लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘रीनेइसन्स् स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात कुबेर यांनी मांडलेली मतं वादग्रस्त ठरली आहेत. कुबेरांनी संभाजी महाराजांमबद्दल केलेल्या उल्लेखांना कोणाताही ऐतिहासिक आधार नाही. कुबेरांनी संभाजी महाराजांचे केलेले मूल्यपापन सत्यावर आधारीत नाही. त्यामुळे कुबेरांनी या संदर्भात तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे तसेच प्रकाशकांनी हे पुस्तक देखील मागे घेतले पाहिजे अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. केदार फाळके या इतिहास अभ्यासकांनी कुबेर यांचे दावे खोडून काढणारे साधार लेखन सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. ‘द फोकस’च्या वाचकांसाठी डॉ. केदार फाळके यांचा लेख जशाच्या तसा. Loksatta Editor Girish Kubera’s writings on Chhatrapati Sambhaji Maharaj are historically poor, Take back the book ‘Renaissance State – The Unwritten Story Of the Making of Maharashtra.’, Also Kuber should apologize to Maharashtra
लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रीनेइसन्स् स्टेट’ या ग्रंथातील एक पृष्ठ काही मित्रांनी मला पाठविले होते आणि त्या पृष्ठात जो मजकूर आहे त्याबद्दल माझी प्रतिक्रिया विचारली होती.
या ग्रंथात गिरीश कुबेर यांनी पृष्ठ क्र. ७६ वर संभाजी महाराजांवर टीका केली आहे. या छोट्याश्या लेखात त्या टिकेचे परीक्षण केले आहे. गिरीश कुबेर यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसाचा प्रश्न निर्माण झाला तो सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला.
त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि पुढे संभाजी महाराजांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
संभाजी महाराजांनी सोयराबाई राणीसाहेबांना ठार मारल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. राजाराम महाराजांना गादीवर बसविण्यामध्ये प्रामुख्याने आण्णाजी दत्तोंचा समावेश होता.
ते आणि मोरोपंत पिंगळे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्याकडे निघाले असताना वाटेतच हंबीरराव मोहिते यांनी या दोहोंना कैद केले. संभाजी महाराज रायगडास आल्यानंतर त्यांनी स्वतःचे मंचकारोहण करून घेतले.
यावेळी मोरोपंत पिंगळ्यांच्या घरावर चौक्या-पहारे बसविले होते. मोरोपंत पिंगळ्यांचा मंचकारोहणानंतर लगेचच मृत्यू झाला. मोरोपंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव निळोपंत यांना कैदेतून मुक्त करण्यात आले आणि त्यांची पेशवेपदी नियुक्ती करण्यात आली.
आण्णाजी दत्तोंनाही कैदेतून मुक्त करण्यात आले आणि मुजुमदार हे पद देण्यात आले. मे, १६८१ नंतर आण्णाजी दत्तोंनी पुन्हा दुसऱ्यांदा बंडखोर अकबराच्या सहाय्याने संभाजी महाराजांना कैद करण्याचे नियोजन केले. ही गोष्ट संभाजी महाराजांना कळताच त्यांनी कठोर पाऊल उचलत आण्णाजी दत्तोंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
पुढे संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी नेमलेले अष्टप्रधानच कायम राहिले. त्यामध्ये प्रामुख्याने हंबीरराव मोहिते, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, मोरेश्वर पंडितराव यांचा समावेश होता.
संभाजी महाराजांच्या राजकीय कारकीर्दीत अष्टप्रधानांच्या उपलब्ध झालेल्या पत्रांवरून अष्टप्रधानांनी किती महत्वपूर्ण विषय हाताळले आहेत याची कल्पना येते आणि अष्टप्रधान व संभाजी महाराज या दोहोंमध्ये असणारा ताळमेळ दिसून येतो.
येथे अजून एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे संभाजी महाराजांची राजकीय कारकीर्द एक-दोन वर्षांची नसून नऊ वर्षांची आहे. त्यामुळे गिरीश कुबेरांनी जे मत मांडले आहे; कर्तबगार मंडळी नाहीशी झाल्याने संभाजी महाराजांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली हे अर्थहीन ठरते.
गिरीश कुबेरांनी पुढे जाऊन असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत, मात्र संभाजी महाराजांच्या सैन्याने केले. या विधानास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
शिवाजी महाराजांनी सैन्याने कडक शिस्त पाळावी याकरिता चिपळूणाच्या छावणीस ९ एप्रिल १६७४ रोजी विस्तृत पत्र पाठविले होते. संभाजी महाराजांनी सैन्याने अशीच कडक शिस्त पाळावी याकरिता पाठविलेली दोन पत्रे उपलब्ध झाली आहेत.
