मुलांना शाळा का आवडत नाही, तेथील वातावरणाला तसेच अभ्यासाला ते का घाबरतात याचा फारसा विचार आपल्याकडे केला जात नाही. खरे पाहिल्यास मुलांच्या भावनांना, त्यांच्या मतांना शालेय वर्गामध्ये कुठं स्थान असतं? भीती, अपमान, शिक्षा या नकारात्मक भावना मात्र उफाळून येतात. जास्तीत जास्त मेंदू वापरला जाईल, तेच खरं शिक्षण म्हणावं लागेल. नाही तर निवडक केंद्रांना काम दिलं तर पूर्ण शिक्षण होत नाही. किमान आठ वर्षांपर्यंतच्या वर्गामध्ये तरी वातावरण हे सहज हवं. सहलीला मुलं जाऊन आली तरी दमत नाहीत, कारण त्यात दोन्ही भागांना चालना मिळते. स्नेहसंमेलन, खेळाचे तास असतात तेव्हा मुलांना आनंद मिळतो, हालचाल होते. हालचाल होणं केवळ शरीराचंच नाही तर बुद्धीचंही टॉनिक आहे. पण शाळेत एका बाकावर बसून जखडलेली व मेंदूला काम न मिळाल्यामुळे दमलेली मुलं घरोघरी दिसून येतात. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून एकाच प्रकारचं काम रोज करणारे आई-बाबाही त्यामुळेच दमतात. Brain Discovery: Always use both left and right brain
पूर्ण मेंदू वापरण्याच्या या प्रक्रियेला होल ब्रेन थिंकिंग म्हणतात. तो वापरला गेला की आपण आपसूकच ताजेतवाने राहतो. याला वयाचं बंधन नाही. परीक्षेच्या काळात मुलांचे खेळ बंद होऊ नयेत. त्यातून मेंदूला ऊर्जाच मिळत असते. डाव्या मेंदूची आणि उजव्या मेंदूची कामं आपण साधारणपणे समजून घेतली तर आपल्या लक्षात येते की आपल्यात काही जण हे प्राधान्याने डाव्या बाजूने विचार करणारे असतात, तर काही जण उजव्या मेंदूने विचार करणारे असतात. करिअर निवडीत, निर्णयप्रक्रियेतही मेंदूच्या क्षेत्राचं प्राधान्य दिसून येतं. जे लोक कलेत रमतात, त्याचाच व्यवसाय करतात. त्यांचा प्राधान्याने उजवा मेंदू काम करीत असतो. जे लोक विज्ञान-गणिताची व्यवसायासाठी निवड करतात, त्यांचा डावा मेंदू प्रभावशील असतो. काही जण दोन्हीचा समन्वय साधू शकतात. आपली शिक्षणपद्धती डाव्या मेंदूला प्राधान्य देणारी असली तरी केवळ काहीच केंद्रांना काम दिल्यामुळे भारतीय समाजाच्या विचारक्षमतेला म्हणावा तसा न्याय मिळालेला नाही. विचारप्रक्रियेतही डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल साधायला हवा. एकूण भारतीय समाजाचा विचार करता आजही आपला समाज मुख्यत्वे भावनांच्या आधारे निर्णय घेतो असं दिसतं. उदा. नेते, आध्यात्मिक पुढारी यांच्या भावनिक आवाहनांना समाज बळी पडतो. अजूनही जातीपातीच्या आधारावर मते देतो. तपशिलात जाऊन बुद्धीच्या आधारे निर्णय घेणं हे जमत नाही. हे जमण्यासाठी प्रत्येक निर्णयात भावना आणि बुद्धी दोन्हीची गुंफण हवी. केवळ भावनांच्या आहारी जाऊन वाहवत जाणं जसं योग्य नाही, तसंच व्यक्तींच्या मनाकडे- भावनांकडे दुर्लक्ष करणं हेही योग्य नाही. लहानपणापासून निर्णयक्षमता या दृष्टीने विकसित करीत न्यायला हवी. १०० टक्के मेंदू वापरायला शिकवलं पाहिजे. आजची महत्त्वाची गरज ही आहे.