गेल्या काही वर्षांत देशात मधुमेह तसेच रक्तदाब असलेल्या व्यक्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपण नेहमी बोलतो, वाचतो, ऐकतो. गेल्या काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आपण अनेक अशा गोष्टी वापरत आहोत त्यामुळे शरीराला व्यायामच मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळेच अनावश्यक व्याधी जडू लागल्या आहेत. त्यावर एका अभ्यासाने शिक्कामोर्तब केले आहे. या अहवालानुसार जगात भारतातील लोक दिवसभरात कमी चालतात असे म्हटले आहे. Every Indian walks only 4297 steps a day
भारतातले लोक जगातील इतर देशांच्या तुलनेत दिवसभरात कमी चालतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. जगातील प्रातिनिधीक म्हणून सर्व खंडातील सेहेचाळीस देशांची पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आला. यात भारत चक्क 39 व्या क्रमांकावर आहे. भारतात साधारणतः एक मनुष्य दिवसाला 4297 पावलं चालतो. यात पुरुष 4606 तर महिला 3684 पावलं चालतात. हाँगकाँग हा जगात सर्वात जास्त चालणाऱ्या लोकांचा देश म्हणून पुढे आला आहे. हाँगकाँगमध्ये दिवसाला साधारणतः एक मनुष्य 6880 पावलं चालतो.
जगातील इतर देशांतील व्यक्ती या दिवसाला सरासरी 4961 पावलं चालत असल्याचं अहवालातून उघड झालंय. खरे पाहिल्यास हाँगकाँग आपल्यापेक्षा अधिक समृद्ध देश आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेथे जवळपास प्रत्येक घऱत चारचाकी वहान आहे. तरीही तेथील लोक पायी चालतातच. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. आपल्याकडे मात्र आपण आता अगदी घराच्या जवळ जरी जायचे झाले असले तरी दुचाकी मोटारसायकल वापरतो. खरे तर पायी जाण्यास काहीच हरकत नसती अशा ठिकाणीही आपण दुचाकीच वापरतो. प्रत्येकाने रोज किमान तीस मिनिटे चालावे. त्यामुळे दोनशे कॅलरी उर्जा खर्च होते.