सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला परोपकार येतो कुठून? आणि का? हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी? जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा? मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा फिटनेस कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून किंवा इतरांकडून पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही.Experience also plays an important role in the formation of the brain
स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही? त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं?
ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात? नीतिमत्ता, परोपकार, एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का? असली तर कुठून येतात? आणि का यावीत? हे समजून घेण्याआधी जनुकांवर असलेल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्या. जनुकं मेंदूत बसून दर क्षणी नियंत्रण करत नाहीत. आपल्या वागणुकीत जनुकांचा वाटा मोठा असतो यासारख्या विधानातून काहींना तसा अर्थ प्रतीत होऊ शकत असेल. पण जनुकांचं नियंत्रण हे एखाद्या गाडीच्या ड्रायव्हरप्रमाणे नसतं. जनुकं ही ती गाडी कशी असेल, तिचा आकार केवढा असेल, किती वेगाने जाऊ शकेल, किती पटकन अॅक्सिलरेट होऊ शकेल, वळणं किती सहज घेऊ शकेल, किती स्थिर असेल यासारखे घटक ठरवू शकतात. आणि माणसाचं शरीर हे मोटारीसारखं सोपं नसतं. ते कसं वाढतं, त्याला काय अन्न मिळतं यावरून बदलू शकतं.
मोटारीचा ड्रायव्हर असलेला मेंदूही जनुकांनीच बनवलेला असला तरीही त्याची जडणघडण कशी झाली आहे, तो कुठल्या अनुभवांतून गेलेला आहे यामुळे सगळी गणितं बदलतात. थोडक्यात जनुकांचं आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी असलेलं योगदान अप्रत्यक्ष प्रकारचं असतं. शेवटी मेंदूच्या जडणघडणीत त्याच्या अनुभवालाही स्थान असतेच.