नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर भाजपने साईबांबांच्या शिर्डीत घेतलेल्या महाअधिवेशनात श्रद्धा सबूरी अन् भाजपची महाभरारी!! ही टॅगलाईन दिली. त्यावर मराठी माध्यमांनी जोरदार चर्चा घडवली. भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या घोषणांची या नव्या टॅगलाईनशी तुलना केली. त्यातला फरक समजावून सांगितला. पण एक महत्त्वाची बाब यातून माध्यमांनी दुर्लक्षित केली, ती म्हणजे भाजपने श्रद्धा सबूरी अन् भाजपची महाभरारी!! या टॅगलाईन मधून इतर कुणालाही “संदेश” देण्यापेक्षा भाजपने चतुराईने आपल्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना संदेश आणि आनंदाची बातमी दिली आहे.
तो कसा??, ते पाहू…
महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली, असली तरी ही एकट्या भाजपची सत्ता नव्हे, तर महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे या सत्तेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये वाटेकरी झाली आहे. अशा स्थितीत भाजपने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देखील पक्षाने कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना अपेक्षित पदांवर किंवा अधिकार देऊन सत्तेचा वाटा पुरेपूर दिला, असे मानता येत नाही.
किंबहुना तो तसा दिलेलाच नाही. किंवा देऊ शकलेला नाही. पण म्हणून भाजप आपल्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 100 % सत्तेचा वाटा आणि लाभ देणारच नाही, असे मानायचे बिलकुल कारण नाही. ज्यावेळी “भाजप शतप्रतिशत” या तत्त्वानुसार सत्तेवर येईल, त्यावेळी सत्तेचे लाभ आणि वाटा शतप्रतिशत भाजप कार्यकर्त्यांनाच मिळेल हा खरं म्हणजे श्रद्धा सबुरी आणि भाजपची महाभरारी यातला कार्यकर्त्यांसाठी संदेश आहे की, तुम्ही आगामी 5 वर्षांमध्ये श्रद्धा आणि सबुरी बाळगली, पक्षाचे काम केले, तर भाजपच्या महाभरारीतून तुम्हालाही अपेक्षित असे निश्चित लाभ मिळतील हा तो संदेश आहे. महापालिका, जिल्हा परिषदा पंचायत निवडणुका ही कदाचित यातली “लिटमस टेस्ट” असणार आहे.
पण माध्यमांनी याचा अर्थ भलताच काढून केवळ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना भाजपने “संदेश” दिल्याचा दावा केला आहे. त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “बटेंगे तो कटेंगे”, “एक है तो सेफ है” या घोषणांना “पॉलिटिकली कॉम्पेनसेट” करण्यासाठी श्रद्धा सबुरी म्हणजेच संयमाची घोषणा दिल्याचा दावा माध्यमांनी केला आहे, पण श्रद्धा सबुरी आणि भाजपची महागारी या टॅगलाईनचा तेवढाच मर्यादित अर्थ नाही. त्यापलीकडे तो आपल्याच कार्यकर्त्यांना भाजपने दिलेला हा खरा महत्वपूर्ण संदेश आहे, हे येथे अधोरेखित केले पाहिजे.