मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केल्याने पवारांच्या प्रतिमाभंजनाचा हा नवीन “राजप्रयोग” सुरू झाला आहे का…??, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. Has this new “political experiment” of dismantling Pawar’s image started by targeting Sharad Pawar?
– राष्ट्रीय प्रतिमावर्धन, प्रादेशिक प्रतिमाभंजन!!
पवारांच्या प्रतिमावर्धनाचे आणि प्रतिमाभंजनाचे आजवर अनेक प्रयोग महाराष्ट्राने पाहिले. पवारांच्या प्रतिमावर्धनाचे प्रयोग अर्थातच राष्ट्रवादी पुरस्कृत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करणे स्वाभाविक आहे. ते नेहमी पवारांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचे राहिलेत, तर पवारांच्या प्रतिमाभंजनाचे प्रयोग हे प्रादेशिक अथवा महाराष्ट्र पातळीवर राहिलेत. यात पवार ना कधी राष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने पोहोचले, ना कधी महाराष्ट्र पातळीवर खऱ्या अर्थाने घसरले…!! अर्थात ही गोष्ट फक्त प्रतिमावर्धन आणि प्रतिमाभंजन या दोनच बाबतीत खरी आहे…!!
– राष्ट्रीय कर्तृत्वाचा अभाव
सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची प्रतिमा कितीही राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची करण्याचा प्रयत्न केला असला, तरी खऱ्या अर्थाने पवार कधी राष्ट्रीय नेतृत्वाच्या मांदियाळीत बसलेच नाहीत. ते राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या नावापुरत्या राष्ट्रीय असलेल्या पण प्रत्यक्षात प्रादेशिक असलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. केंद्रीय मंत्रीपदापलिकडे त्यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर ना जाऊ शकली… ना त्यांना खर्या अर्थाने तेवढे कर्तृत्व दाखवता आले…!!
त्याचबरोबर पवार यांच्या प्रतिमाभंजनाचा सर्व विरोधकांनी केलेल्या प्रयोग महाराष्ट्र पातळीवर मर्यादित अर्थाने यशस्वी ठरला, पण पवारांना पूर्ण पराभूत करू शकला नाही. ही विरोधकांना टोचत असली तरीही राजकीय वस्तुस्थिती निदान महाराष्ट्र पातळीवर तरी आहे.
– गोपीनाथ मुंडे प्रयोग
पवारांच्या प्रतिमाभंजनाचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी करून पाहिला. शरद पवार म्हणजे भ्रष्टाचारी, शरद पवार म्हणजे दाऊद – अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांची बॉम्बस्फोटातील आरोपींशी जवळीक, शरद पवार म्हणजे भूखंड, अशा आरोपांच्या फैरी झाडत गोपीनाथ मुंडे हे त्यावेळचे तरुण नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. यात पवारांचे प्रतिमाभंजन झाले किंबहुना पवारांची प्रतिमा भ्रष्टाचारी, अंडरवर्ल्ड, जमिनीत इतरांपेक्षा रस असणारे नेते अशीच बनली. पण ती एका विशिष्ट मर्यादेपलिकडे पवारांच्या राजकारणातला “रेलेव्हन्स” संपवू शकली नाही.
– विश्वासघाती प्रतिमा मात्र चिकटलीच!!
वास्तविक पवारांना सर्वाधिक चिकटलेली भंजनी प्रतिमा म्हणजे विश्वासघातकी आणि खंजीर खुपसे नेते…!! जी खऱ्या अर्थाने वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांनी खेळलेल्या राजकारणातून तयार झाली होती. ती प्रतिमा पवारांना आजही कायमची चिकटलेली आहे. विश्वासघातकी राजकारणी ही प्रतिमा त्यांना महाराष्ट्रासह देशात पुसता आलेली नाही. सध्या महाविकास आघाडीचे शिल्पकार बनून त्यांनी जे सरकार बनवले आहे त्या बनवण्याच्या प्रक्रियेत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांची प्रतिमा कितीही “चाणक्य” म्हणून उजळली असली तरी प्रत्यक्षात पवारांची प्रतिमा ही मित्रपक्षांना फोडणारी, जनमताच्या कौलाचा विश्वासघाती अशीच झाली आहे. विश्वासघात हा शब्द पवारांना जणू काही पर्याय वाचक बनला आहे…!! 1978 साली त्यांनी वसंतदादांशी विश्वासघात केला पण 2019 मध्ये त्यांनी थेट महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी विश्वासघात केला. इथपर्यंत ही प्रतिमा घसरत आली आहे.
