लागोपाठ दोन वर्षं कोकणाला अरबी समुद्रातल्या चक्रीवादळांनी तडाखा दिला आहे. गेल्या वर्षी निसर्ग नावाचं चक्रीवादळ आलं होतं. त्याला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तौते नावाचं चक्रीवादळ कोकणात घोंगावून गेलं आणि प्रचंड नुकसान करून गेलं. हे नुकसान इतकं आहे की प्रशासनाकडून अजून त्याची मोजदाद होऊ शकलेली नाही.
या वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षातले देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले इत्यादी नेते मंडळी येऊन गेली. त्यानंतर आज, २१ मे २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हवाई दौरा झाला. मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या प्रवासामध्ये विमानात ते जेवढा वेळ होते, त्यापेक्षा कमी वेळ दोन जिल्ह्यांमध्ये होते. दोन्ही जिल्ह्यांमधल्या बैठकांमध्ये त्यांचा जेवढा वेळ गेला, तेवढाच काळ ते कोकणात होते. म्हणूनच याला हवाई दौरा म्हणावं लागेल. रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे आकडे सादर केले. त्यानंतर उभ्या उभ्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघून गेले.
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, आम्ही कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही, तर वादळग्रस्तांना मदत करण्यासाठी आलो आहे. या वाक्यातला पहिला भाग त्यांनी अत्यंत बरोबरच सांगितला. त्यांनी वाऱ्यावर सोडलं नाही, तर पाठोपाठच्या दोन वादळांनी त्रस्त होऊन गेलेल्या कोकणवासीयांना असंख्य प्रश्नांच्या वादळामध्ये सोडून ते निघून गेले. मदत करण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणतात ते मात्र काही खरं नाही. वादळाला पाच-सहा दिवस झाले. या काळात त्यांच्यासमोर नुकसानीची कोणती तरी आकडेवारी नक्कीच पोहोचली असणार. त्याशिवाय आजच्या आढावा बैठकीतही त्यांच्यासमोर आकडेवारी आलीच असेल. त्याआधारे त्यांनी भरपाईची घोषणा करायला काहीच हरकत नव्हती. पंचनामे झाल्यानंतर भरपाई जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. हे सांगण्यासाठी त्यांना मुद्दामहून वेळात वेळ काढून कोकणाचा दौरा करण्याची काहीच गरज नव्हती.
उलट या दौऱ्यामध्ये त्यांचा जेवढा वेळ गेला, तेवढा वेळ त्यांनी ऑनलाइन आढावा बैठक घेतली असती, तर बारीक-सारीक अनेक मुद्द्यांवर त्यांना माहिती घेता आली असती आणि वादळाची भीषणता त्यांना समजली असती. ‘हेलिकॉप्टरमधून मी पाहणी केली नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरलो,’ असं जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा पंतप्रधानांनी केलेल्या हवाई दौऱ्यावर टीका करण्याचा त्यांचा उद्देश होता. पण रत्नागिरी तर त्यांनी नुकसानग्रस्त कोणत्याही भागाला भेट दिली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांनी भेटीच्या नियोजित ठिकाणांपैकी काही ठिकाणांना बगल दिली आणि राहिलेला दौराही घाईघाईनं उरकला. मग जमिनीवर उतरून त्यांनी काय केलं? त्यांना ते मुंबईतच आढावा बैठक घेऊनही जाहीर करता आलं असतं.
हा आढावा घेताना यापुढच्या काळात सातत्यानं चक्रीवादळं कोकणात येणार आहेत, या हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे त्यांनी लक्ष दिलं का, त्यासाठी उपाययोजना करण्याबाबत काय करता येईल, याचा विचार केला का हे समजू शकलेलं नाही. पण ते नक्कीच झालेलं असेल. कारण अवघ्या पंधरा-वीस मिनिटांच्या आढावा बैठकीत फक्त जिल्ह्यातली प्रशासनानं तोपर्यंत घाईगर्दीने तयार केलेली आकडेवारी वाचण्यातच वेळ अधिक गेला असणार आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेलं प्रबोधन होईपर्यंत त्यांची जायची वेळ झाली असणार.
गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळतल्या आपद्ग्रस्तांना अजूनही भरपाई मिळालेली नाही, असं सांगितलं जातं. तोपर्यंत हे दुसरं चक्रीवादळ येऊन गेलं. त्याची पाहणी करण्यात आली. त्याचे पंचनामे होतील. त्यानंतर त्यावरची भरपाई घोषित केली जाईल. पण ती प्रत्यक्षात हातात कधी मिळेल, हे सांगता येणार नाही. रत्नागिरीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री पत्रकारांसोबत उभ्या उभ्याच बोलले. मुळात पत्रकार परिषद होऊच नये, अशा तऱ्हेचे आदेश प्रशासनाला मिळाले होते का, असा प्रश्न पडतो. कारण दौऱ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे काल, पत्रकार परिषदेला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या पत्रकारांना करोनाची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची असल्याचं सांगण्यात आलं होतं. ती केली नसेल तर पत्रकार परिषदेला उपस्थित राहता येणार नव्हतं. बहुतेक पत्रकारांना पत्रकार परिषदेला हजर राहता येऊ नये, अशीच ती व्यवस्था होती. नंतर ती अट रद्द करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री अवघी काही मिनिटंच रत्नागिरीत राहणार आहेत, हे प्रशासनाला माहीत होतं. म्हणूनच त्यांनी ती रद्द केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षीच्या वादळातल्या नुकसानभरपाईपासून करोनापर्यंत आणि जिल्हा रुग्णालयापासून मराठा आरक्षणापर्यंत कोकणाविषयीही इतर अनेक प्रश्न पत्रकारांकडून विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घेऊनच पत्रकारांना टाळण्याची व्यवस्था या दौऱ्यात केल्याचं दिसून आलं.
शिवसेनेनं कोकणाला भरभरून दिलं आहे, असं सातत्यानं सांगितलं जातं. मुख्यमंत्र्यांचं कोकणावर खास प्रेम आहे. म्हणूनच कोकणवासीयांची शिवसेनेकडून आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा आहे, असंही सांगितलं जात होतं; पण ते प्रेम मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यात तरी दिसून आलं नाही. गेल्या वर्षीही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते. पण ते सातारा जिल्ह्यात कोयना प्रकल्पाच्या बोगद्यात उतरले. त्यांनी त्या भागाची पाहणी केली आणि ते त्याच मार्गाने पुन्हा निघून गेले. रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या जमिनीला काही त्यांचे त्या वेळी पाय लागले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेळा दौरा झाला. एकदा भुयारातून आणि आता हवेतून. जिल्ह्यातल्या जमिनीवर ते फारच कमी वेळ होते, हे दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही.
क्वचितच जिल्ह्यात येणारे पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी पालकमंत्रिपद सांभाळणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत निष्प्रभ असल्याचं या दौऱ्यात दिसून आलं. रत्नागिरी जिल्ह्याला दोन दोन पालकमंत्री असूनसुद्धा ते मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात तासभरसुद्धा थांबवू शकले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचं एकही ठिकाण ते दाखवू शकले नाहीत.
हे सारं लक्षात घेतलं तर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यातून कोकणाला कसं काहीच मिळालं नाही. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचं पुढे काय होतं, याचाही अनुभव असल्यामुळे पुढेही काही मिळेल, अशी शक्यता नाही. त्या अर्थानं उगाच धावपळीचा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा निष्फळ ठरला असंच म्हणावं लागेल.
उदय सामंत यांचं वजन जास्त?
क्वचितच जिल्ह्यात येणारे रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यापेक्षा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचं मुख्यमंत्र्यांकडे अधिक वजन आहे का, असं आजच्या दौऱ्यानंतर वाटलं. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या वादळग्रस्त एकाही ठिकाणाला भेट दिली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र त्यांनी तीन-चार ठिकाणांची पाहणी आपल्या धावत्या दौऱ्यात केली. अनिल परब मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात एकही ठिकाण दाखवू शकले नाहीत. कारण खुद्द पालकमंत्र्यांनीच जिल्ह्यातल्या एकाही नुकसानग्रस्त ठिकाणाला भेट दिली नव्हती, तर ते मुख्यमंत्र्यांना काय दाखवणार? उदय सामंत मात्र आपत्तीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात ठाण मांडून होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी या आपल्या मतदारसंघातही दौरा करून नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांना आपल्या भागात अधिक वेळ थांबवून अनिल परब यांच्यापेक्षा आपण वरचढ आहोत, त्यांच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन अधिक आहे, हे दाखवून देण्यात उदय सामंत यशस्वी ठरले आहेत.