महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, अरे! मी फारच थकलो बुवा. म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी गप्पाटप्पा करून ताजेतावाने झाले पाहिजे. परंतु एका ठरावीक पातळीनंतर आपल्या ऊर्जेला उतरती कळा लागल्याचे आपणास जाणवते. म्हणून आपल्या शक्तीची पातळी वाढविण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा आधार घ्यावा. खरे पाहिल्यास २५ टक्के लोकांची श्वासोच्छ्वासाची पद्धत चुकीची आहे. Keep the brain sharp
अशा चुकीच्या पद्धतीमुळे त्या व्यक्ती दहा ते वीस टक्के कमी प्राणवायू शरीरात खेचू शकतात. म्हणून आपण काय केले पाहिजे. आपल्या श्वासोच्छ्वासाची पद्धत तपासून बघा.लहानपणापासूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी चुकीचा श्वासोच्छ्वास घेण्याची सवयच लावून घेतली आहे. एकदा ही पद्धत सुधारली की त्यानंतर काही महिने योग्य रीतीने श्वासोच्छ्वास घेण्याचा परिपाठ ठेवा. हळूहळू ही चांगली सवय अंगी बाणली जाईल.
यामुळे मेंदूला प्राणवायूचा अधिक पुरवठा होईल व परिणामस्वरूपी आपल्या ऊर्जेचा दर्जा उंचावेल आणि साहजिकच मानसिकदृष्टय़ा आरामाचा अनुभव येईल. या योग्य क्रियेमुळे पोटाच्या सर्व भागालादेखील चांगला व्यायाम होतो. शक्ती, जोम आणि उत्साह वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्यायाम. आपण मनोरंजनासाठी कोणता खेळ खेळता? अलीकडे तर व्हिडीओ गेम. हे अयोग्य आहे. व्हिडीओ गेम्समुळे बुद्धीचा विकास होतो यात शंका नाही; परंतु सर्वागाचा व्यायाम होत नाही.
सतत गेम्स खेळल्यामुळे आपले डोळे बिघडू शकतात. नियमित व्यायामाने स्नायू, पेशी यामध्ये वाढ होते, ते बलवान होतात. जर मधेच व्यायाम करणे सोडले तर स्नायू दुर्बल होतात. याच प्रकारे एकदा अभ्यास पूर्ण झाला, की आपल्याला मेंदूला जास्त ताण देणे योग्य वाटत नाही. परिणामस्वरूपी मेंदूमध्ये विकसित होत असलेली अनेक विद्युतचक्रे नष्ट होऊ शकतात. हे एक प्रकारे योग्य आहार फुकट घालविण्यासारखे आहे. यासाठी दररोज नित्यनेमाने काही तास अभ्यासाच्या माध्यमाद्वारे नवीन माहिती मिळविण्याची सवय लावल्यास आपली बौद्धिक शक्ती तीव्रतेने काम करू लागते.