• Download App
    Amit Shah 2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते "नवा मोदी" बनवायच्या असाईनमेंट वर!!

    2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते “नवा मोदी” बनवायच्या असाईनमेंट वर!!

    नाशिक : सन 2025 साठी काँग्रेसने आपला सगळा राजकीय कार्यक्रम ठरविला असून संपूर्ण वर्षभर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना “टार्गेट” करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. अमित शाह यांनी संसदेमध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यामुळे त्यांनी माफीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे, या एकमेव अजेंड्यावर काँग्रेस अख्ख्या वर्षभराचे राजकारण चालविणार आहे. या अजेंड्यासाठी संपूर्ण देशभर प्रचाराची राळ उडवणार आहे.

    याचा सरळ अर्थ असा की, काँग्रेस आपल्या जुन्या चुकांमधून काहीही शिकलेली नाही. एका मोदींना गुजरात पासून दिल्लीपर्यंत काँग्रेसने वैयक्तिक पातळीवर टार्गेट करून पाहिले, तर नरेंद्र मोदी नावाचे नेतृत्व 15 वर्षे गुजरात मध्ये काम करून गेले, त्यानंतरची 10 वर्षे पंतप्रधान पदावर ठाण मांडून राहिले. काँग्रेसचे मोदी विरोधातले सगळे मूसळ केरात गेले. पण काँग्रेस यातून काही शिकली नाही हेच आता नव्या अमित शाहरुपी वैयक्तिक टार्गेट वरून दिसून येत आहे.

    काँग्रेसने मोदींना हिंदू – मुस्लिम दंगे या विषयावरून टार्गेट करून पाहिले. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेस अमित शाह यांना आंबेडकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर टार्गेट करून दलित – दलितेतर असे सामाजिक ध्रुवीकरण करू पाहात आहे. म्हणजे एकंदरीत जोडण्याच्या ऐवजी तोडण्यावर काँग्रेसचा यातून भर दिसतो आहे आणि इथेच काँग्रेस जुन्या चुकांमधून काही शिकली नाही हे सिद्ध होते.

    वास्तविक ज्यावेळी काँग्रेसने मोदींना टार्गेट करून पाहिले त्यावेळी मोदी आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष शांत बसले नव्हते. त्यांनी आपल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने मोदी नावाचे नेतृत्व विकसित केले. काँग्रेसने हिंदू – मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा वापरली. त्याला काटशह देण्यासाठी मोदींनी “सबका साथ सबका विकास” भाषा वापरून व्यापक हिंदुत्वाचा अजेंडा राबविला. तो यशस्वी करून दाखविला. त्या उलट काँग्रेस अधिकाधिक गाळात जात राहिली. हा गेल्या 10 वर्षांतला वर्तमान रुपी इतिहास आहे. या सगळ्या वेळी अमित शाह हे मोदींच्या सावलीसारखे बरोबर होते, हे विसरून चालणार नाही.

    त्यामुळे आता जरी अमित शाह हे पुढचे वर्षभर काँग्रेसच्या टार्गेटवर असतील, तरी ते स्वतः आणि त्यांच्याबरोबरचा भाजप हातावर हात ठेवून शांत बसतील, असे मानणे चूक ठरेल. काँग्रेसकडे अमित शाह यांच्या विरोधात जेवढा म्हणून राजकीय आणि सामाजिक दारुगोळा भरलेला असेल, त्यापेक्षा जास्त दारुगोळा अमित शाह आणि भाजप गोळा करून ठेवतील आणि तो काँग्रेसवर टप्प्याटप्प्याने सोडत राहतील. त्यावेळी काँग्रेस “प्रतिकाटशह” म्हणून काय करेल??, हा खरा मुद्दा आहे. कारण मोदींच्या विरोधात काँग्रेसचा कुठलाच “प्रतिकाटशह” कामी येऊ शकला नव्हता, हा ताजा इतिहास आहे.

    त्यामुळे अमित शाह यांच्या विरोधातला वर्षभराचा अजेंडा काँग्रेसवरच मध्येच “बुमरँग” होण्याची दाट शक्यता वाटते. शाह यांच्या विरोधात वैयक्तिक आणि एकमेव अजेंडा चालवून त्यांचे नुकसान होण्यापेक्षा त्यांची प्रतिमा निर्मिती “नवा मोदी” म्हणून नाही झाली म्हणजे मिळवलीन्!!

    कारण भाजपही पुढच्या काही वर्षांमध्ये मोदींच्या वारसाच्या शोधात असणारच आहे. अशावेळी काँग्रेसने एकमेव “टार्गेट” म्हणून अमित शाह यांची “निवड” केली असेल, तर ती शाह यांच्या राजकीय भवितव्याच्या विरोधात जाण्याऐवजी राजकीय पथ्यावरच पडण्याची दाट शक्यता आहे. जे मोदींच्या बाबतीत गेल्या 20 वर्षांपासून घडले, तेच पुढच्या वर्षभरात अमित शाह यांच्याबाबतीत घडायला सुरुवात असे झाली, असे व्हायला नको असेल, तर काँग्रेसने अमित शाह विरोधी व्यक्तिगत स्ट्रॅटेजी बद्दल आत्ताच फेरविचार केलेला बरा!!

    Congress will target Amit Shah in a year long agitation, making him “new Modi”!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने, पण अजितदादांनी श्रेय दिले शरद पवारांना; पण ते सत्य किती??