आपण घरातील दिवे गरज नसली की बंद करतो. हीच क्रिया रस्त्यांवरील दिव्यांच्या बाबतीत करता येत नाही. रस्त्यावरचे आलेले दिवे वर्दळ असो वा नसो संध्याकाळनंतर दुसरा दिवस उजाडेपर्यंत सुरूच असतात. खरे पाहिल्यास काही ठिकाणी याची गरजही नसते. हे दिवे जर अखंड सुरू राहिले नाही तर विजेची बचत होऊ शकते. Lights will be needed only when needed
मात्र घरातील दिव्यांप्रमाणे रस्त्यांवरील दिवे चालू बंद करणे अवघड असते आणि व्यवहार्यही नसते. ही समस्या दूर करणारे तंत्रज्ञान आता संशोधकांनी बनविले आहे. टीव्हीलाइट असे या प्रणालीचे नाव आहे. या प्रणालीमुळे रस्त्यांवरील विजेच्या वापरात ८० टक्के बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. रस्त्यांवर जेव्हा लोक असतील त्यांना गरज असेल तेव्हाच पेटणारे ऑन डिमांड दिवे हॉलंडमधील डेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहेत.
हे दिवे गरज असतील तेव्हाच चालू राहिले पाहिजेत या भावनेतून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत. या प्रणालीचा वापर केल्यावर रस्त्यावर ज्या वेळी लोक असतील, एखादी सायकल किंवा इतर वाहने असतील तेव्हाच रस्त्यावरील दिवे उजळतील. इतर वेळी ते मंद प्रकाशात तेवत राहतील अशा प्रकारची व्यवस्था या प्रणालीत आहे. ही प्रणाली इतकी प्रगत आहे की रस्त्यावर असलेले मांजर आणि उंदरांसारखे प्रकाशाची गरज नसलेले प्राणी देखील लक्षात घेतले जातात व त्या वेळी दिवे प्रकाशमान होत नाहीत. त्यामुळे रस्ते रिकामे असले की दिव्यांच्या प्रकाश आपोआप कमी होवून विजेची मोठी बचत होते.
युरोपमध्ये रस्त्यावरील दिव्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी वर्षाला १३ अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च होतो. सरकारी विजेच्या खर्चामध्ये हे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे. हा खर्च लक्षात घेऊन संशोधकांनी वायरलेस सेन्सर्सचा वापर करून वीज बचत करणारी प्रकाश देणारी प्रणाली तयार केली आहे.