- राष्ट्रवादी – काँग्रेसच्या सत्तेवरील मस्तीच्या खाणाखूणा मात्र दिसायला लागल्यात
महाराष्ट्रात मारून मुटकून महाआघाडी सरकार आल्यानंतर शिवसेना नावाची संघटना हरविल्यासारखी वाटायला लागली आहे. शिवसैनिक नावाचे political element कुठे दिसेनासे झालेय. आणि ज्या पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने साफ झिडकारले आहे त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तेवरील मस्तीच्या खाणाखूणा पुन्हा दिसायला लागल्या आहेत.
विनय झोडगे
सत्तेच्या साठमारीत आणि राजकारणाच्या गदारोळात शिवसेना नावाची संघटना कुठे आहे? कुठे गेला तिचा जोश? कुठे गेला तिचा आव्वाज…?? हे सगळं त्या एका हट्टापायी हरवलयं… मुख्यमंत्रीपदासाठी आणि मुख्य म्हणजे भाजपला खिजवण्यासाठी… उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सगळी संघटनाच पणाला लावली आहे.
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी बघितल्या तर प्रश्न पडतोय, शिवसेनेचे मंत्री आहेत कुठे? सगळे मंत्री तर active दिसताहेत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे. मध्येच केव्हा तरी एकनाथ शिंदे, अनिल परब active दिसतात. अधून मधून सुभाष देसाई active दिसतात. पण बाकीचे मंत्री? ते कुठे आहेत? या प्रश्नाचे उत्तर तांत्रिकदृष्ट्या देताही येईल. पण राष्ट्रवादीचे अजित पवार, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे हे जेवढे “कार्यरत” दिसताहेत, तेवढे दिसतात का शिवसेनेचे मंत्री कार्यरत? याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. याचा अर्थ शिवसेनेचे नेते अकार्यक्षम आहेत, असा नाही तर त्यांना आपल्या पुरेशा क्षमतेने active mode मध्ये यायला वाव दिला जात नाही, असा याचा अर्थ आहे. यात आदित्य ठाकरे नावाचा वेगळा अँगलही आहे. तो अधिक “कार्यरत” दिसावा, असाही यामागचा हेतू आहे, असे मानण्यास नक्की वाव आहे.
पण बघा ना… महाआघाडीचे सरकार येताच राष्ट्रवादीच्या मस्तवाल राजकारणाच्या, ग्रामविकास खात्यातील कंत्राटाच्या बातम्या बाहेर यायला लागल्या. शरद पवारांच्या मूलभूत राजकारणाचे वेगवेगळे पैलू दिसायला लागले. करून सवरून नामानिराळे राहण्याचा प्रकार पुन्हा दिसू लागला. प्रशासनात pawar doctrine नुसार हस्तक्षेप वाढू लागला.
साधारणपणे २००९ ते २०१४ या कालावधीत राष्ट्रवादीची सत्तेची मस्ती टोकाला पोहोचली होती. तिच्या खाणाखूणा २०२० मध्ये पुन्हा दिसायला लागल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय वर्तणूक त्या दिशेने चालल्यासारखी वाटतेय… जुन्या अजित पवारांच्या दिशेने… याचा अर्थ ते अगदीच अजित पवार होतील असा नाही. पण देशमुखांनी तीच दिशा पकडलीय, असे मात्र दिसतेय. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्येही त्याच्या shades दिसताहेत. अपवाद फक्त राजेश टोपेंचा. कोरोनाच्या लढाईत ते positively पुढे दिसतात.
पण मुख्य म्हणजे या सर्व प्रकारात शिवसेना नावाची चैतन्याने सळसळणारी संघटनाच जणू हरवली आहे. शिवसैनिक नावाचे political element गायब झाल्यासारखे दिसतेय. आपल्या नेत्याच्या हट्टापायी शिवसैनिकाची फरफट होताना दिसतेय. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घेताना शिवसैनिकाची कुचंबणा होती आहे. याचा अर्थ भाजपच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे फार जुळायचे असे नाही पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी अनेक ठिकाणी उभा दावा होता. आता मात्र त्यांच्या बरोबर जुळवून घ्यायला लागतेय.
मुंबईवर आलेल्या कोणत्याही संकटात मुंबईकरांना धीर द्यायला शिवसैनिक सर्वांत पुढे असायचा. तो कोरोनाच्या संकटात कुठे पुढे दिसत नाही. याचा अर्थ शिवसैनिक काम करत नसतील असे नाही पण जो आव्वाज देत ते पुढे दिसायचे ना, तसे ते पुढे दिसत नाहीत, हे मात्र खरे…!!