त्यापैकी पहिले पत्र ६ नोव्हेंबर, १६८० या तारखेचे असून दुसरे पत्र ४ ऑगस्ट, १६८७ या तारखेचे आहे. या दोन पत्रांमधला कालावधी ध्यानात घेणे आवश्यक आहे. येथे विस्तारभयास्तव पत्रांमधला संपूर्ण मजकूर न देता दुसऱ्या पत्रातील एकच वाक्य देतो.
ते असे, ‘तुम्ही रहदारीस नाहक दरफ्ती करिता. मौजे मजकुरी उपद्रव देऊन धामधूमही करीता. रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता, म्हणोन कळो आले. तरी या गावी धामधूम कराया काय गरज.
हे ढंग स्वामीस कैसे मानो पाहातात. याउपरीही बदराहा वर्तणूक केलीया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्याला स्वामी जिवेच मारतील.’
शिवाजी महाराजांनी प्रजेची जशी पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतली आणि सरकारातून उदरनिर्वाह चालविण्यासाठी धान्य दिले त्याप्रमाणे संभाजी महाराजांनीही प्रजेला उदरनिर्वाहासाठी सरकारातून धान्य दिले. याची नोंद नीळकंठ पिंगळ्यांनी ३ जून, १६८४ रोजी पाठविलेल्या पत्रात मिळते. त्यांनी कोकणात प्रजेकरिता सागरगडाहून पन्नास खंडी धान्य दिले होते.
गिरीश कुबेरांनी अजून एक टीका करताना म्हटले आहे की, संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते. कागदपत्रांच्या कसोटीवर गिरीश कुबेरांचा हा मुद्दाही टिकत नाही.
आपण एकटे मुघलांविरोधी लढू शकत नाही याची शिवाजी महाराजांना जाणीव असल्याने त्यांनी कुत्बशाही आणि आदिलशाहीशी एकी केली. संभाजी महाराजांनी अजून एक पाऊल पुढे टाकत या दोन शाह्यांचे पालकत्व स्वीकारले. या गोष्टीस कुत्बशाहाने आदिलशाहास दख्खनी हिंदीतून पाठविलेल्या पत्रातून दुजोरा मिळतो. हा लेख आहे, ग्रंथ नाही, त्यामुळे एक उदाहरण देतो आणि थांबतो.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी मराठ्यांचे इंग्रजांशी असणारे संबंध ताणले गेले होते तर पोर्तुगीजांशी थोडे मैत्रीपूर्ण संबंध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी मराठ्यांशी युद्ध सुरु केल्याने त्यांच्याशी असलेले संबंध प्रचंड ताणले गेले.
अशावेळी प्रसंगावधान राखून संभाजी महाराजांनी इंग्रजांशी तह करीत त्यांच्याशी असणाऱ्या संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणली. पुढे मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केल्यानंतर संभाजी महाराजांनी प्राधान्यक्रम ठरवित मुघलांना तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांशीही तह केला आणि संबंध सुरळीत केले.
अंततः इतिहासासंबंधी कोणतेही विधान करीत असताना ते ऐतिहासिक सत्यासत्यतेच्या कसोटीवर टिकते का हे पडताळून पाहावे लागते अन्यथा त्या विधानास काहीही महत्व उरत नाही. गिरीश कुबेरांनी संभाजी महाराजांच्याबाबत केलेल्या विधानांचे तेच झाले आहे.
संदर्भ :
१) संभाजीकालीन पत्र-सार-संग्रह: संपादक – शं. ना. जोशी
२) इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी: संपादक – बॅरीस्टर परांजपे
३) शिवपुत्र संभाजी: लेखक – डॉ. कमल गोखले
४) शिवकालीन पत्र-सार-संग्रह: संपादक – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
५) छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती: लेखक – डॉ. केदार फाळके
Loksatta Editor Girish Kubera’s writings on Chhatrapati Sambhaji Maharaj are historically poor, Take back the book ‘Renaissance State – The Unwritten Story Of the Making of Maharashtra.’, Also Kuber should apologize to Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Cases In India : देशात १३ एप्रिलनंतर पहिल्यांदा २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद, मागच्या २४ तासांत ३५११ जणांचा मृत्यू
- YAAS Cyclone : पुढच्या 12 तासांत भीषण होणार यास चक्रीवादळ, उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करणार असल्याची IMDची माहिती
- Inspiring : विराट-अनुष्काने 16 कोटींचे औषध देऊन वाचवले चिमुकल्याचे प्राण, आईवडिलांनी मानले जाहीर आभार
- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार कोण? जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीने धरला जोर
- CBI चे नवे बॉस कोण? ‘ही’ तीन नावे आघाडीवर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक