अयोध्येला 20 दिनांकालाच पोहोचलो. तिथे लाखो भक्त येणार असून उशीर झाल्यास अयोध्येत प्रवेश करणे कठीण होईल अशी सूचना आयोजकांनी दिल्यामुळे आधीच पोहोचणे श्रेयस्कर होते. त्यादिवशी मुंबई विमानतळावर पोहोचलो आणि आश्चर्याचा पहिला धक्का बसला. हिंदू समाजाची मानसिकता किती वेगाने बदलत आहे याची पहिली साक्ष मला विमानतळावर प्रवेश करतानाच मिळाली. सुरक्षा अधिकाऱ्याने माझे स्वागत “जय श्रीराम” म्हणून केले. experiences of ranjit savarkar attending the inauguration of shriram temple in ayodhya
2 – 3 वर्षांपूर्वी पर्यंत आपण हिंदू आहोत हे सांगायला जिथे लाज वाटत होती तिथे आज शासकीय सेवक पण ‘जय श्रीराम’ या शब्दांनी अभिवादन करताना पाहून आनंद झाला. दुसरा धक्का म्हणजे आत चक्क रामधून वाजत होती. विमानाची प्रतीक्षा करत असतानाच नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री भेटले. त्याचबरोबर नवीन संसद भवनाची संपूर्ण अंतर्गत सजावट करणारे नरसी कुलारिया आणि त्यांचे बंधू पण भेटले. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत आहोत याची भावना तिथे सगळ्यांच्याच मनात होती आणि वारंवार होणाऱ्या “जय श्रीराम”च्या घोषात ती प्रकट होत होती.
विमानाची चाके ज्या क्षणी अयोध्येच्या भूमीवर टेकली संपूर्ण विमानच “जय श्रीराम”च्या घोषाने निनादले. विमानतळावरून अयोध्या नगरीत प्रवेश करतानाच जनतेचा उत्साह किती अपार आहे याचा प्रत्यय आला. खरे तर दिनांक 20 पासून 3 दिवस दर्शन बंद होते. जनतेसाठी दर्शन 23 दिनांक पासून सुरू होणार होते. परंतु मंदिरात जाता आले नाही तरी अयोध्येच्या भूमीवर ह्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक क्षणी आपण उपस्थित झाले पाहिजे या भावनेने हजारो लोकांचा प्रवाह, सहकुटुंब, मिळेल त्या वाहनाने अयोध्येच्या दिशेने सुरू होता. अयोध्येत केवळ निमंत्रितांच्या वाहनांनाच प्रवेश असल्याने, सर्वसामान्य राम भक्तांना पुढील प्रवास पायी करणे भाग होते. परंतु कडाक्याच्या थंडीतही हातात सामान, खांद्यावर लहान मुले अशा परिस्थितीत उत्साहाने जय श्रीराम चा घोष करत पायी चालणारा ओघ बघितल्यावर मनात कुठेतरी लाजही वाटली. केवळ निमंत्रित असल्यामुळे मिळणारी विशेष वागणूक खटकू लागली होती.
अर्थात नंतर उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमूहामुळे अतिथींसाठी केलेली विशेष व्यवस्था कोलमडून पडली आणि लवकरच आम्ही देखील सर्वसामान्य जनसमूहाचा एक भाग झालो. संपर्काअभावी राहायचे कुठे हेच कळत नव्हते. दिवसभर धुक्याचे प्रचंड आवरण होते आणि आता थंडी वाढू लागली होती. संध्याकाळ होईपर्यंत व्यवस्था न झाल्याने शेवटी वाहन चालकाने माझी व्यवस्था एका धर्मशाळेत केली. खिडक्या उघड्या असलेल्या या खोलीत रात्र घालवणे म्हणजे एक दिव्यच होते. सकाळपर्यंत पाय पूर्ण गारठून गेले होते. थंडीच्या कडाक्याने एक क्षणही झोपणे अशक्य झाले होते. सकाळी लक्षात आले की ह्या दिव्य क्षणाचा साक्षीदार व्हायचं असेल तर त्यासाठी काहीतरी कष्ट भोगणे आवश्यक होते. परिस्थितीने विशेष निमंत्रित आणि जनसामान्य यातील भेदभावच मिटवून टाकला होता.
माझा मित्र अविनाश संगमनेरकर गेली अनेक वर्षे आपला संपूर्ण वेळ मंदिर निर्मितीसाठी देत आहे. पण त्याच्या व्यग्रतेमुळे आमची भेट होणे अशक्य होते. तरीही त्याने त्याचे स्नेही श्री सूर्यकुमार पांडे यांची भेट घडवून दिली आणि त्यानंतर पुढील दोन दिवस तरुण, उत्साही सूर्यकुमार स्वतःचे वाहन घेऊन पूर्णवेळ माझ्याबरोबरच होते. हिंदुस्तान पोस्ट चे दिल्ली प्रतिनिधी नरेश वत्स हे देखील माझ्याबरोबरच होते.
अयोध्येतील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा
पूर्वीच्या फैजाबाद येथील शहीद चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला भेट देणे हा माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचा एक भाग होता. सूर्यकुमार तिथे आधीच जाऊन आले होते आणि सावरकर पुतळ्यावरील रंग उडालेला पाहून त्याच्या रंगकामाची खटपट देखील त्यांनी केली होती. परंतु प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सगळेच कारागीर गुंतल्याने ते करणे शक्य झाले नाही. परंतु आम्ही तिथे जाऊन त्या पुतळ्याचे फोटो काढत असल्याचे बघितल्यावर समोरच व्यवसाय करणारे छायाचित्रकार श्री अश्वनी साहू तिथे आले आणि पुतळा साफ करण्यासाठी पाण्या बरोबर रंगही घेऊन आले. सावरकरांच्या पुतळ्याचे छायाचित्रण वाईट अवस्थेत होऊ नये याबद्दलच्या त्यांच्या भावना, क्रांतीकारकांबद्दल जनतेच्या मनातील आदर किती वाढला आहे याच्या निदर्शक होत्या.
प्रभू रामचंद्राची कुलदेवी माता बडी देवकाली
अयोध्येतील मंदिरात जाण्यासाठी माता बडी देवकाली यांचे दर्शन अवश्य घ्यावे या अविनाशच्या सूचनेनुसार आम्ही त्या मंदिरात गेलो. समोरच असलेले एक प्रचंड कुंड बघून अत्यंत प्रसन्न वाटले. या कुंडाच्या चारही कोपऱ्यात पुरुषांच्या स्नानासाठी छत्र्या बांधल्या होत्या आणि एका ठिकाणी महिलांना स्नान करता यावे यासाठी विशेष आडोसा निर्माण केला होता. इथे प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेचा मुक्त वावर होता. अर्थात पुढे संपूर्ण अयोध्येत हेच चित्र पाहिले.
या मंदिरात लक्ष्मी सरस्वती आणि काली अशा तिन्ही देवतांच्या संयुक्त रूपात माता देवकाली विराजमान होती. देवकालीच्या मंदिरासमोर कौशल्या माता आणि तान्ह्या श्रीरामचंद्रांचे मंदिर होते, ज्या योगे प्रभू रामचंद्रांना आपल्या कुलदेवतेचे मुखदर्शन थेट व्हावे. बाबर सेनेच्या आक्रमणाला विरोध करून जी मंदिरे हिंदू समाजाने आपले बलिदान देत सुरक्षित राखली त्या मोजक्या मंदिरांपैकी एक मंदिर बडी देवकालीचे होते. हे मंदिर हिंदूंच्या अथक संघर्षाचे एक प्रतीक आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान!
मंदिराच्या महंतांशी बोलताना त्यांची एक वेदना जाणवली. प्रथेप्रमाणे प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण सर्वप्रथम कुलदेवीला देणे आवश्यक असले तरी यावेळी मात्र ते मिळाले नाही. अर्थात पाचशे वर्षानंतर होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या गडबडीत ही चूक झाली असेल या भावनेने बडी देवकालीच्या मंदिरातही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा होत होता.
सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे याची कल्पना आम्हाला पुन्हा अयोध्येत शिरताना झाली. प्रत्येक चौकात माझे निमंत्रण पत्र दाखवल्यावरच वाहनाला पुढे जाता येत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जनप्रवाह अयोध्येत दाखल होतच होता. आणि हे चित्र आम्ही प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येच्या बाहेर पडलो तेव्हाही कायम होते. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातून प्रचंड संख्येने लोक अयोध्येच्या दिशेने येत होते आणि परिणामी अयोध्येकडे येणारे महामार्ग वाहतूक कोंडीने ग्रस्त झाले होते. त्यातच लखनऊ आणि अयोध्या येथील विमानतळ दिनांक 21 ला सायंकाळ पर्यंत धुक्यामुळे बंद झाले होते.
महाराष्ट्रातील माध्यमांचे प्रतिनिधी लता मंगेशकर चौकात उपस्थित होते. परंतु त्यांच्या विनंतीवरून त्यांना भेटण्यास जात असताना वाहतूक कोंडीमुळे तिथे पोहोचता येणे अशक्य झाले.
