• Download App
    काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आता बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा; ही तर त्यांचे राजकारण भाजप मागे फरफटल्याची दिशा!! Congress - NCP leaders now contemplate to increase booth centric vote share for their parties

    काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आता बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा; ही तर त्यांचे राजकारण भाजप मागे फरफटल्याची दिशा!!

    नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांमध्ये पक्षांतराची लाट आलेली असताना भाजपने काँग्रेस मधले अनेक दिग्गज नेते फोडून आपल्याकडे घेतले. आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रवेश दिला आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटलांना भाजपमध्ये सांगून घेतले सामावून घेतले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या तोंडी काँग्रेसने आता बूथ केंद्रित मतदान वाढविले पाहिजे, अशी भाषा आली. Congress – NCP leaders now contemplate to increase booth centric vote share for their parties

    मराठवाड्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी लोकसभा निवडणुकीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तिथेच असून आता त्यांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचा जनतेला वीट आला असून आता एक वेगळी लाट निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला.

    लातूर लोकसभा मतदारसंघात स्वतः आपणच उमेदवार आहोत ही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही नक्कीच खेचून आणू, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला, तसेच केवळ भाषणे देवून चालणार नाही, तर गावागावांतील मतदान केंद्रांतून आपल्याच उमेदवाराला सर्वाधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी भाषा अमित देशमुख यांनी वापरली.

    पण बूथ केंद्रित मतदार वाढवण्याची भाषा करणारे आता अमित देशमुख हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतले एकमेव नेते नाहीत. त्याआधी जयंत पाटलांनी सांगली मतदारसंघात अशाच प्रकारची भाषा वापरली होती. जास्तीत जास्त बूथ कमिट्या स्थापन करा. प्रत्येक बुथ मध्ये मतदारांची छाननी करा. तिथे आपले मतदार कसे वाढतील आणि ते प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान कसे करतील, हे बारकाईने पाहा, अशा सूचना जयंत पाटलांनी दिल्या होत्या.

    अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्या तोंडी यांच्यासारख्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी बूथ केंद्रित मतदानाची भाषा मात्र नवीन आहे. ही खरी भाजपच्या राजकारणाच्या पाठीमागे झालेली काँग्रेस – राष्ट्रवादीची फरफट आहे. कारण काँग्रेस – राष्ट्रवादीला अशा प्रकारे बूथ केंद्रित मतदान करणे, ते मतदान वाढविणे वगैरे काम करण्याची सवय नव्हती. किंबहुना काँग्रेसच्या ऐन बहराच्या काळात “बूथ कॅप्चरिंग” हा शब्द मात्र त्या पक्षाशी निश्चित जोडला गेला होता. बूथ कॅप्चर करणे, मतपेट्या पळवणे वगैरे उद्योग काँग्रेस आणि काँग्रेसी संस्कृतीतले राजकीय पक्ष त्यावेळी “स्वबळावर” करत असत. कारण त्यावेळी त्यांची ताकद अफाट होती. त्यामुळे त्यांना विरोध करणे त्या वेळच्या विरोधकांना म्हणजे भाजपला किंवा शिवसेनेला शक्य होत नसे. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात भाजप आणि शिवसेना यांचे अस्तित्व नगण्य होते.

    पण भाजपने टप्प्याटप्प्याने संघटना वाढवत नेली. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा आधार मिळाला. 2014 नंतर भाजपला प्रचंड अनुकूल काळाला आणि भाजपने बूथ केंद्रित मतदार यंत्रणा विणत पक्की विणून काढली. त्याचा लाभ भाजपला प्रत्येक राज्यातल्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मिळाला.

    वास्तविक केल्या 10 वर्षांमध्ये विधानसभांच्या 50% निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश , राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये भाजपला जागांच्या संख्येत पराभवाचा सामना करावा लागला, पण बूथ केंद्रित मतदानाच्या आधारे भाजपची टक्केवारी मात्र तिथे फारशी घटलेली नव्हती. याचा अर्थ भाजपने बूथ केंद्रित मतदानाची यंत्रणा पक्की विणली आहे हे सिद्ध झाले.

    आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अशीच बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा करत आहेत, जी त्यांच्या राजकीय संस्कृतीशी विसंगत आहे. कारण काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या पद्धतीचे कामकाज करण्याची सवय नव्हती.

    सहकारी संस्थांचे निवडणूक मॅनेजमेंट

    वास्तविक विविध निवडणूक शास्त्रांमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते पारंगत होते. विविध सहकारी संस्था, दूध संस्था, सहकारी बँका, साखर कारखाने यांच्या निवडणुकांचे मॅनेजमेंट काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते करतच होते, पण त्या पलीकडे जाऊन विधानसभा – लोकसभा या काही लाखांच्या मतदारसंघांचे मॅनेजमेंट काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या 30-40 वर्षांमध्ये केवळ परसेप्शनच्या आधारे केले. ज्यावेळी त्यांच्याकडे इंदिरा गांधी राजीव गांधींसारखे लोकप्रिय नेते होते, त्यावेळी त्यांची निवडणूक मॅनेजमेंट धकून गेली. त्यांना प्रचंड विजय मिळाला, पण लोकप्रिय नेत्यांची वानवा भासली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणाच कोलमडली, की जी कधी स्वबळावर उभीच राहू शकलेली नव्हती!! संघटनात्मक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हा दोष हळूहळू वाढत गेला आणि त्याने आता एका मोठ्या राजकीय रोगाचे रूपांतर धारण केले आहे.

    त्यामुळे अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या तोंडी जरी बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा आली असली तरी, तिचे आजचे महत्व “बैल गेला आणि झोपा केला” याच म्हणीप्रमाणे ठरणार आहे. कारण गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपने बूथ केंद्रित मतदानाची यंत्रणा विणून पक्की केली. त्या काळात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बूथ केंद्रित मतदानावर लक्ष देखील दिले नाही. आता मात्र त्यांना निवडणुकीत यश मिळवण्याची प्रचंड तहान लागली असताना त्यांनी बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची विहीर खणायला घेतली आहे. आता ही विहीर खणून होणार कधी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची मतदार वाढण्याची तहान भागणार कधी??, हा कळीचा सवाल तयार झाला आहे.

    Congress – NCP leaders now contemplate to increase booth centric vote share for their parties

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!