाले, त्यामुळे पवार आणि ठाकरे दोघेही अस्वस्थ झाले. नानांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लॉबिंग बद्दल ठाकरे + पवार काही निर्णय घेऊ शकणार नाहीत. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काँग्रेस हायकमांडच घेईल. ठाकरे + पवार त्यामध्ये फार तर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतील. त्यापलीकडे ठाकरे पवारांचा त्यामध्ये काही “रोल” असण्याची किंवा तसा “रोल” ठेवून देण्याची काँग्रेस काँग्रेस हायकमांडची शक्यता नाही. याचाच अंदाज आल्यामुळे पवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये आपला नेता राज्यकर्ता व्हावा, असे कुणाला वाटत असेल तर त्या चूक काही नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत यांनी मुंबईत त्याची री ओढली, पण नानांच्या नावाला अप्रत्यक्षपणे त्यांनी विरोध करून बघितला. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नंतरच ठरवायचा आहे, पण काँग्रेस हायकमांड जर नाव जाहीर करणार असेल, तर आम्ही स्वागतच करू, असा टोमणा संजय राऊत यांनी मारला.
मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत गैर काही नाही. कोणालाही मुख्यमंत्रीपद मिळावेसे वाटू शकते, पण मुख्यमंत्रीपद नंतरच ठरणार आहे. ते महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून ठरवतील, अशी एका वाक्यातली प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. या सगळ्या चर्चेतून उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे नाव एका झटक्यात मागे पडले आणि नानांचे नाव पुढे सरकले. त्यामुळेच पवार आणि ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
खरं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत “चूक” काहीच नाही, असे सगळेच नेते बोलत राहतात. त्यात महायुतीतले एकनाथ, शिंदे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाही अपवाद नाहीत, पण यापैकी कुठलेही नेते मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नेमके “बरोबर” “कोण” “कसे”??, हे मात्र सांगायला तयार होत नाहीत. किंबहुना ते सांगायला बिचकतात. यातच खरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची “गोम” दडली आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला कुठलाच नेता ठरवत नाही, याला अपवाद असलास, तर तो बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्यांनी मनोहर जोशी आणि नारायण राणेंना मुख्यमंत्री करून दाखवले होते, पण काँग्रेसी विचारसरणीच्या कुठल्याही नेत्याची ती क्षमताच नाही, की जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईत बसून ठरवेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजप किंवा काँग्रेस यांची हायकमांडच ठरवतात आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारत पक्ष स्थापन करणारे तो मुख्यमंत्री मुकाट मान्य करतात, हा आतापर्यंतचा इतिहास विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांनिशी सिद्ध झाला आहे.
2024 नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील यात फारसा बदल घडण्याची शक्यता नाही. अगदी उद्धव ठाकरे यांना स्वतःला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, रश्मी ठाकरे यांना त्या पदावर बसवायचे असेल, पवारांना आपल्या मनातली पहिली महिला मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायची असेल, किंवा अगदी नाना पटोले, बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तरीही काँग्रेस हायकमांडचीच त्यासाठी अनुमती लागेल. काँग्रेस हायकमांडच्या अनुमती शिवाय यातले कुणीही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकणार नाही. पण मोदी – शाह त्यावेळी “शांत” बसून राहतील, अशीही शक्यता नाही, मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, जे काही करायचे ते दिल्लीच करेल आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाच्या गप्पिष्टांना ते मान्यच करावे लागेल!!
Maharashtra chief minister will be decided in “Delhi” and not in “Mumbai”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : देशाचे पॉवर हाऊस होण्याची महाराष्ट्रात ताकद; मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास
- Gas explosion : कोळसा खाणीत गॅसचा स्फोट; 28 कामगार ठार, 17 हून अधिक जखमी
- Awadhesh Prasads : अयोध्येतून मोठी बातमी, सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या मुलाविरोधात गंभीर गुन्हे दाखल
- Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे म्हणाले- जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ, काँग्रेस जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेल