सकाळी केलेल्या नाष्ट्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी काही खाल्ले, तर तुमची जाडी वाढण्याचा संभव असतो. लठ्ठपणा आणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अधिक ऊर्जा देणारा नाष्टा सेवन केल्यास त्यांना वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो. तसेच, मधुमेहाचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने असा नाष्टा उपयुक्त असून, इन्शुलिनची आवश्यंकता कमी भासते, असा निष्कर्ष इस्राईलमधील शास्त्रज्ञांनी काढला आहे. सध्याच्या काळात, तुम्ही काय जेवता आणि किती कॅलरी तुमच्या पोटात जातात, यापेक्षा तुम्ही कधी जेवता आणि किती कालावधीने जेवता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. If you want to lose weight, then eat less in the evening
इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन एन्ड्रोक्राइन सोसायचीच्या शिकागो येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, आहारात मोठ्या प्रमाणात सकस नाष्ट्याचा समावेश केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधन पथकाने लठ्ठपणा अणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या अनेकांचे सर्वेक्षण केले. वयाची साठी ओलांडलेले हे सर्व जण इन्शुलिनचा वापर करीत होते. या सर्वांना वजन कमी करण्याच्या दृष्टीने दोन प्रकारचे, परंतु सारख्याच प्रमाणात कॅलरी असलेले डाएट सांगितले गेले. एका गटाचा आहार म्हणजे सकाळी भरपूर सकस नाष्टा, दुपारी मध्यम प्रमाणात जेवण आणि रात्री कमी प्रमाणात जेवण, असा ठरविण्यात आला. दुसऱ्या गटाला सर्वसाधारणपणे मधुमेह झालेल्या व्यक्तींना सांगितला जातो, तसा ठराविक कालावधीने एकूण सहा वेळा हलके जेवण, नाष्टा घेण्यास सांगितले. तीन महिन्यांनंतर पहिल्या गटातील व्यक्तींचे वजन सरासरी पाच किलोने घटल्याचे, तर दुसऱ्या गटातील व्यक्तींचे वजन सरासरी दीड किलोने घटल्याचे आढळून आले. शिवाय पहिल्या गटातील व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही दुसऱ्या गटाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाले.