महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली. फडणवीस कसे भारी नेते बनलेत, याचे सविस्तर वर्णन केले. त्याचवेळी मराठी माध्यमांनी आणि सोशल मीडियातल्या पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व शैलीची तुलना शरद पवारांच्या नेतृत्व शैलीशी केली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले पुढचे “शरद पवार” आहेत, असे अगदी भाऊ तोरसेकर किंवा यदु जोशी हे देखील म्हणाले.
अर्थात कुणी कुणाची तुलना कुणाशी करावी??, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि अधिकार आहे. त्याबद्दल काही म्हणायचे कारण नाही पण म्हणून त्यांनी केलेली तशी तुलना योग्यच आणि 100 % खरी आहे असे मानायचे देखील कारण नाही. कारण ज्या दोन नेत्यांमध्ये तुलना केली जाते, त्या दोन नेत्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी आणि राजकारण शैली जशीच्या तशी समान असेलच असे अजिबात नाही. किंबहुना शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करताना अनेकांनी या दोघांनी महाराष्ट्रात घडवून आणलेल्या घडामोडी कशा समान आहेत, याचेही वर्णन केले. शरद पवारांनी पक्ष फोडले. आपला पक्ष बळकट केला, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडले आणि अनेक नेते भाजपमध्ये घेतले. त्यांनी भाजप बळकट केला, वगैरे बाता अनेक पत्रकारांनी मारल्या. जणू काही पक्ष फोडणे हे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले साम्य ही दोन्ही नेत्यांमधली “अतिशय उच्च दर्जाची” समानता आहे, असे त्यांनी भासविले. त्याचबरोबर “महाराष्ट्र म्हणजे शरद पवार” म्हणजे तसे इथून पुढे “देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र” असेही भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती नाही त्याचे शब्दांच्या फुलांनी वर्णन केले.
साधी गोष्ट आहे… शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी आणि महत्त्वाकांक्षेविषयी त्यापैकी कुणीही बोलले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी त्याची चर्चाही घडवली नाही. इथे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांची आणि पत्रकारांची कोती आणि खोटी “पवार बुद्धी” दिसली.
वसंतदादांच्या पाठीत खंजीर
वास्तविक शरद पवारांचे सगळे राजकीय कर्तृत्व महाराष्ट्रात फुलले. त्यांच्यावर कुठला राजकीय अन्याय झाला म्हणून त्यांनी पक्ष फोडला असे कधी घडले नाही, तर स्वतःची महत्त्वाकांक्षा गैर लोकशाही मार्गाने पूर्ण करण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस फोडली आणि 1978 मध्ये ते मुख्यमंत्री बनले म्हणून त्यांच्यावर वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा ठपका कायमचा बसला.
जनतेच्या कौलाच्या पाठीत खंजीर
2019 मध्ये सुद्धा शरद पवारांनी लोकशाहीत जनतेने दिलेला कौल अमान्य करून महाविकास आघाडीचे मोट बांधली. 1978 मध्ये त्यांनी वसंतदादा पाटलांच्या म्हणजे फक्त एका नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण 2019 मध्ये त्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसला होता. मात्र दोन्ही वेळी “पवार बुद्धी”च्या माध्यमांनी त्यांची ही कृती राजकीय मुत्सद्देगिरी या शब्दांमध्ये गौरविली होती, पण म्हणून तो गौरव खरा होता आणि उचित होता, असे मानायचे बिलकुल कारण नाही.
राजकीय सूड
त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली किंवा राष्ट्रवादी फोडली ही राजकीय सूडबुद्धी होती. राजकारणात काहीही केले तर चालते, हे तत्त्व जर मान्य केले तरच फडणवीसांच्या या कृतीचे समर्थन करता येईल. पण देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांशी तुलना करताना हे वाक्य कुणी उच्चारलेले दिसले नाही. म्हणूनच शरद पवारांनी पक्ष फोडले तर ती मुत्सद्देगिरी आणि आम्ही पक्ष फोडले तर ते लोकशाही विरोधी असा युक्तिवाद तुम्ही करणार असे देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणू शकले. वास्तविक पत्रकारांनी शरद पवारांनी पक्ष फोडल्याची “मुत्सद्देगिरी” म्हणून भलामण केली नसती, तर फडणवीसांना तसे बोलायचे संधी देखील मिळाली नसती. पण पवार आणि ठाकरे करणार ते “मुत्सद्दी राजकारण” आणि फडणवीस करणार ती “पक्ष फोडी” हा पक्षपात मराठी माध्यमांनी आणि पत्रकारांनी केला.
