विनय झोडगे
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना वारंवार राजभवनावर जावेसे वाटतेय. तिथल्या निसर्ग रम्य वातावरणात रमावसं वाटतयं. तिथले थुई थुई नाचणारे मोर बघावेसे वाटताहेत. वाटू द्या ना… पण राज्यपालांनी याच निसर्ग रम्य वातावरणात त्यांना आणि त्यांच्या मातोश्रीवरील मालकांना सकाळी उगवत्या “सूर्याची पिल्ले” दाखविली नाहीत म्हणजे मिळविलीन…!!
कारण राजभवन कितीही सुंदर असले, निसर्ग सौंदर्याने नटलेले असले, तरी तिथे बसलेले राज्यपाल राजकारणाच्या कटू कर्तव्याने बांधले गेलेले असतात. ते वेळ येताच राजभवनाचे सौंदर्य दाखवत बसणार नाहीत. तर कर्तव्याचा चाबूक ओढतील, हे निसर्ग सौंदर्यभोक्ते राऊत यांनी विसरू नये.
त्यातही आज शरद पवार सकाळी राजभवनावर चहापानाला जाऊन आलेत. राज्यपालांनी म्हणे, त्यांना बऱ्याच दिवसांपूर्वी चहापानासाठी निमंत्रित केले होते. पण पवारांना नेमका आज सकाळी राजभवनावर जायला वेळ झाला. दोघांचे चहापान झाले. विविध विषयांवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखर कारखान्यांच्या मदतीचा शरद पवारांनी दिलेला प्रस्ताव नाकारल्याची बातमी आली.
उद्धव ठाकरे यांनी खरचं असं काही केलं असेल… तर मानलं पाहिजे त्यांना…!! राष्ट्रवादीच्या बॉसला त्यांनी आतूनच आव्हान दिलं आहे. ते पूर्ण तयारीनिशी दिले असेल तर हरकत नाही. पण अर्धवट तयारीने दिले असेल, तर त्याची किंमत उद्धव ठाकरे यांना चुकवावी लागेल.
याच पार्श्वभूमीवर पवारांची साखर कडू झाली… म्हणून पवारांना आज राजभवनावर चहापानाला जायला वेळ झाला का? की महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही चर्चेचे पिल्लू सोडून द्यायला पवारांनी राज्यपालांची भेट घेतली? विविध वाहिन्यांवर चर्चेचे दळण सुरू झालयं… पण या सगळ्या गदारोळात राज्यपालांनी राजभवनावर थुई थुई नाचणारे मोर पाहायला येणाऱ्या राऊतांना आणि त्यांच्या मातोश्रीवरील मालकांना सकाळी कोवळे उन देणाऱ्या सूर्याची पिल्ले दाखवली नाही, म्हणजे मिळवलीनं…!!