एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्ये, भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तीचा शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तिचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना होय. व्यक्तिमत्त्व हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्बाह्य रूपाची गोळाबेरीज असते. आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व सुधारायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. Life Skills: Do these things to improve your personality
नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करा. जी व्यक्ती स्वतःचा आदर करू शकत तीच इतरांचाही आदर करते. शेवटी पेराल तसे उगवते. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला तर ती तुमच्याप्रती आदर व्यक्त करेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तसेच नेहमी विनम्र रहा. हे सुबाषित नहमी लक्षात ठेवा, विद्या विनयेन शोभते. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ही म्हणही नेहमी ध्यानात ठेवावी आमि आपले आचरण ठेवावे. नेहमी सकारात्मक व चैतन्यशील रहा. असे केल्यास कोणत्याही संकटाला सामोरे जाता येते. परोपकारी बना. गरजू व्यक्तींना कायम सढळ हाताने मदत करा. समाजासाठी चंदनासारखे झिजा, तुमच्या कार्याचा सुगंध आपोआप दाही दिशा दरवळेल. नेहमी इतरांचे मन:पूर्वक व उदारपणे कौतुक करा. स्वतःला प्रबळ प्रेरणावान व आत्मविश्वासयुक्त बनवावे व इतरांना विश्वास द्यावा, प्रेरणा द्यावी. आयुष्यात इतरांना ज्ञान, मान व दान तीन गोष्टी कायम देत रहा. यातूनच तुमचे व्यक्तीमत्वाला खऱ्या अर्थाने आकार येणार आहे. ज्ञान, प्रेम व ताकद या तीन गोष्टी स्वतःजवळ बाळगा, जग तुमच्याकडे धावत येईल.