चंद्रकांत पाटलांचे विधान महाराष्ट्राच्या राजकीय वस्तुस्थितीला धरूनच आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार शिवसेनेची प्रतिष्ठा जपायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणलेले नाही. त्यांची खुर्ची स्थिर ठेवण्याची जबाबदारी दोन्ही पक्ष घेणार नाहीत. उलट ते जेवढे अस्थिर राहतील, वाकून राहतील तेवढे दोन्ही पक्षांचे फावेल. उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे वागायला लागले की हे मागच्या दाराने आणलेले सरकार मागच्याच दाराने घालवायला ते कमी करणार नाहीत…!!
विनय झोडगे
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जावे, असे महाआघाडीतल्याच काही नेत्यांना वाटते, असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजकीय बाँम्ब फोडलाय. पण यात बाँम्ब फुटल्याचे वाटण्यासारखे काय आहे? चंद्रकांत पाटलांनी खरेच विधान केले आहे. ते महाराष्ट्राच्या राजकीय वस्तुस्थितीला धरूनच आहे.
मूळात उद्धव ठाकरे यांचे सरकार काँग्रेस – राष्ट्रवादीने आणलेय ते मागच्या दाराने. ते तरले आहे त्यांच्याच पाठिंब्यावर. विधानसभा निवडणुकीत राजरोसपणे मतदारांना एकत्र सामोरे जाऊन बहुमत मिळवून ते थोडेच आणले आहे? ते तर आणले आहे, भाजपला खिजवायला आणि महाराष्ट्रात आपल्या उरल्या सुरल्या बालेकिल्ल्यांची डागडुजी करायला.
मग उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद टिकवायची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही किंमत वसूल करून घेतल्याशिवाय घेणार आहेत काय? अशी अपेक्षाच करणे चूक आहे… उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद सतत अस्थिर राहणे, प्रत्येक निर्णय घेताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बॉसना विचारत राहणे, हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे बॉस जे म्हणतील त्याला मान तुकवत राहणे ही उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची “खरी किंमत” आहे… उद्घव ठाकरे शिवसेनेचा मूळचा बाणा सोडून जितके वाकून राहतील, तेवढे त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकेल. राजकारणात यालाच गोंडस भाषेत लवचिकता म्हणतात…!!
आणि तसेही सामनाकारांनी काहीच महिन्यांपूर्वी लिहिले होते ना… उजेडात होते पुण्य अंधारात पाप… मग महाराष्ट्रात सिल्वर ओकच्या नादी लागून त्यांनी आणलेली सत्ता टिकवून ठेवायला एवढे तरी वाकावे लागेलच ना…!! त्यावेळी दिवसा ढवळ्या केले असेल तर ते बहुमतावर दरोडा घालण्याचेच काम केले होते ना…!! मग आता रडतराऊती करण्यात मतलब काय?
आठ – दहा दिवसांपूर्वी असलेला confidence उद्धव ठाकरेंमध्ये आता दिसत नाही, असे त्यांचेच निकटवर्ती बोलताहेत… आणि का नाही बोलणार…?
शिवसैनिकांनी त्यावेळी भाजपच्या बरोबरीने केलेली मेहनत काय सिल्वर ओकच्या तालावर नाचायला केली होती काय? आणि एवढे करूनही कसा दिसेल confidence? मुंबईतली दडपलेली कोरोनाची आकडेवारी सतत डोळ्यासमोर नाचत असेल ना…!! वरती मोदी – शहा बसलेत ना. त्यांना दिसतय ना मुंबईतल सगळं…!!
त्यातही सिल्वर ओकचा खंजिर काय फक्त वसंतदादांच्या पाठीत खुपसण्यासाठी ठेवला होता काय? त्याच्या संगीत खंजीर प्रयोगाचे तर अनेक बळी ठरले आहेत… जरा पृथ्वीराज चव्हाणांना आणि हर्षवर्धन पाटलांना विचारून पाहा. उद्धव ठाकरे हे त्याचे नवा बळी ठरू पाहात आहेत एवढेच …!! चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा अर्थ हा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे डिझाईन मातोश्रीचे असले तरी तिच्या सीटमध्ये आणि पाठीत भरलेले काटे सिल्वर ओकचे आहेत. ते बोचल्याशिवाय कसे राहतील? त्यातही मंत्रिमंडळावर सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. सगळ्या मंत्र्यांचे रिपोर्टिंग मुख्यमंत्र्यांना असते…
आताचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करतात काय? आणि करत असतील तर पत्रापत्रीचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा त्याला अधिक महत्त्व असेल काय? राष्ट्रवादी आणि काँग्रेस मंत्र्यांचे रिपोर्टिंग सिल्वर ओक आणि १० जनपथला असेल ना…!! ते कशाला मातोश्रीला विचारतील? वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली आणि मान्य केली तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदामागचे राजकीय इंगित लक्षात येईल आणि त्यांची कोंडीही लक्षात येईल.
बाकीचे सोडा… मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी दोनदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला राज्यपालांकडे शिफारस करावी लागते, यातच सगळे राजकारणाचे “सार” आले. वरती मोदी आणि खाली सिल्वर ओक तर ते कोळून प्यायले आहेत. मागच्या दाराने आलेले सरकार मागच्याच दाराने जाण्याची ही तर सुरवात आहे.