देशात असहिष्णुता फैलावत आहे. हरिद्वारच्या धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषणे करण्यात आली. अल्पसंख्यांक विरुद्ध हत्यारे उचलण्याची भाषा झाली. या पार्श्वभूमीवर बंगलोर आणि अहमदाबाद इथल्या आयआयएमच्या 183 विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पंतप्रधानांचे मौन द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांसाठी मोकळीक देणारे ठरते, असा आरोपही यात करण्यात आला आहे. IIM students letter to PM Modi: Hate speech, opposition to multicultural debate, don’t tolerate intolerance … but … !!
सध्या भारतात आणि भारताबाहेरच्या बुद्धिमंत लिबरल जगतात या पत्राची खूप चर्चा आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामुळे एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेच्या स्कॅनर खाली आले आहेत. आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे अजिबात गैर नाहीत. त्यांनी व्यक्त केलेली चिंता देखील “चिंतनीय” आहे. पण फक्त प्रश्न हा आहे, की हरिद्वारच्या धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषणे केल्यानंतर किंवा अल्पसंख्यांक समाजावरच हल्ले झाल्यानंतर किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवल्यानंतरच हे बुद्धिमंत विद्यार्थी पत्र लिहितात… पण हरियाणात लव्ह जिहाद मधून भर रस्त्यात मुलीला गोळी घालून मारण्यात येते किंवा केरळमध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंचा लव्ह जिहाद विरोधात आवाज उठवल्यानंतर या बुद्धिमंतांना बहुसांस्कृतिकवाद किंवा देशात असलेली असहिष्णुता आठवत का नाही??
हरियाणातील मेवात मध्ये देशातल्या देशातले अल्पसंख्यांक बहुसंख्य आहेत. तेथे देशातले बहुसंख्य अल्पसंख्य आहेत. त्या गावात होणाऱ्या हिंसाचाराबद्दल हे बुद्धिमंत विद्यार्थी आवाज उठवतात का? तेव्हा देशात असहिष्णुता असल्याचा भास त्यांना होत का नाही? अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले झाले. ते हल्ले होताच कामा नयेत, यात कोणतीही शंका नाही. पण नेमके अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थना स्थळावर हल्ले झाल्यानंतर संवेदनशीलता व्यक्त करणारे हे बुद्धिमंत बांगलादेशात हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले किंवा पाकिस्तानात हिंदू समाजावर झालेले हल्ले पाहून अस्वस्थ होतात का? तेव्हा ते पंतप्रधानांना, “तुम्ही आता गप्प का?”, असा प्रश्न पत्र लिहून विचारतात का??
अल्पसंख्यांक समाजावरील हल्ले गैरच आहेत. पण फक्त तेव्हाच पत्र लिहून आपली संवेदनशीलता जागी आहे, असे दाखवणारे बुद्धिमंत विद्यार्थी बहुसंख्यांक समाजातील प्रार्थना स्थळांवर झालेले हल्ले किंवा लव्ह जिहाद प्रकरणातील मुलींवर झालेले अत्याचार याविषयी पत्र का लिहीत नाहीत??
धर्म संसदेत झालेली भाषणे गैरच आहेत. तेथे तलवारी उचलण्याची भाषा वापरली गेली ही आणखीन गैर आहे. पण अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थनास्थळांमधून जेव्हा जिहादची घोषणा होते, अमरावती, मालेगाव, भिवंडी या शहरांच्या रस्त्यारस्त्यांवर दगड, लाठ्याकाठ्या, तलवारी घेऊन नंगानाच घातला जातो, तेव्हा “पत्र लिहिण्याची बुद्धी” या बुद्धिमंत विद्यार्थ्यांना का होत नाही?, की त्यावेळी नेमकी त्यांची लेखणी लुळी पडते?, लॅपटॉप, टॅब मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांमध्ये अचानक व्हायरस शिरतो? की त्यामुळे ते पंतप्रधानांना, “आता तुम्ही गप्प का?” असे पत्र लिहीत नाहीत…!!??
नेमके असे काय आहे? की फक्त अल्पसंख्यांक समाजावरील हल्ल्यांच्या वेळी बुद्धिमंतांची संवेदनशीलता जागी होते आणि बहुसंख्यांक समाजावर जेव्हा अत्याचार होतात किंवा कुठले गैरकृत्य होते, तेव्हा या बुद्धिमंतांची संवेदनशीलता एकदम “झोपी” जाते…!! अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक कोणत्याही समाजावरचे हल्ले गैरच आहेत. त्याचा निषेधच झाला पाहिजे…!! पण त्याहीपेक्षा निषेधार्ह आहे, ती आपल्या समाजातल्या बुद्धिमंतांची “निवडक संवेदनशीलता जागे होण्याची प्रवृत्ती”… ही जास्त घातक आहे. यातून समाजाचा बुद्धीभेद होतो. ज्या शक्ती खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष मूल्य समाजात अमलात आणू इच्छितात त्यांचे मानसिक आणि बौद्धिक खच्चीकरण होते. आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जिहादी मानसिकता जोपासणाऱ्या धर्मांध नेत्यांचे बळ वाढते…!! हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येथे लक्षात घेतला पाहिजे.
आयआयएम या विद्यार्थ्यांच्या पत्रात खासदार तेजस्वी सूर्य यांच्या भाषणाचा संदर्भ आहे. त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मांतरावर भाष्य केले होते. त्यातल्या आक्षेपार्ह भागाबद्दल त्यांनी माफीही मागितली होती. पण या माफीनंतर देखील बुद्धिमंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे. जर खासदार तेजस्वी सूर्य यांचे भाषण गैर असेल आणि त्यावर बुद्धिमंत विद्यार्थ्यांचा आक्षेप असेल, तर मग असदुद्दीन ओवैसी, शफिक उर रहमान बर्क हे खासदार कोणती बहुसांस्कृतिक चळवळ चालवतात?? त्यांच्या भाषणांमधून कोणते धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जपले जाते??, या विषयी या बुद्धिमंत विद्यार्थ्यांना, “माननीय पंतप्रधान आपण गप्प का?”, असे का विचारावेसे वाटत नाही?
इथे आपल्या बुद्धिमंतांची लेखणी लुळी पडते. त्यांच्या लॅपटॉप, टॅब, मोबाईल मध्ये व्हायरस शिरतात आणि हे व्हायरस देशाच्या खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक वारशाला ठेच पोहोचवतात…!! ही लिबरल बुद्धिमतांना मान्य नसली तरी आपल्या समाजाच्या दांभिकतेची वस्तुस्थिती आहे…!!