एखाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं काम तो बरोबर पार पाडतो. आपला मेंदू हा सुद्धा जसा एक अतिशय सुव्यवस्थित चालणारा कारखानाच आहे. इथेही वेगवेगळे अवयव आपापलं काम करत असतात. आपलं काम काय आहे, हे त्यांना नेमकेपणाने माहीत असतं. तरीही ते एकत्र असतात. शिक्षणाशी संबंधित असलेली वेगवेगळी क्षेत्रं आपली कामं कशी करतात, हे बघण्यासाठी मेंदूच्या आत डोकावून बघावं लागतं. मेंदूच्या विविध केंद्रांकडे विविध जबाबदारी सोपवलेली असते. जसं भाषा बोलण्याचं, लिहिण्याचं काम वेगवेगळी केंद्रे करत असतात. मुलांना वाढवताना, त्यांना शिकवताना पालक आणि मुलांना जर या शास्त्रीय बाजूची माहिती असेल तर ते सोपं जातं. यामुळे मुलांना कुठली गोष्ट सोपी आणि कुठली अवघड हे कळू शकतं. त्यामुळे नेमकी कुठे मदत करायची गरज आहे, हे समजतं. मेंदू हा विचार करण्याचा अवयव. Brain Discovery and Enlightenment: A brain-equipped factory that constantly runs through the body
बुद्धीचा अवयव, असं आपण म्हणतो. मात्र आपलं संपूर्ण जीवनच याच्या नियंत्रणात आहे. इथे विविध क्षेत्रं आहेत. ती आपापलं काम करण्यात सतत गर्क असतात. आता तुम्ही एका जागी बसून हा लेख वाचत आहात, तरी तुमचा मेंदू मात्र अक्षरश: धावपळ करतो आहे. डोळ्यांनी वाचायचं व्हिज्युअल कॉर्टेक्सकडे संदेश जाणार. मग भाषा आकलन केंद्राकडे संदेश जाणार. लेख वाचताना मध्येच आपल्याला विषयाशी संबंधित जुन्या आठवणी आठवतात, म्हणजे पेरिएटल कॉर्टेक्सची मदत. वाचताना काही व्यक्ती आठवणार, संवाद आठवणार, प्रसंग आठवणार म्हणजे चित्र उभं राहणार. ते चित्र उभं करायला तर अनेक क्षेत्रांची मदत लागते. मध्येच आपण पुढचं प्लॅनिंग करणार अशा कितीतरी गोष्टी आपल्याही नकळत आतमध्ये चालू आहेत. तेही काही दशांश सेकंदाच्या आत. अशा पद्धतीने दर क्षणाला काम आणि कामच करत असतो आपला मेंदू.