अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापिठाच्या भूवैज्ञानिकांच्या अनुमानानुसार, झाडाच्या बुंध्यावरील वलयांनी आपल्या आकाशगंगेजवळील सुपरनोव्हांची म्हणजेच महाविस्फोटाची नोंद घेतल्याचे दिसते. विश्वागमधील सर्वांत प्रकाशमान आणि ऊर्जावान घटना म्हणजे सुपरनोव्हा! मोठाल्या ताऱ्यांचा स्फोट म्हणजेच सुपरनोव्हा होय. आपला सूर्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात जेवढी ऊर्जा आणि प्रकाश बाहेर टाकेल, तेवढा प्रकाश आणि ऊर्जा या घटनेतून बाहेर पडते. आपल्या शेजारच्या आकाशगंगेतील सुपरनोव्हांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम झाल्याची शक्येता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमधील घातक किरणांचा ओझोन थरावर आणि मानवी सभ्यतेवर परिणाम झाल्याची दाट शक्यवता आहे. मागील चाळीस हजार वर्षामध्ये आपल्या आकाशगंगेजवळ किमान चार सुपरोनोव्हा घडून गेल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. या सगळ्या परिणामांची नोद झाडांच्या बुंध्यांमधील गोलाकार वलयांनी घेतल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. Eight supernovae near Earth in 40,000 years
पृथ्वीवर कार्बन 14 किंवा रेडिओ कार्बन नावाचे एक समस्थानिक अगदी नगण्य प्रमाणात आढळते. ब्रह्मांडातून येणाऱ्या अतीऊर्जावान किरणांमुळे आकाशामध्ये हे समस्थानिक तयार झाले आहे. वनस्पती जेव्हा कार्बन डायऑक्सा ईड आत घेतात, तेव्हा काही प्रमाणात का होईना कार्बनही शोषला जातो. हजारो वर्ष ही प्रक्रिया स्थिर असते. म्हणजे कार्बन 14 शोषण्याचा दर सारखाच असतो. पण विशिष्ट कालावधीत तो वाढल्यास त्याचा थेट परिणाम झाडांच्या बुंध्यावरील वलयांवर दिसत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. सुपरनोव्हातून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांमुळे पृथ्वीच्या वातावरणातील रेडिओकार्बन निर्माण होण्याचा दर वाढला आणि पर्यायाने त्या कालावधीत झाडांनी शोषलेल्या आणि साठवलेल्या रेडिओकार्बनची संख्याही जास्त आहे. रेडिओकार्बनचा हा फुगवटा थेट बुंध्यावरील वलयांमध्ये उमटला असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. पिढ्यान्पिढ्या झाडांच्या बुंध्यातील ही रचना आणि रेडिओ कार्बनचे अवशेष हस्तांतरित केल्यामुळे हजारो वर्षांतील बदल आपल्याला अभ्यासता येत आहेत.
या सिद्धांताचा वापर करून शास्त्रज्ञांनी मागील चाळीस हजार वर्षांत पृथ्वीजवळ आठ सुपरनोव्हा घडून गेल्याचे अनुमान बांधले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या वेला नक्षत्रातील एक सुपरनोव्हा, जो 815 प्रकाशवर्ष दूर आहे; त्याच्या स्फोटामुळे 13 हजार वर्षापुर्वी पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम केल्याचे स्पष्ट होते.