सार्वजनिक गणेशोत्सवावर मुसलमान विरोधाचा आरोप झाला असला तरी अनेक मुसलमान पुढाऱ्यांनी या उत्सवात भाग घेतल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. टिळक पंथीय जहाल नेते मौलाना मोहम्मद अली, शौकत अली, सय्यद हैदर रझा, इमाम हसन, मौलाना हसरत मोहनी ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. एवढेच नाही तर महात्मा गांधी आणि महंमद अली जीना या भारतीय राजकारणातील या दोन ध्रुवांना लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर एकत्र आणले होते.Hindu – Muslim relationship regarding Sarvajanik Ganesh Festival
सार्वजनिक गणेशोत्सवाचा धांडोळा घेताना हिंदू-मुस्लीम संबंधांच्या विषयाला स्पर्श करणे अपरिहार्य ठरते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना लोकमान्य टिळकांवर हा उत्सव मुसलमानांच्या विरोधात सुरू केल्याचा आरोप झाला होता. त्याला मुंबई आणि गुजरातमधील प्रभासपट्टण येथील हिंदू – मुसलमान दंगलीची पार्श्वभूमी होती ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.
पण म्हणून संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव हा फक्त मुसलमानांच्याच विरोधात काढल्याचा आरोप मात्र लोकमान्य टिळकांसंदर्भात गैरलागू ठरतो. कारण टिळकांच्या हयातीत अनेक मुसलमान पुढारी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी झाल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत.
शिवाय स्वतः लोकमान्यांनी केसरीत अग्रलेख लिहून यासंबंधीचे स्पष्ट खुलासे केले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना कोणत्याही परधर्मातून स्वीकारलेली नसून आमच्याच धर्माच्या वारकरी संप्रदायात त्याची मूळे आहेत, असे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. अशा स्थितीत त्यांच्यावरचा फक्त मुसलमानांच्या विरोधात सार्वजनिक गणेशोत्सव काढल्याचा आरोप वर उल्लेख केल्याप्रमाणे गैरलागू ठरतो. लोकमान्यांनी सर्व समाजाला एकत्र आणून कार्यप्रवृत्त करण्यासाठीच सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्भवू केला, असे इतिहास सांगतो. यातला “कार्यप्रवृत्त” हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.
टिळकांच्या या हेतूची त्या काळातील प्रभावी मुसलमान पुढाऱ्यांनी नोंद घेतलेली दिसते. किंबहुना टिळकांच्या या सार्वजनिक उपक्रमात त्यांनी उस्फूर्तपणे सहभागही नोंदवलेला दिसतो. टिळकांच्या अध्यक्षतेखाली केसरी वाड्यात सय्यद हैदर रझा यांचे गणेशोत्सवात व्याख्यान झाले आहे. त्याचबरोबर स्वतःला Tilkaite म्हणजे काँग्रेस मधले टिळक पंथीय जहाल म्हणवून घेणारे अली बंधू अर्थात मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली, हसन इमाम, मौलाना हसरत मोहनी यांनीही सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्याने दिल्याची दिल्याच्या नोंदी आहेत.
सय्यद हैदर रझा यांचे व्याख्यान तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मित्र मेळ्याने नाशिकमध्ये आयोजित केले होते. याचा उल्लेख सावरकरांनी आपल्या लंडनच्या बातमीपत्रात केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा राष्ट्रीय हेतू या मुसलमान पुढार्यांच्या सहभागाने अधिक सिद्ध झाला आणि त्यातून राष्ट्रीय चळवळीला गती मिळाल्याचे दिसते. कारण या पुढाऱ्यांचे व्याख्यानाचे विषय धार्मिक पेक्षा राष्ट्रीय चळवळीशी संबंधित अधिक होते. इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळावे, आपण आपले राज्य चालवावे असे आशय या पुढार्यांच्या व्याख्यानात दिसले आहेत. जे नंतरच्या काळात म्हणजे टिळकांच्या निधनानंतर लुप्त झालेले दिसतात.
दोन ध्रुव एकत्र
हाच तो सार्वजनिक गणेशोत्सव आहे, जिथे भारतीय राजकारणातले ध्रुव महात्मा गांधी आणि बॅरिस्टर महंमद अली जीना यांना लोकमान्यांनी आपल्या समवेत एका व्यासपीठावर एकत्र आणले. मुंबईतल्या शांतारामांच्या चाळीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानापूर्वी लोकमान्यांच्या डावीकडे उभे राहुन महात्मा गांधी भाषण करत आहेत आणि उजवीकडे बॅरिस्टर मोहम्मद अली जीना बसलेले आहेत तसा फोटो उपलब्ध आहे.
या ऐतिहासिक घटनेची नोंद लोकमान्य टिळकांच्या चरित्रात तर आहेच, पण त्याचा फोटो ही पुरेसा बोलका आहे. टिळकांनी आपल्या राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधी आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जीना या दोघांनाही सामावून घेतल्याचा घेतल्याची साक्ष या फोटोतून पटते. हा फोटो सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोत्कर्ष समजला पाहिजे एवढा महत्त्वाचा आहे. हिंदू-मुस्लीम संबंधातील ऐक्य भावनेचा तो सर्वात मोठा क्षण होता, असे मानण्यास देखील वाव आहे. कारण गांधी आणि जीना हे दोन्ही नेते टिळकांचे नेतृत्व मानत होते आणि एकमेकांविषयी आपली विशिष्ट मते तयार होण्यापूर्वी ते त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीचा भाग होते असेच इतिहास सांगतो.
Hindu – Muslim relationship regarding Sarvajanik Ganesh Festival
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात आदर्श घोटाळ्याची पुनरावृत्ती, माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत प्रकल्प
- WATCH : वर्ध्यामध्ये नागाचा थरार, मुलीच्या गळ्याला विळखा दोन तास रंगला थरार, शेवटी तो डसलाच
- WATCH : गोटखिंडी मस्जिद गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा सांगली जिल्ह्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
- मोदी – शहांचा माध्यमांना दे धक्का; काँग्रेस उमेदवाराला १ लाख १७ हजार या सर्वोच्च मार्जिनने हरविणारे भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी