• Download App
    दीपशिखा कालिदास- सञ्चारिणी दीपशिखेव रात्रौ। (रघुवंशम्।)Kalidas day : the first day of aashadh month : world sanskrit day

    दीपशिखा कालिदास- सञ्चारिणी दीपशिखेव रात्रौ। (रघुवंशम्।)

    ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. इंदुमतीच्या स्वयंवरात ती राजांना पहात पुढे जात असताना पुढे असलेल्या राजांचे चेहरे उजळतात आणि मागच्या राजांचे पडतात. यावरून कालिदास ही उपमा देतो. तो म्हणतो, जसे दीपशिखा अर्थात मशाल घेऊन रात्री कोणीतरी पुढे जात असताना राजमार्गावरील पुढील घरांचे सज्जे प्रकाशित होतात व मागील घरे अंधारात बुडून जातात तसे इंदुमतीमुळे पुढील राजांचे चेहरे आशेने उजळून जात व मागील राजांचे निराशेने काळे पडत. Kalidas day : the first day of aashadh month : world sanskrit day


    आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच ‘कालिदास दिन’ ! “कालिदास म्हणजे संस्कृत आणि संस्कृत म्हणजे कालिदास” अशी आता विश्वाला कलिदासांची ओळखच झाली आहे. कलिदासांचा नेमका काळ इतिहासाच्या गर्भात लुप्त झाला आहे. अनेक संस्कृत महाकवींचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःबाबत मौन असतात. कालिदासांनीही स्वतः चा कालावधी तर सांगितला नाही पण ओघाने मेघदूत काव्याच्या सुरुवातीला “आषाढस्य प्रथमदिवसे…..”असा उल्लेख त्यांनी केला आहे. मेघदूतात कालिदास लिहितात—
    तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः। आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।२।।
    अर्थ- त्या (रामगिरी) पर्वतावर काही महिने घालविल्यावर विरहाने कृश झाल्याने ज्याच्या हातातून सुवर्ण कंकण गळून पडले आहे अशा त्या यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या शिखराला बिलगलेल्या आणि माती उकरण्याच्या क्रीडेत दंग असलेल्या हत्तीप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या त्या मेघाला पाहिले.

    मेघदूतातील यक्ष मेघाला निरोप देतो तो दिवस आषाढाचा पहिला दिवस आहे. या श्लोकातील ‘आषाढस्य प्रथमदिवसे….’ या उल्लेखावरून आज हा दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. कालिदासांच्या तोडीचा कवी आजपर्यंत झाला नाही असे म्हणतात, म्हणूनच कोणी कवी म्हणतो–
    पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः। अद्यापि तत्तुल्य कवेरभावाद् अ-नामिका सार्थवती बभूव।
    अर्थ-पूर्वी कधीतरी कवींना मोजण्याचा प्रसंग आला तेव्हा कालिदासाला चुकून करंगळीवर मोजले गेले आणि त्यानंतर त्याच्या इतक्या योग्यतेचा कवी न सापडल्यामुळे करंगळीच्या शेजारील अ-नामिका या बोटाचे नाव सार्थ ठरले. अशा या महाकवी कालिदासांच्या नावावर 46 ग्रंथांचे कर्तृत्व सांगितले जाते, पण संशोधकांनी प्रत्यक्षात मात्र सातच साहित्य कृती कालिदासांच्या म्हणून मान्य केल्या आहेत. अन्य कृती दुसऱ्या कुणीतरी त्यांच्या नावावर लिहिल्या असाव्यात असा कयास आहे. कालिदासांच्या या सप्त कृतींमध्ये दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये, तीन नाटकांचा समावेश होतो.

    (अ) महाकाव्य-

    संस्कृत साहित्यातील पंच महाकाव्यातील पहिल्या दोन क्रमांकाची महाकाव्ये कलिदासांची मानली जातात. कुमारसंभव व रघुवंश या दोन अजरामर महाकाव्यांनी महाकवी कालिदासांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.

    (१) कुमारसंभव

    कुमार कार्तिकेय अर्थातच शंकर-पार्वतीच्या ज्येष्ठ पुत्राच्या जन्माची कथा व शंकर-पार्वती विवाह कथा या महाकाव्यात येते. तारकासुर वध तसेच, पार्वती पिता हिमालयाच्या सौंदर्याचे वर्णन कालिदासांनी केले आहे. याशिवाय, शंकराने नेत्राग्निने कामदेवास भस्म केल्यावर रतिने केलेला विलाप हेही कालिदासांच्या लेखनशैलीचे भाषा म्हणून असलेले श्रेष्ठत्व दाखवते. या महाकाव्याचे आज १७ सर्गच उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी पहिले आठ सर्गच कालिदासांचे असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

    (२) रघुवंश-

    काव्य प्रतिभेच्यादृष्टीने पहिल्यापेक्षा सरस असे हे दुसरे महाकाव्य आहे. कालिदासांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले, पण भारतीय साहित्य परंपरा त्यांना रघुकार म्हणूनच ओळखते. यावरूनच या काव्याचे महत्त्व लक्षात येते. या महाकाव्यात रघु महाराजांच्या वंशाचे वर्णन आहे. दिलीप, रघु, अज, दशरथ, राम….. ते अग्निवर्ण पर्यंत या वंशातील २८ राजांचे वर्णन या महाकाव्याच्या १९ सर्गात येते. राजांचे कलादालन असाही उल्लेख या महाकाव्याबाबत पाश्चात्य विद्वान मंडळी करतात. कालिदासांचे वैशिष्ट्य म्हणजे उपमा अलंकाराचा उत्तम वापर, सृष्टिसौंदर्य वर्णन, प्रणय, रसपरिपोष करणारे लेखन. कालिदासांच्या प्रतिभेची ओळख म्हणजे काही विशेष प्रसंग जसे- रघु राजाचा दिग्विजय, इंदुमती स्वयंवर, इंदुमतीच्या अकाली मृत्यूनंतर अजविलाप. या महाकाव्यामुळेच कालिदासांना रसेश्वर हे बिरुद प्राप्त झाले असावे.

    (ब) खंडकाव्ये-

    जयदेव या संस्कृत कवींनी कालिदासांचे अत्यंत मार्मिक शब्दात वर्णन केले आहे–
    भासो हास: कविकुलगुरु कालिदासो विलास:।
    अर्थात, भास हे हास्य तर कवी कुळाचे कुलगुरू कालिदास हे कविताकामिनीचा विलास आहेत. त्यांच्या ऋतुसंहार व मेघदूत या दोन खंडकाव्यात किंवा लघुकाव्यात शृंगार रस हाच प्रधान दिसतो.

    (१)ऋतुसंहार-

    हे काव्य कालिदासांनी अगदी सुरुवातीच्या काळात अर्थात तारुण्यात लिहिले असावे, असे विद्वान मानतात. कारण यांतील लेखनशैली तेवढी विकसित झालेली दिसत नाही. या काव्यात शृंगाररसालाच दिलेले महत्त्व पाहता या काव्यास प्रणयकाव्य म्हटले जाते.

    (२)मेघदूत-

    कालिदासांच्या साहित्यातील मेघदूतास भरघोस कीर्ती प्राप्त झाली आहे. पत्नीपासून वर्षभर दूर रहाण्याचा शाप मिळाल्यावर काही काळ तिच्या विरहात राहून झाल्यानंतर विरह व्याकूळ झालेल्या यक्षाने आपल्या पत्नीस संदेश देण्याचे ठरविले. त्यासाठी तो मेघाला याचना करतो, अशी या काव्याची मध्यवर्ती कल्पना आहे. आषाढात पावसाळी ढग दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात या संकल्पनेचा विचार कालिदासांनी यांत केला आहे. शिवाय, मेघाला आकाशातून खालचा प्रदेश कसा दिसेल? याचे वर्णन व विमानातून निरीक्षण केल्यावर अनुभवास येणाऱ्या वर्णनाशी तंतोतंत जुळते, याचे पुरावे संशोधकांनी दिले आहेत. कालिदासांचे सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय ज्ञान यातून प्रत्ययास येते.

    (क) नाटक-

    कालिदासांनी तीन नाटकं लिहिली. कालिदास स्वतः म्हणतात की, तत्कालीन समाजाचा नाटक हा मनोरंजनाचा आवडता प्रकार होता. विविध प्रकारची आवड असणाऱ्या लोकांचे मन रमणारे नाटक हे एकमेव समान साधन आहे. तीनही नाटकं शृंगार रस प्रधान आहेत.

    (१)मालविकाग्निमित्रम् –

    लेखनशैलीवरून हे कालिदासांचे पहिले नाटक असावे, असे वाटते. यात, शृंगवंशीय राजा अग्निमित्र व मालविका यांची प्रेमकथा आहे. प्रेमातील शह काटशह यात आहेत. विदूषक राजाला प्रेम सफल होण्यात मदत करतो तर पहिली राणी हे घडू नये यासाठी प्रयत्न करते.

    (२)विक्रमोर्वशीयम्-

    उर्वशी आणि पुरुरवा यांची कथा वेदांपासून अनेक ठिकाणी दिसते. तीच कथा या नाटकाची कथा आहे. पुरुरवा आणि उर्वशी यांची भेट, नंतर विरह, राजाचे दुःख, व पुनर्मिलन असा कथाभाग आहे. शृंगार व करूण रस, यांत आहेत.

    (३)अभिज्ञानशाकुंतल-

    काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
    सर्व साहित्य प्रकारात नाटक श्रेष्ठ आहे आणि त्यातही शाकुंतल श्रेष्ठ आहे, असे वर्णन करून या नाटकास संस्कृतच नव्हे तर सर्वच साहित्यात सर्वश्रेष्ठ मानतात. जर्मन कवी गटे हे नाटक डोक्यावर घेऊन नाचले होते, असा या नाटकाचा महिमा आहे. या नाटकाची मूळ कथा महाभारतातून घेतली आहे.
    कालिदास दिनाच्या निमित्ताने संस्कृत शिकण्याचा संकल्प प्रत्येक संस्कृत अनुरागी व्यक्तीने करावा.

    ©️प्राचार्य अतुल अरविंद तरटे
    श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नासिक.संलग्न-कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ-रामटेक
    मो-९८५००३७२६३
    ई-मेल- rssatul@gmail.com

    Kalidas day : the first day of aashadh month : world sanskrit day

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!