पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात अजितदादांच्या महत्त्वाकांक्षी पंखांना कात्री लावली हे खरे, पण तेवढेच करून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेगळे वैशिष्ट्य टिकून राहिले का??, हा गंभीर आणि कळीचा सवाल या संपूर्ण प्रकरणात समोर आला.
पार्थ पवारांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना माघार घ्यावी लागली. पार्थ पवार यांच्याविरुद्ध काही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे गुन्हा दाखल झाला नाही. अजित पवारांनी पार्थची मान कायद्याच्या कचाट्यात अडकवली जाणे टाळले. असे असले तरी अजित पवारांची आणि त्यांच्या राष्ट्रवादीची जी काही प्रतिमाहानी व्हायची, ती झालीच. अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंब म्हणजे जमीन घोटाळे हे त्यांचे राजकीय वैशिष्ट्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. कुठलेही पवार कुणाबरोबरही सत्तेत राहिले तरी ते जमीन घोटाळे करणारच हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा समज अधिक दृढ झाला. पण फक्त हे फडणवीस सरकारच्या काळात घडल्यामुळे फडणवीसांवर सुद्धा त्या बदनामीचे शिंतोडे उडाले.
– काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर दादांची “दादागिरी”
एरवी अजित पवार म्हणजे रोखठोक बोलणारा माणूस, अरे ला का रे करणारा माणूस, पण कामे करणारा माणूस अशी प्रतिमा त्यांच्या समर्थकांनी रंगविली. खुद्द अजितदादांनी सुद्धा त्या प्रतिमेला आपल्या वर्तणुकीतून खतपाणी घातले, पण प्रत्यक्ष अजितदादांची वाटेल ती कामे रेटायची आणि मंत्रिमंडळात “सुपर मुख्यमंत्री” म्हणून “दादागिरी” करायची प्रवृत्ती राहिली. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार यांची सगळेच मुख्यमंत्र्यांच्या समोर “दादागिरी” चालायची. अजित दादांची बॉडी लँग्वेज तशीच असायची. अजितदादा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे “पॅरलल” सरकार चालवायचे. काँग्रेसच्या मंत्र्यांचे सोडाच, पण मुख्यमंत्र्यांचेही काही ऐकायचे नाहीत.
– सरकारी यंत्रणा वाकवली असती
त्यामुळे पार्थ पवारांचा हाच कोरेगाव पार्क जमीन घोटाळा जर कुठल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत घडला असता, तर अजित पवार यांनी अजिबात माघार घेतली नसती. उलट दादागिरी करून आपल्या पद्धतीने तो व्यवहार रेटून पुढे नेला असता. आपल्या दादागिरीच्या मूलभूत प्रवृत्तीनुसार सगळी सरकारी यंत्रणा पुरती वाकवून मोडून ठेवली असती. अजित पवारांवर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळा यांचे आरोप झाले. त्या घोटाळ्यांमधल्या रकमा पार्थ पवारांच्या कोरेगाव जमीन घोटाळ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होत्या. परंतु त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अजित पवार नेहमी आक्रमक राहिले. ते त्यावेळच्या विरोधकांना आणि सत्ताधारी काँग्रेसलाच उलट उत्तरे देत राहिले आणि ठोकत राहिले होते.
– अजितदादांना घ्यावी लागली माघार
त्या तुलनेमध्ये अजितदादा भाजपच्या फडणवीस मंत्रिमंडळात “दादागिरी” करू शकले नाहीत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात आपणच मुख्यमंत्र्यांना चौकशी करायला सांगितले असे अजितदादांनी पत्रकारांना कितीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बसून अशा काही चाव्या फिरवल्या होत्या की त्यामुळे पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या चौकशीचा राजकीय वरवंटा मोठ्या प्रमाणात फिरला. त्या चौकशीच्या राजकीय वरवंट्याने पार्थ पवारला कायद्याच्या कचाट्यात अडकविले नाही, पण तो कायद्याचा चिमटा त्याच्या गळ्यापर्यंत आणून ठेवला. अजितदादांनी वेळीच माघार घेतली म्हणून ठीक, अन्यथा बाकीच्या आरोपींप्रमाणे पार्थ पवार वर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, इथपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय आणि कायदेशीर परिस्थिती आणून ठेवली होती. त्या सगळ्यांत अजित पवार कुठलीही नकारात्मक हालचाल करू शकले नव्हते. उलट त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी “वर्षा” बंगल्यावर जावे लागले. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बरोबर घेऊनच पत्रकारांना सामोरे जावे लागले. कोरेगाव पार्कच्या जमीन व्यवहारातून माघार घेतल्याचे जाहीर करावे लागले.
– अजितदादांच्या पंखांना कात्री
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादांनी स्वतः सरकारी यंत्रणांच्या चाव्या फिरवल्या असत्या. आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याकडे हतबलतेने पाहात राहिले असते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अजित पवार तसे करू शकले नाहीत. कारण फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत सरकारी यंत्रणांच्या चाव्या स्वतःच्या हातात ठेवून फिरवल्या होत्या. मुख्यमंत्री म्हणून असणारे सगळे अधिकार फडणवीस यांनी वापरले. त्यांनी राजकीय दृष्ट्या अजितदादांचे महत्त्वाकांक्षी पंख कापले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने काका – पुतणे एक होतील आणि पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात भाजपला त्रास देतील, ही राजकीय शक्यताच फडणवीसांनी कापून टाकली.
आणखी मोठा धडा शिकवता आला असता, पण…
वास्तविक फडणवीसांना या सगळ्या प्रकारात अजित पवारांना आणखी धडा शिकवता आला असता. किंबहुना अजित पवारच काय पण अख्खी पवार फॅमिली महाराष्ट्रात कायद्याच्या कचाट्याच्या बाहेर नाही, हे दाखवून देण्याची संधी आली होती, पण फडणवीसांनी ती संधी घेतली नाही. त्यात महाराष्ट्रातल्या राजकीय अपरिहार्यतेपासून ते केंद्रीय राजकारणाची गुंतागुंत हे सगळे मुद्दे आहेत. ते मान्य करून सुद्धा फडणवीसांनी निर्णायक पद्धतीने अजित पवारांना धडा शिकवला नाही हे सत्य स्वीकारावे लागेल.
Devendra fadnavis clips Ajit Pawar’s wings
महत्वाच्या बातम्या
- पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द; अजित पवारांची पत्रकारांना माहिती; की नवा राजकीय डाव??
- Pakistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला; नागरिकांना केले लक्ष्य; तालिबानचेही प्रत्युत्तर
- Raina Dhawan : रैना आणि धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त; बेटिंग अॅप प्रकरणात ईडीची कारवाई; युवराज आणि सोनू सूद यांचीही चौकशी
- पार्थ पवार कोरेगाव पार्क मधली जमीन शासनाला परत करणार??, की राजकीय वाद + कायद्याच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी नवा डाव??