महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणात शेवटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्विग्नतेने आपणच निवडणुक लढविणार नसल्याचा इशारा दिला. कॉंग्रेसच्या दुढ्ढाचार्यांसोबत राजकारण करताना उध्दव ठाकरे यांच्यावर या प्रकारचे रणातून पळ काढण्याचे आणखीही प्रसंग ओढवू शकतात. या निमित्ताने एक अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आली. ती म्हणजे, ‘मला परीक्षेत पास करणार असाल तरच मी परीक्षेला बसणार!
निलेश वाबळे
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणात शेवटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्विग्नतेने आपणच निवडणुक लढविणार नसल्याचा इशारा दिला. कॉंग्रेसच्या दुढ्ढाचार्यांसोबत राजकारण करताना उध्दव ठाकरे यांच्यावर असे माघार घेण्याचे अनेक प्रसंग आणखीही येणार आहेत. पण या निमित्ताने एक अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आली. ती म्हणजे, ‘मला परीक्षेत पास करणार असाल तरच मी परीक्षेला बसणार!
मुख्यमंत्री पद हस्तगत करण्यापुर्वीपासून ते कोरोनाच्या संकटाला तोंड देईपर्यंतचे उध्दव ठाकरे यांचे संपूर्ण राजकारण हे व्हिक्टिीम प्लेईंग पध्दतीचे म्हणजे कोणीतरी आपल्यावर सतत अन्याय करते आहे, अशा पध्दतीचे आहे. यातून सहानुभूती मिळवत ते पुढे आले. खरे म्हणजे ते आतापासून नाही तर अगदी शिवसेनेच्या त्यांच्या उमेदवारीच्या काळापासून आहे. उध्दव आणि राज दोघेही शिवसेनेत उमेदवारी करत असताना राज ठाकरे यांच्या सभा गाजायच्या. ते सतत लाईमलाईटमध्ये राहायचे. राज्यभरातून त्यांना मानणारे कार्यकर्ते होते. यावेळीही उध्दव यांची कुरकुर चालूच असायची. त्यानंतर राज यांनी शिवसेना सोडायचा निर्णय घेतला. त्यावेळीही उध्दव यांनी हाच व्हिक्टीम प्लेइंगचाच पत्ता काढला. त्यावेळी खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उध्दव यांच्यासोबत होते. तरीही आपल्यावरच अन्याय होतोय अशा पध्दतीचा आव ते आणत.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या काळातही हेच घडले. भाजपाचे काही नेते सांगतात की, उध्दव सतत संशयाने बघायचे. चर्चेमध्ये कोणताही मुद्दा आला की त्यांना त्यामध्ये काळेबेरे वाटायचे. त्यामुळेच २०१४ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होऊ शकली नाही. त्यानंतर युती झाली परंतु संपूर्ण साडेचार वर्षे उध्दव यांनी कधीही भाजपाशी जमवून घेतले नाही. याचे मुख्य कारण भाजपाकडून आपल्यावर वरचष्मा ठेवायचा प्रयत्न केला जातोय अशी त्यांची प्रत्येक वेळी भूमिका असायची. राजीनामे खिशात आहेत, असं म्हणत वरपांगी स्वाभिमान दाखवायचा, प्रत्यक्षात सत्तेचे सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा ‘दिल्ली’कडून अन्याय होतो, असे रडगाणे गात राहायचे, ही उद्धव यांच्या राजकारणाची शैली राहिली आहे. अर्थातच ती यशस्वी झाली, असे म्हणावे लागते कारण त्यांनी मुख्यमंत्रीपद याच पद्धतीने हस्तगत केलं.
आताच्या विधानपरिषदेच्या ९ जागांची निवडणूकीदरम्यानही वेगळं काही घडलं नाही. त्यामध्येही संख्याबळानुसार निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सगळ्यांना माहिती होतं. त्यातच चीनी व्हायरसच्या उद्रेकामुळे आता निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत कोणीही नाही. तरीही उध्दव उद्विग्न झाले. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या नेत्याला असे प्रत्येक वेळी टोकाची भूमिका घेणे शोभादायक नसते. परंतु, शिवसेनेच्याच काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ या उक्तीचे उदाहरण दिले जात आहे. कॉँग्रेसच्या राजकारणाची पध्दतच वेगळी आहे. त्याच्याशी जमवून घेणे उध्दव यांना शक्य नाही. याचे कारण म्हणजे कॉँग्रेसमध्ये निर्णय घेणारे दृढ्ढाचार्य प्रत्येक गोष्ट वाजवून घेतात. पक्षाचा जीव किती, ताकद किती याचा विचार न करता अजूनही पक्षश्रेष्ठींच्या मानसिकतेत असलेले केंद्रीय पातळीवरील नेते राज्यातील राजकारणात प्रत्येक महत्वाचा निर्णय घेतात. त्यामुळेच संख्याबळ नसतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. कॉंग्रेसनं परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. काँग्रेसनं हट्ट न सोडल्यास निवडणूक लढवायचीच नाही, या निर्णयाप्रत ते आले होते.
प्रत्येक पक्षानं संख्याबळानुसार उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, हे सर्वांनाच माहित होते. स्वत: मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात असताना कोणतीही रिस्क घ्यायची नाही, हे शिवसेनेने ठरविले होते. परंतु, काँग्रेस दोन जागा लढण्यावर अडून बसल्यानं उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले. कॉंग्रेसला त्यांच्या दोन जागा निवडून आणण्याइतपत बहुमत नाही हे खरे असले तरी भाजपालाही काही मते कमी पडतात. त्यामुळे कॉँग्रेसच्या तथाकथित चाणक्यांना वाटले असेल की भाजपाकडून ही जागा हिसकावून घेऊ. परंतु, कॉँग्रेसचे आत्मघातकी राजकारण उध्दव त्यांच्यासोबत आघाडीत आल्यापासून बघत आहेत. यामध्ये आपल्यालाच काही धोका होईल, अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळेच त्यांनी कॉँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला.
या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणविले जाणारे शरद पवार मात्र एकही शब्द बोलले नाहीत. वास्तविक कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची समजूत घालून राज्यातील कॉँग्रेस नेत्यांना गप्प बसविणे त्यांना शक्य होते. परंतु, शिवसेनेला आणि मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जास्तीत जास्त उघडे पाडायचे, अशीच त्यांची भूमिका असू शकते. पण, त्यामुळे उध्दव यांच्या प्रतिमेलाच तडा जात आहे. राज्यातील भाजपासोबतची युती उध्दव ठाकरे यांनी तोडली त्यावेळीच सामान्यांना त्यांची भूमिका पटली नव्हती. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हाच न्याय असेच गणित सामान्य माणसाला पटत होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी हट्टीपणाने मुख्यमंत्रीपद मिळविले अशीच सार्वत्रिक धारणा आहे. त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे ‘मला परीक्षेत पास करणार असाल तरच मी परीक्षेला बसणार! अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे.