ज्याप्रमाणे समई लावली की सारं देवघर प्रकाशाने भरून जातं, प्रसन्न होऊन जातं; प्राचीवर गुलाबी सूर्यबिंब वर येताच सार्या दिशा प्रकाशाने उजळून निघतात, प्रसन्न होऊन जातात तसा हृदयात श्रीराम उदय पावलेला हा रामदूत सतत प्रसन्न चित्त आहे… हनुमान जयंतीनिमित्त हा विशेष लेख
अरुंधती प्रवीण दीक्षित
मॉरिशसमधे घरांना नावं नसली तरी घर अथवा बंगला हिंदूचा असेल तर लगेच ओळखू येई. कुंपणातून आत शिरल्या शिरल्या लक्ष वेधून घेई ते म्हणजे एक सुबक सुंदर मारुतीच छोटसं मंदिर! संध्याकाळी या मंदिरात नित्यनेमानी लाल तर क्वचित काही ठिकाणी पिवळे दिवे प्रकाशत असत. भारतातून सातासमुद्रापलिकडे आल्यावर इथल्या अनोळखी प्रदेशात महावीर हनुमानच आपलं रक्षण करेल ही पूर्वी भारतातून आलेल्या लोकांच्या मनात असलेली नितांत श्रध्दा आजही तेवढीच प्रखर आहे. प्रत्येक हिंदू घरात मारुतीला आवडणारं पानाफुलांनी डवरलेलं रुईचं झाड आणि मंजिर्यांनी भरगच्च बहरलेली कृष्ण तुळस दारी असणारच! देवाला रोज विडाही हवा. त्यासाठी नागवेली ही प्रत्येक घरात हवीच. लोक मात्र विड्याच्या पानांचा उपयोग फक्त देवाला आणि पूजेसाठीच करतात. घराघरात नागवेल असूनही पान खाऊन रस्तोरस्ती लाल सडे टाकतांना कोणीही दिसला नाही. मारुतीच्या देवळावर लाल किंवा केशरी रंगाचे दोन झेंडे फडकत असत. एकावर ॐ लिहिलेल असतं तर दुसर्यावर उड्डाण करणार्या प्रतापी मारुतीचं चित्र असत. ‘गर्वसे कहो हम हिंदु हैं’। हे वेगळ सांगायला लागत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हे झेंडे बदलले जात. इथली हनुमान जयंती मात्र आपल्या पंचांगाशी न जुळणारी असते. मारुती येथे महावीर या नावानी लोकांच्या जीभेवर आहे.
देवाच्या रोजच्या पूजेबाबात हे हिंदू अतिशय काटेकोर असतात. भारतीय दूतावासातील उपउच्चायुक्त श्री. राजीव शहारे यांनी बंगला भाड्यानी घेतला तेंव्हा घरमालकांनी सर्वप्रथम त्यांना विचारलं की तुम्ही रोज या मारुतीची पूजा करणार ना? रोजच्या कामामधे त्यांना पूजा करणं जमणार नाही, हे कळल्यावर मालकानी गुरुजींना बोलावून विधिवत् मंत्र म्हणून महावीर मारुतीची मूर्ती काढून घेतली आणि मंदिर बंद केलं. हिंदू राज्य नसूनही हिंदुत्व जपायला मॉरिशस मधे कायद्याचा अथवा घटनेचा आसूड सूड म्हणून उगारत नाहीत. सरकारी गाडी, कचेरी, दवाखाने अशा ठिकाणीही देव पाठीराखा असतो.
एकंदर श्रद्धा ही माणसाच्या हृदयासोबत सात समुद्रही पार करून जाते. इतकच नाही तर मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे अशी कित्येक पिढ्यांचं काळाचं अतंरही पार करते. श्रद्धेइतकी कालविजयी, दूरगामी, हृदया हृदया हृदयांना जोडणारी दुसरी गोष्ट नसेल. सद्गुणांबद्दल माणसाच्या मनात असलेली अजोड प्रीती, अमोघ विश्वास त्याला तारून नेतो. जगण्याचं बळ देतो. सद्गुणांची अनन्य भावाने सेवा करणारा सेवकही हृदया हृदयात देव बनून राहतो.
श्रीरामांबद्दल हनुमंताला काय वाटत होतं ह्याचं वर्णन श्री आद्य शंकराचार्य मोठं सुरेख करतात. शरदऋतु सुरू झाला की आकाशातील उरले सुरले काळे, पांढरे ढगही निघून जातात, आकाश पुन्हा एकदा स्वच्छ निळशार होतं. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आकाशात तळपायला लागतो. त्याप्रमाणे रामचंद्रांचं हृदयात आगमन झालेल्या मारुती रायाच्या हृदयाकाशातील उरल्या सुरल्या इच्छा, विषयवासना सर्व सर्व काही निघून गेलं आहे. निळ्याशार स्वच्छ आकाशासारखं त्याचं मन अत्यंत निर्मळ, पवित्र होऊन त्यात प्रभु रामचंद्रांशिवाय कोणाचीच मूर्ती नाही. हृदयात अवतरलेल्या ह्या राममूर्तीने हा वातात्मज आनंदाने गहिवरला आहे. त्याचे डोळे भरून आले आहेत. अंग अंग रोमांचित झालं आहे. भावविभोर झालेल्या ह्या रामदूताच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा वाहत आहेत. डोळ्यासमोरही राम, हृदयातही राम जेथे पहावे तेथे त्याला प्रभु श्रीरामच दिसत आहेत.
शरद स्पर्श तो होता । सजल जलद त्यजती जसे गगना
रामसखा हृदि येता । विषय तसे त्यजतीच हनुमंता।।1.1
उमलून येति अवघे। हृदि अष्टसात्विक भाव ते अनघा
श्री रामरंग रंगी । पवनसुत रंगला अवघा।।1.2
गहिवरला प्रेमे हा । वाहे अश्रुंची गाली सरिता
रोमांचित ही काया । वातात्मज धन्य हा झाला।।1.3
हृदयामध्ये माझ्या । स्मरतो मी श्रेष्ठ दूत रामाचा
निर्मळ अंर्तबाही । हा स्पर्शला मम हृदयाला।।1.4
ज्याप्रमाणे समई लावली की सारं देवघर प्रकाशाने भरून जातं, प्रसन्न होऊन जातं; प्राचीवर गुलाबी सूर्यबिंब वर येताच सार्या दिशा प्रकाशाने उजळून निघतात, प्रसन्न होऊन जातात तसा हृदयात श्रीराम उदय पावलेला हा रामदूत सतत प्रसन्न चित्त आहे. जाळीदार नक्षीच्या भांड्यात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश भांड्यांच्या जसा छिद्रा छिद्रातून बाहेर डोकावतो तसा ह्या वीरवराचा पोटात न मावणारा आनंद त्याच्या अत्यंत प्रसन्न मुखावर विलसत आहे. त्याच्या नेत्रातून पाझरत आहे. त्याच्या मुखातून स्तुती रूपाने उमटत आहे.
प्रसन्न मुख तव ऐसे। भासे तरुण अरुण उदया आला
नयनी पूरचि लोटे । अलोट वात्सल्य करुणेचा।।2.1
कृतांत अज्ञानाचा । जाळी तू ज्ञानशक्ति ने सदया
संजीवनीच भासे । मज संग तुझाचि पवनसुता।।2.2
तू भाग्य अंजनीचे । तिज पुत्र लाभला गुणसागर हा
महिमा गोड तुझा हा । पावन करो मम रसनेला।।2.3
ज्या हृदयात राम भरून आहे तेथे बाकी विषयांची काय कथा? स्वतःला विश्वविजयी म्हणणार्या अनंगाचे/मदनाचे सारे बाण हनुमंतापुढे वाया गेले. असे महादेवांसारखे थोर वैराग्य ह्या वीरवरापाशीच आहे. माणसाला सर्वात आनंद देणारी गोष्ट कुठली असेल तर आपल्या मुलांचा पराक्रम! मुलं चांगली निपजली तर दारिद्र्यातही माणूस अत्यंत समाधानी असतो. आणि मुलं जर दुराचारी निघाली तर श्रीमंतीतही माणूस झुरत राहतो. दुःखी असतो. मारुतरायाचा पराक्रम पाहिल्यावर स्वतः वायुही स्वतःला धन्य धन्य मानतो.
मदन झुके तुज पुढती । जो विश्वजयी ही बिरुदे मिरवी
निष्फळ बाण तयाचे। सारे सारेचि तुजपुढती।।3.1
वैराग्य थोर मोठे । वाटे अवतार शिवाचा प्रकटे
कमलदलासम शोभे । विशाल नयन तवसुंदर हे।।3.2
पवन वदे अभिमाने । मी धन्य जाहलो पुत्र प्राप्तिने
कुलभूषण हा उजळे। भाग्य सदा माय तातांचे।।3.3
औदार्य श्रेष्ठ विलसे। कमनीय कंठ शंखासम शोभे
बिंबाधर सुंदर तो । मम आश्रयस्थान पावन हे।।3.4
राजदूत कसा असावा ह्याचं आजही श्रेष्ठ उदाहरण म्हणजे रामदूत हनुमानच आहे. आपल्याच राजाशी निष्ठा, आपल्याच राजाच्या कल्याणाचा सतत विचार, त्याप्रमाणेच कृती, दुसर्या देशाच्या राजाला दहशत वाटली पाहिजे अशी वागणूक ही हनुमंताकडुनच शिकावी. म्हटलं तर राम तेंव्हा एक वनवासी होता. त्याचा दबदबा वाटावा अशी कोणतीही धन वा बळाची प्रभावळ त्याच्याभोवती नसतांनाही दूत म्हणून गेलेल्या हनुमंताने रामाची प्रतिमा आपल्या पराक्रमाने शतपट मोठी केली. लंकावासीयांना रामाच्या नावाचा दरारा वाटू लागला. ज्याचा दास एवढा शक्तिशाली त्याचा स्वामी किती प्रभावी असेल ह्या विचाराने लंका नगरी हादरली. आज भारतातून बाहेरच्या देशात गेलेले भारतीय त्या देशातील नागरिकांनी कितीही दुजाभाव करणारी वागणूक दिली तरी तेथल्या मोहमयी नगरीनेच मनातून गारद होऊन त्यांचेच गोडवे गाऊ लागतात. त्यांच्यावरच स्तुतीसुमने उधळतात. इतकेच नाही तर भारतातील यच्चयावत गोष्टींची बाहेर निंदानालस्ती करून स्वतःहूनच अत्यंत महान भारताची प्रतिमा खराब करातात हे पाहून माझ्या मनाला वारंवार दुःख होते. दुसर्या देशात जाऊन कसे काम करावे ते सांगतांना आचार्य म्हणातात,
दावून जानकीसी । श्री रामनाम मुद्रा सूचक ती
कुशल प्रभूचे कथिले। दिला दिलासा प्रभू येती ।।4.1
वाताहातचि केली । लंकेची तू बा पुरती पुरती
जाळूनि भस्म केली । जणु कीर्ति दशाननाची ती।।4.2
परिचय दिधला जगता। तू रामप्रभु गुण सामर्थ्याचा
दास जयाचा ऐसा । जन वदती स्वामि तो कैसा?।।4.3
गुणवैभव उज्ज्वल हे । तुज जवळी असुनी तुजला न कळे
श्री राम भेट होता। उजळुन गेलेचि तव गुण हे।।4.4
मजपुढती ऐसी ही । मूर्ती तव राहोची नित्य नवी
पराक्रमाची अमिता । अविचलश्रद्धा दृढ भक्तिची।।4.5
चंद्रकिरणांनी उमलणारी कमळं सूर्याचा प्रकाश पसरला की म्लान होतात. त्याप्रमाणे थोड्याशा ज्ञानाने माजलेल्या राक्षसांना हनुमानाच्या पराक्रमाने पुरते निष्प्रभ केले।
चंद्रकिरण स्पर्शाने। उमलति कमले जी सायंकाली
कोमेजुन ती जाती। सूर्यकिरण स्पर्शता त्यांसी।।5.1
तैसे दानव सारे । जे माजले चिमुटभर ज्ञानाने
पराक्रमाने तुझिया। निष्प्रभ ठरले तुजपुढति हे।।5.2
रक्षाया दीनांना । तू कटिबद्ध असे मारुतराया
हा तपसामर्थ्याचा । परिपाक असेचि पवनाच्या।।5.3
दिधले दर्शन मजला । मम नयनी रामदूत हा दिसला
मम जन्म धन्य झाला । सार्थक झालीच ही काया।।5.4
अशा ह्या महाबळी वीरवराच्या जन्मदिनी हृदयात ह्या वीरवराची स्थापना करू या. दुर्गुणांचं स्तोम आणि गुणांची राजरोस चाललेली हेटाळणी थांबवू या. किमान परदेशात जाऊन तेथल्या लोकांसमोर भारताची बदनामी न करता भारतात असलेल्या अत्यंत चांगल्या गोष्टींचा परिचय त्यांना करून देऊ या.