आपल्याकडे म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खर तर लहानपापासून हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. आपण केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयत्न, आलेला प्रत्येक नकार यातून वेळीच धडा घ्या. अपयशाचा अभ्यास करा, कदाचित त्या अपयशातच आपल्या उज्वल भविष्याचे काही संकेत दडलेले असतील. अपयश येताच हात पाय गाळून मैदान सोडणे हे खूप सोपे असते परंतु अपयशाची तमा न बाळगता जो चुकांमधून शिकेल आणि आपले प्रयत्न सुरू ठेवील त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. Life Skills: Learn from every failed attempt, every rejection
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल एक कथा सदैव ऐकायला मिळते. त्यानुसार असे सांगितले जाते की त्यांनी बल्बचा शोध लावला खरा परंतु यामागे हजारो अयशस्वी प्रयत्न होते. याचाच आधार घेऊन एकदा एका मुलाखतीत त्यांना काहीसां उद्धट प्रश्न करण्यात आला. मुलाखतकाराने एडिसन यांना विचारले की, अपयशामुळे काय वाटते. त्यावर त्यांचा प्रतिसाद हा अतिशय मार्मिक होता, ते म्हणाले, मी बल्ब न बनवण्याचे शंभर मार्ग शिकलो.
एडिसन यांनी आलेल्या प्रत्येक अपयशास एक धडा म्हणून पाहिले. फ्रान्सचे पूर्व राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल म्हणत, जेव्हा कधी यशस्वी होण्याच्या आपल्या मार्गात संकटे ठाण मांडून बसतील, आपल्याला वाटू लागेल की सर्व काही संपत चाललंय; तेव्हा फक्त एकच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाईल ती म्हणजे दृढनिश्चय. कृतिशील बना. सर्व क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की हे सर्व व्यक्ती अत्यंत कृतिशील आहेत. लिओनार्डो डा विंची असो अथवा स्टीव जॉब्स त्यांनी अतिशय भिन्न दृष्टीकोन ठेवून काळाला आकार दिला ना, की त्यांना काळाने आकार दिला. तुम्हीपण कृतिशील राहून काळाला आकार द्या.