कोणतंही रॉकेट आकाशात प्रक्षेपित करताना त्यात अनेक स्टेज वापरल्या जातात. रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९० टक्के पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून कार्य संपलेल्या टाक्या ह्या मुख्य रॉकेट पासून विलग होऊन पृथ्वीवर पडतात अथवा वातावरणात नष्ट होतात. जगातील जवळपास प्रत्येक रॉकेट ह्याच तत्वावर काम करते. ह्यातील प्रत्येक विलग झालेल्या टाक्यांना आपण स्टेज असं म्हणतो. रॉकेट हे स्टेज मध्ये काम करत आपल्यावर असलेल्या उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करते. Fuel tanks returning after rocket launch
आजवर जगातील सगळेच देश प्रत्येक वेळी नवीन नवीन टाक्या प्रत्येक उड्डाणाला वापरत होते. पण जसजसे नवीन देशांकडे हे तंत्रज्ञान आलं तशी स्पर्धा वाढत गेली. मग सुरु झालं ते किमतीचं युद्ध. अमेरिकेच्या स्पेस एक्स ह्या कंपनीने पहिल्यांदा ह्या टाक्या पुन्हा जमिनीवर उतरवण्याची कल्पना मांडली आणि त्याला मूर्त स्वरूपहि दिलं. ह्यामुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या खर्चात कमालीची बचत होणार आहे. आज उपग्रह प्रक्षेपण बाजाराची उलाढाल जवळपास ३९,००० हजार कोटी रुपये आहे. पुढल्या अवघ्या तीन वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत ह्याची उलाढाल ५०,००० हजार कोटी पेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. २००९ पर्यंत ० टक्के वाटा असणारी स्पेस एक्स कंपनी आपल्या इंधन टाक्या पुन्हा वापरणाच्या तंत्रज्ञानामुळे २०१८ साली बाजारातील ५० टक्के वाटा राखून आहे. इंधन टाक्या किंवा स्टेज ह्याला पुन्हा कसं वापरता येईल अथवा त्याचा कसा योग्य वापर केला जातो ह्यावर बाजारातील सर्वांचा वाटा अवलंबून असणार आहे. इस्रोनेही अश्या पद्धतीच्या रॉकेट तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरवात केली आहे. इस्रो व्ही.टी.व्ही.एल. हे तंत्रज्ञान वापरून रॉकेट ची पहिली स्टेज तर आर.एल.व्ही. सारखं तंत्रज्ञान वापरून ज्यात दुसऱ्या टप्प्यातील स्टेज हि हवेत विमानाप्रमाणे ग्लाईड करून योग्य ठिकाणी उतरवणार आहे.