मोदींनी विरोधकांच्या उत्पन्नाचे “स्रोत” बंद करून टाकलेत. हे त्यांचे मूळ दुखणे आहे. पण हे उघडपणे बोलायचे कसे? सहन होई ना आणि सांगताही येई ना. कारण मोदींनी “पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये” या योजनेतून केंद्रांकडून येणाऱ्या नळाचा कॉक सामान्यांच्या हातात देऊन टाकलाय. त्यामुळे मधल्यामध्ये नळाच्या गळत्यांमधून आपापल्या टाक्या भरून घ्यायची “सोय” बंद झाली आहे.
विनय झोडगे
सोनिया गांधींनी बोलावलेल्या विडिओ कॉन्फरन्सला २२ पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीत मोदींच्या पँकेज विरोधात जो तीव्र स्वर लावण्यात आला होता, तो “राग दरबारी”मधला होता. आणि त्या दरबारातील मुख्य सादरकर्त्या होत्या, दस्तुरखुद्द सोनिया गांधी.
आता हेच पाहा, या कॉन्फरन्सला जे छोटे -मोठे नेते हजर होते ते आपापल्या राज्यांमधले छोटे दरबारी पक्षच तर चालवतायता ना…!! तिथे हजर असलेल्यांपैकी अपवाद फक्त डाव्या पक्षांचा आणि हजर नसलेल्या पक्षांमध्ये अपवाद अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचा. उरलेले सर्व छोटे दरबारी पक्ष सोनियांच्या तुलनेने मोठ्या virtual दरबारात हजर होते.
तिथे मोदीं विरोधी रागाची आळवणी होणे स्वाभाविक होते. पण जो तीव्र स्वर लावण्यात आला होता ना, त्यातील दु:खाचे गाणे सर्वांसाठी समान होते… “मोदी, जरा आम्हाला विचारा ना गडे…!!” मोदी यापैकी कुणालाच विचारत नाहीत आणि “पुसत” नाहीत…!! हे या सर्वांचे दु:ख होते. सोनियांच्या गळ्यातून त्यांनी ते गाऊन घेतले.
मोदींनी या सर्वांच्या उत्पन्नाचे “स्रोत” बंद करून टाकलेत. हे त्यांचे मूळ दुखणे आहे. पण हे उघडपणे बोलायचे कसे? आणि कुणापुढे? सहन होई ना आणि सांगताही येई ना. अशी अवस्था. कारण मोदींनी “पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये” या योजनेतून केंद्रांकडून येणाऱ्या नळाचा कॉक सामान्यांच्या हातात देऊन टाकलाय. त्यामुळे मधल्या मध्ये नळाच्या गळत्यांमधून आपापल्या टाक्या भरून घ्यायची “सोय” बंद झाली आहे.
यातून सोनियांच्या मुखातून सर्वांचे दु:ख शब्दरूप घेऊन बाहेर पडले, ते म्हणजे “मोदींचे २० लाख कोटींचे पँकेज ही जनतेची फसवणूक आहे.” यातील “फसवणूक” हा शब्द सोनियांच्या तोंडी शोभला खरा. होय, खरंच की मोदींनी फसवणूक केलीच आहे… पण ती सामान्य जनतेची फसवणूक नसून ती सोनियांच्या आणि तिथे जमलेल्या तमाम दरबारींची केली आहे. कारण पँकेजमधून येणारा पैसा जनतेच्या खात्यात चाललाय आणि या सगळ्या दरबारींच्या टाक्या “कोरड्या” पडत चालल्यात.
नाही म्हणायला शरद पवारांनी बहुमतावर डल्ला मारून महाराष्ट्रापुरती दोन दरबारी घराण्यांची सोय करून घेतली… पण मेल्या त्या कोरोनाने सहाच महिन्यांच्या आत घात केला आणि महाराष्ट्रातून नळ सुरू होतानाच टाक्या कोरड्या पडायची वेळ आली. म्हणूनच महाराष्ट्रातली दोन्ही दरबारी घराणी आपापल्या भाटांसह सोनियांच्या मोठ्या दरबारी हजेरी लावून त्यांच्या तीव्र सुरात सूर मिसळताना एेकू येत होती…!!