प्राण प्रतिष्ठा समारोह
२२ ला सकाळी उठलो तेव्हा मनात प्रचंड हुरहूर दाटली होती. अविनाशच्या ओळखीमुळे २१ च्या रात्री निवासाची चांगली व्यवस्था झाली होती. इथून राम जन्मभूमीकडे जाताना एकूण गर्दी बघून पायी जाण्याचे ठरवले. अर्थात आता केवळ निमंत्रितांनाच येथे प्रवेश होता. ठिकठिकाणी प्रचंड जनसमुदाय दाटला होता. मला वाटले की लोकांना आपला हेवा वाटत असेल. परंतु ‘आप तो बडे भाग्यशाली है, रामलल्ला से हमारा प्रणाम पहुचाना’ या शब्दात, जय श्रीराम च्या घोषात लोक आपल्या भावना व्यक्त करत होते.
जन्मभूमी चे दर्शन
सुग्रीव किल्ल्याजवळ असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दुतर्फा हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक स्वागतासाठी उपस्थित होते. आत साधूजनांनी कपाळावर तिलक केला आणि रामनामांकित उपरणे घालून स्वागत केले तेव्हा भावना उचंबळून आल्या. मंदिरात प्रवेश करण्याआधी पादत्राणे ठेवण्यासाठी शिस्तबद्ध व्यवस्था होती. “आप मंदिर मे प्रवेश कर रहे हो, कृपया जुते को स्पर्श न करे ” असे सांगत तिथल्या स्वयंसेवकाने स्वतःच्या हाताने माझ्या चपला उचलून पिशवीत ठेवल्या आणि मला एक बिल्ला दिला. या प्रचंड जनसमुहात मी एकटाच असलो तरी जणू काही आपली जुनीच ओळख आहे अशा शब्दात प्रत्येक जण सुस्मित वदनाने स्वागत करत असल्याने एकटेपणाची भावना कधीच संपली होती. प्रत्येक जण ‘आप कहा से आये’ असे एकमेकांना विचारत स्वतःचाही परिचय करून देत होता. आज शिरल्यानंतर माझ्या विभागात स्थानापन्न झालो आणि लगेचच पुण्याचा समीर दरेकर भेटला. त्याच्यासोबतच त्याची पत्नी तेजस्विनी सावंत उपस्थित होती. तेजस्विनी भारताची अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलम्पिक नेमबाज आहे. त्यांच्याबरोबरच भारताची ख्यातीप्राप्त नेमबाज आणि जागतिक ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ अंजली भागवत ही होती. पुढील संपूर्ण समारोह या तिघांबरोबरच बघितला. स्थानापन्न झाल्यावर मागून ‘रणजित’ असा आवाज आला आणि बघतो तो नामवंत चित्रकार सुहास बहुळकर दिसले. त्यांच्या बरोबर मराठी अभिनेते सुनील बर्वे आणि संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार ही होते. या सगळ्या जवळच्या माणसांबरोबर या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होणे हा एक वेगळा आनंद होता.
11.00 वाजता शंखनादाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनाला प्रफुल्लित करणारा शंख ध्वनी आमच्या शत्रूंना गर्भगळीत करण्यास समर्थ होता. त्यानंतर भारतातील विविध राज्यातील वादकांनी 26 वाद्यांचे वादन सादर करत भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले. शंकर महादेवन आणि अनुराधा पौडवाल यांनी आपल्या भक्ती संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षी होत आहोत ही भावना प्रत्येक क्षणी मनात प्रबळ होत होती. जन्मभूमी न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी या राष्ट्र मंदिराच्या निर्मितीसाठी कोणी कोणी योगदान दिले याची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाचा नामोल्लेख होत असताना उपस्थितांकडून “जय श्रीराम”च्या जयघोषात त्यांचे अभिनंदनही होत होते. हे सगळे होत असताना प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ येत होता.
… आणि इतक्यात घोषणा झाली की हातात चांदीचे छत्र घेऊन भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी मंदिरात प्रवेश करत आहेत. भारताचा राजपुरुष हा भारताची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पायी प्रवेश करताना बघितले आणि एक वेगळीच धन्यता वाटली. तथाकथित निधार्मिकतेच्या नादात बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारे राज्यकर्ते आजवर बघत आलो असताना हे दृश्य खरोखरच अभिमानास्पद वाटले. हिंदूंचे सत्व आणि सामर्थ्य जागृत झाल्याचाच हा परिणाम होता. ही केवळ भक्तीची भावना नव्हती तर हिंदूंचा एक राष्ट्र म्हणून पुनर्जन्म होत असल्याची साक्ष होती. साधुसंतांना विनम्रपणे मान झुकवून प्रणाम करत मंदिरात प्रवेश करणारे भारताचे प्रधानमंत्री, हिंदुत्वाच्या अस्मितेचे पुनरुत्थान होत असल्याची जणूकाही ग्वाही देत होते.