सत्तेची लालूच असेल किंवा हाती सत्ता असेल तरच माणसे आणि पक्ष फोडता येतात. अन्यथा कुणी तुम्हाला विचारत नाही, हे दारूण सत्य दोघांच्याही बाबतीत लागू होते. पण हे सत्य “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी मान्य केले नाही. ते जाहीरपणे सांगितले नाही. ते फक्त पवारांचे “मुत्सद्दी डेकोरेशन” करत राहिले. भाजप आणि फडणवीसांना हिणवत राहिले. वास्तविक पवार आणि फडणवीस या दोघांनीही सत्तेचेच राजकारण केले. सत्ता हाती होती म्हणूनच ते माणसे आणि पक्ष फोडू शकले. यात दोघांचीही राजकीय बुद्धिमत्ता किंवा कर्तृत्व फार मोठे अव्वल दर्जाचे आहे आणि ते कसाला लागले आहे, असे अजिबात घडलेले नाही.
इथे दोघांची तुलना होऊ शकत नाही
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व आणि राजकीय महत्त्वाकांक्षा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय कर्तृत्व आणि महत्त्वाकांक्षा यांची तुलना कुणीच केली नाही. पवार जसे केंद्रात गेले, तसे फडणवीस केंद्रात जाणार का आणि तिथे जाऊन ते काय करणार की पंतप्रधान होणार वगैरे बाता मराठी माध्यमांनी मारल्या.
पण शरद पवारांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा वैयक्तिक होती आणि आहे, तशी महत्त्वाकांक्षा फडणवीसांनी कधीही जाहीर केलेली नाही, हे सत्य मात्र मराठी माध्यमांनी जाणीवपूर्वक सांगितले नाही.
पवारांना त्यांची खल प्रवृत्ती नडली
शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत. त्यांची ती महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. याला कारणीभूत मराठी माध्यमे किंवा अन्य कुठलेही नेते ठरले नाहीत, तर खुद्द पवारांची राजकीय विश्वासार्हता कमी पडली. त्यांना स्वतःचीच राजकीय खल प्रवृत्ती नडली. त्यांची स्वतःची बुद्धिमत्ता कमी पडली. दिल्लीचे राजकारण खेळवण्यात ते तोकडे पडले. दिल्लीची लॉबी हलविण्यात ते कमी पडले. किंबहुना काँग्रेसच्या सगळ्या कर्तृत्ववान नेत्यांच्या वकुबा पेक्षा आपला वकूब कमी आहे हे ओळखण्यात शरद पवार कमी पडले, हे सत्य मराठी माध्यमांनी कधी स्वीकारले नाही आणि ते सांगितले नाही.
फडणवीसांना पक्के माहिती
त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी कधीही स्वतःची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जाहीर केली नाही. ते ज्या संघ संस्कारात वाढले, तिथे असली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा चालत नाही. त्यातून कुठलेही पद मिळत नाही हे त्यांना पक्के माहिती आहे. किंबहुना कुठले पद मिळणे म्हणजे स्वर्ग दोन बोटे उरणे असे फडणवीसांनी मानले नाही आणि समजा मानले असले, तरी संघ आणि भाजप परिवाराने त्यांना तसे कधी मानू दिले नाही, ही राजकीय वस्तुस्थिती मराठी माध्यमांनी आणि पत्रकारांनी कधीच सांगितली नाही.
फडणवीसांची संघशरणता
शरद पवार हे फार मोठे मुत्सद्दी आणि यशस्वी राजकारणी असल्याच्या बाता मराठी माध्यमांनी कितीही मारल्या, तरी केंद्रीय पातळीवर शरद पवार नेहमी दुय्यम आणि तिय्यम भूमिकेतच राहिले. त्यासाठी इतर कुणीही कारणीभूत ठरले नाही, तर शरद पवारांचे स्वतःचे तोकडे राजकीय कर्तृत्वच त्याला कारण ठरले, फडणवीसांचे अजून तसे झालेले नाही. कारण त्यांनी स्वतःच्या तोंडाने स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर तशी महत्त्वाकांक्षाही बाळगलेली नाही. उलट संघ आणि भाजप सांगेल ते काम करण्याची आपली तयारी आहे. संघ सांगेल तेच आपण आयुष्यभर करू. संघ आणि भाजपने आपल्याला कुठल्याही पदावर बसविले, तर तिथे जाऊन काम करू. घरी जायला सांगितले ते घरी जाऊ, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
हा गौरव नव्हे
त्याउलट शरद पवारांना पंतप्रधान वगैरे तर होता आले नाहीच, पण राजकारणात वाटेल तशा उलथापालथी करून देखील अजून स्वतःच्या मुलीचे राजकीय बस्तान देखील नीट बसवता आलेले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची तुलना शरद पवारांशी करणे हा फडणवीसांचा गौरव असू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने तर तो अजिबातच गौरव नाही.
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
Comparing Devendra fadnavis with Sharad Pawar is not his real praise
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ५० मंत्री-अधिकाऱ्यांचा समावेश, लोढाकडून २०० कोटींची वसूली
- फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळांचे सत्ता वाटप बिनबोभाट!!
- CBSE : सर्व CBSE शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार; कॉरिडॉर, लॅब, एंट्री-एक्झिटवर लक्ष, 15 दिवसांचे रेकॉर्डिंग ठेवावे लागेल
- माणिकराव कोकाटे यांच्यावर अर्धीच कारवाई??, मंत्रिपद नाही तर फक्त कृषी खाते काढणार??