– जाती जातींमध्ये फूट पाडणारे पवार
आता राज ठाकरे त्यामध्ये एका वेगळ्या मुद्द्याची भर घालताना दिसत आहेत ती म्हणजे पवारांनी स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्रात जाती जातींमध्ये फूट पाडून द्वेष निर्माण केला, ही…!! महाराष्ट्रात जात होती. जातीचा अभिमान होता. पण जातीचा द्वेष कमी होता. तो समाजसुधारकांच्या वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांमधून कमी झाला होता. त्यावर पवारांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी बोळा फिरल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे आणि याला उघड-उघड पवारांच्या मराठा राजकारणाची किनार आहे. पवारांना आपला व्होट बेस पक्का करून घेण्यासाठी मराठा राजकारणाचा आधार घ्यावा लागला आणि तेथेच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तयार केलेल्या पुरोगामी नेत्याच्या प्रतिमेला खऱ्या अर्थाने धक्का बसला आणि आता राज ठाकरे तो अधिक ठळक करत चालले आहेत.
– पुरोगामी भाषा, प्रतिगामी कृती
पवारांची तोंडची भाषा शाहू फुले आंबेडकर अशी पुरोगामी राहिली आहे आणि प्रत्यक्षात कृती मात्र फक्त मराठा आणि आता मुस्लिम अशा कॉम्बिनेशनची राहिली आहे. कधी संभाजी ब्रिगेडला आतून फूस लावणे, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे यांचा “डॉक्टर ऑफ लिटरेचर” देऊन सत्कार करणे, तर दुसरीकडे बाबासाहेबांनी खोटा इतिहास लिहिला, असे उद्गार काढणे यातून एक प्रकारे ब्राह्मणद्वेष तयार करणे या स्वरूपाची राजकीय कृती पवारांची राहिली आहे.
– प्रत्येक ठिकाणी जातीचे वळण
इतकेच काय पण माधव गोडबोले यांच्यासारख्या केंद्रीय गृह सचिवांनी पवारांनी अहवाल न वाचता प्रतिक्रिया दिली, अशी टीका केली होती. त्यावर वाचनाची मक्तेदारी एकाच वर्गाची नाही, अशी टीका करून पवारांनी वीज टंचाई प्रश्नाला जातीय वळण दिले होते. नेमकी हीच सर्व प्रतिमा आज राज ठाकरे अधोरेखित करू पाहत आहेत. पवारांची एकाअर्थाने यातून सुटका नाही. कारण पवारांची “चाणक्य” म्हणून प्रतिमा राष्ट्रवादी नेत्यांनी कितीही उभी केली असेल, तरी त्या प्रतिमेला देखील मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष कृती पवारांकडून होताना दिसत नाही.
– पवारांच्या अनुयायांवर परिणाम नाही
राज ठाकरे यांनी पवारांचे जे प्रतिमाभंजन चालवले आहे, त्यातले मुद्दे राष्ट्रवादीचे नेते खोडताना दिसत नाहीत. पवारांच्या राजकीय जुगाड करण्याच्या राजकीय कौशल्यावर त्यांच्या अनुयायांचा एवढा विश्वास आहे की पवार यातूनही मार्ग काढतील आणि आपली सत्ता टिकवून ठेवतील, असे त्यांना वाटते.
त्यामुळेच राज ठाकरे यांनी केलेले प्रतिमाभंजन हे पवारांच्या अनुयायांना डॅमेज करणारे वाटत नाही किंवा पवारांच्या अनुयायांमध्ये घुसत नाही. पण महाराष्ट्रावर मात्र विशेषतः सर्वसामान्य जनतेवर मात्र त्याच्या परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. याची साक्ष संभाजीनगरच्या सभेने दिली आहे.
– मुंडेंनी केलेल्या प्रतिमाभंजना पुढे राज ठाकरे पोहोचतील??
हा केवळ पवारांच्या प्रतिमावर्धनाचा किंवा प्रतिमाभंजनाचा मुद्दा नाही. त्या चर्चेच्या पलिकडचाही मुद्दा आहे. जसे गोपीनाथ मुंडे पवारांचे प्रतिमाभंजन करण्यात मर्यादित अर्थाने यशस्वी ठरले, तेवढे राज ठाकरे यशस्वी ठरतील का…?? मुंडे यांच्या मागे एक मोठी पक्ष कार्यक्षम संघटना होती, तेवढी राज ठाकरे यांच्या मागे उभे राहील का…?? पवारांच्या प्रतिमाभंजनातून राज ठाकरे स्वतःचे किती प्रतिमावर्धन करू शकतील…??, हे प्रश्न नक्की महत्त्वाचे आहेत, पण जर पवारांच्या प्रतिमाभंजना पुरता विषय मर्यादित ठेवला तर गोपीनाथ मुंडे जेवढे पवारांचे प्रतिमाभंजन करू शकले, त्याची मर्यादा राज ठाकरे ओलांडू शकतील का??, पवारांच्या राजकारणाचा खरा जातिवादी चेहरा ते महाराष्ट्र समोर आणू शकतील का…?? याचे उत्तर नजीकच्या राजकीय भविष्यात दडले आहे.
Has this new “political experiment” of dismantling Pawar’s image started by targeting Sharad Pawar?
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!