मंदिराच्या आतील दृश्य भव्य पडद्यांवर दिसत होते, प्राणप्रतिष्ठेचे मंत्र वातावरण पवित्र करत होते. उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. डोळ्यात प्राण आणून लोक प्राणपप्रतिष्ठेचा सोहळा बघत होते. आणि अखेर ती घडी आली. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि प्रभू रामचंद्राचे मुखदर्शन पडद्यावर झाले. याप्रसंगी भारतीय वायुदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी संपूर्ण जन्मभूमी परिसरावर पुष्पवृष्टी केली. ‘जय श्रीराम’ या घोषात परिसर निनादून गेला. प्रत्येक जण एक दुसऱ्याचे अभिवादन करत होते. एक समर्थ राष्ट्र म्हणून आपण पुन्हा जन्मलो याचा विश्वास प्रत्येकाच्या मनात दिसत होता. शतकांच्या गुलामगिरीने खच्ची झालेले हिंदू जनमानस आज पुन्हा स्वाभिमानाने प्रमुदित झाले होते.
भारताची वाटचाल एका समर्थ आणि संपन्न राष्ट्राकडे होत असल्यामुळे जनमानसात निर्माण झालेला हा क्रांतिकारी बदल देशाच्या भवितव्याची उज्वल ग्वाही देत होता. भारताची घोडदौड आता कुणी कधीच रोखू शकणार नाही असा विश्वास ह्या ऐतिहासिक क्षणाने निर्माण झाला आहे.
आणि केवळ अयोध्याच नाही तर भारतातील प्रत्येक नगरीत, घरात, देवळात त्या क्षणी प्राणप्रतिष्ठेचा पुण्य क्षण साजरा होत होता.
त्या क्षणी संपूर्ण भारत एकाच विचाराने भारला गेला होता- आणि हा विचार होता
‘रामराज्याची स्थापना’!
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित असलेल्या जातपातविरहित हिंदू समाजाची निर्मिती प्रत्यक्षात आणण्याची क्षमता केवळ प्रभू रामचंद्रात आहे आणि म्हणूनच या ऐतिहासिक क्षणी देशाची वाटचाल समर्थ एकसंघ हिंदू समाजाकडे सुरू झाली आहे.
भक्तीचे रूपांतर राष्ट्रभक्तीत झाले आणि या भक्तीला शक्तीची जोड मिळाली तर भारताचे भवितव्य निश्चितच उज्वल आहे.
आणि दुसऱ्या दिवशी – मुक्काम लखनौ
आज दिनांक २३ला सकाळी हा वृत्तांत लिहीत असतानाच हॉटेल बाहेरून सैनिकी संचलनाचा आवाज आला. हे सैनिकी संचलन म्हणजे प्राणप्रतिष्ठेनंतर लक्ष्मणाच्या नगरीत प्रभू रामचंद्राला दिलेली शक्तिवंदनाच होती. या संचलनात केवळ सैन्यदले आणि पोलीसच सामील नव्हते तर हजारोंच्या संख्येने युवक वर्ग शिस्तबद्ध संचलन करीत सहभागी झाला होता. ‘राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महामंत्राने ८५ वर्षानंतर अखेरीस मूर्त रूप धारण केले आहे .
अयोध्येत बघितलेल्या अफाट जनसागराची भक्ती केवळ आध्यात्मिक नव्हती तर तिचे राष्ट्रभक्तीत झालेले रूपांतर प्रत्यक्ष बघितले. आणि भक्ती असो वा राष्ट्रभक्ती, सैनिकी सामर्थ्याशिवाय ती पांगळीच असते. पाचशे वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचे मंदिर उध्वस्त झाले कारण आम्ही आमची सैनिकी क्षमता गमावली होती.
आज भारत पुन्हा समर्थ आणि संपन्न होत आहे. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्राला मानवंदना देण्यासाठी लक्ष्मणाच्या नगरीत म्हणजे लखनऊमध्ये झालेले सैनिकी संचलन हे आपल्या शत्रूला देण्यात येणारा इशाराच आहे. आम्हाला शांती नेहमीच प्रिय आहे आणि ती प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्यही आमच्यात आहे हाच तो संदेश आहे. भक्तीच्या मार्गाने शक्तीकडे होत असलेला आमचा प्रवास हाच आमचे स्वातंत्र्य, संस्कृती, आस्था आणि विचार अबाधित ठेवण्याचा मार्ग आहे.
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत)
सौजन्य : हिंदुस्थान पोस्ट
experiences of ranjit savarkar attending the inauguration of shriram temple in ayodhya
महत्वाच्या बातम्या
- CISFच्या हाती संसदेची सुरक्षा; बजेट सेशनपूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना यंत्रणा समजावी म्हणून दिली जबाबदारी
- देशात राम भक्तीची लाट वगैरे काही नाही; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची दर्पोक्ती!!
- न्यू हॅम्पशायर निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निक्की हेली यांचा पराभव; रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढे
- बाबरी मशिदीचे मुख्य पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी म्हणाले- भाजपनेच राम मंदिराचा मुद्दा संपवला!