प्रतिनिधी
नागपूर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात ए. यु. अर्थात आदित्य ठाकरे यांच्या फोनवरून 44 फोन कॉल रिया चक्रवर्तीला गेल्याच्या खळबळजनक आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे यांच्या भोवती राजकीय वादळ घोंगावते आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या आरोपांनंतर सत्ताधारी पक्षाने आदित्य ठाकरे यांना घेरताच विरोधकही त्यांच्याभोवती एकवटले आहेत. Aditya Thackeray surrounded by rulers in Sushant’s suspicious death case
आदित्य ठाकरे यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपाचे प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील आदित्य ठाकरे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.
अर्थात आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंग रजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे पहिलेच नेते नसून त्या आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात असेच आरोप केले होते. या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची मागणी नारायण राणे यांनी त्यावेळी केली होती. राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर या आरोपातले तथ्य तपासून पाहण्यासंदर्भात सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन मी बोलतो, असे ते म्हणाले आहेत.
नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. सगळे गुन्हेगार “ए” पासूनच कसे सुरु होतात? “ए” फॉर आफताब आणि “ए” फॉर आदित्य!!, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना असे घेरल्यानंतर विरोधक त्यांच्याभोवती एकवटून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे, तर ज्याच्यावर विनयभंगापासून बलात्काराचे आरोप आहेत, त्या खासदाराने आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक करू नये. 2019 चा हिशेब 2024 मध्ये नक्की पूर्ण करू, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतून गळती सुरू झाली असताना आदित्य ठाकरे यांचा विषय परत ऐरणीवर आल्याने महापालिका निवडणुका नजीक आल्याची राजकीय चाहूल यातून लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी आदित्य ठाकरे यांना घेरत आहेत, तर विरोधक त्यांच्याभोवती एकवटून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Aditya Thackeray surrounded by rulers in Sushant’s suspicious death case
महत्वाच्या बातम्या