आयषी असो की जेएनयूमधील तरुण विद्यार्थी. त्यांच्या मनात सावरकरांविषयी विष पेरले कोणी? राहूल गांधी यांचे ठिक आहे की त्यांना सावकरांचा रोमांचकारी इतिहास माहित नाही. परंतु, महाराष्ट्रातील कॉँग्रेस नेत्यांनी तरी त्यांना सांगायला हवे होते. उलट रत्नाकर महाजन यांच्यासारखा बुध्दीवादी म्हणविणारा कॉँग्रेसजन सावरकरांविषयी गरळ ओकणार्यांना बळ देतो, हे महाराष्ट्रासाठीच लाजीरवाणे आहे.
अभिजित विश्वनाथ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका मार्गाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यावरून पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. जेएनयू छात्रसंघाची अध्यक्ष आयशी घोषने हिने या घटनेचा निषेथ मात्र याचा निषेध नोंदवला आहे. ही अतिशय लाजीरवाही बाब आहे. सावरकर आणि त्यांची विचारसरणी जोपासणार्या लोकांना जेएनयूमध्ये कधीच स्थान नव्हते आणि भविष्यातही राहणार नाही, अशी गरळ तिने ओकली.
गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठातही सावरकरांची मूर्ती लावण्यावरून गोंधळ झाला होता. काही जणांनी सावरकरांच्या प्रतिमेला काळी शाई फासली होती. मोठा गदारोळ झाल्यानंतर ती प्रतिमा हटवण्यात आली होती. आयषी असो की जेएनयूमधील तरुण विद्यार्थी. त्यांच्या मनात सावकरांविषयी विष पेरले कोणी? राहूल गांधी यांचे ठिक आहे की त्यांना सावकरांचा रोमांचकारी इतिहास माहित नाही. परंतु, महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी तरी त्यांना सांगायला हवे होते. उलट रत्नाकर महाजन यांच्यासारखा बुध्दीवादी म्हणविणारा कॉँग्रेस नेता सावकरांविषयी गरळ ओकणार्यांना बळ देतो, हे
महाराष्ट्रासाठीच लाजीरवाणे आहे.
सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ नाही तर ‘माफीवीर’ आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे नेते सातत्याने करत असतात. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या नियतकालिकातून अशाच पध्दतीची टीका करण्यात आली. ‘शिदोरी’च्या फेब्रुवारीच्या अंकात सावरकरांवर दोन लेख छापण्यात आले आहेत. त्यातील एका लेखाचं शिर्षकच ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर’ होते. सावरकरांसंबंधीचे सर्व दस्ताऐवज तपासल्यास सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर असल्याचं सिद्ध होतं, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिदोरीसाठीचा हा लेख ‘साम्ययोग साधना’ या मासिकातून हा लेख घेण्यात आला आहे.यामध्ये सावरकरांनी ब्रिटीश अधिकार्यांना पाठविलेल्या पत्रांचा संदर्भ दिला होता. दुसरा लेख तर लिहिणार्यांच्या, ते छापणार्यांच्या आणि छापून पुस्तिका वितरीत करणार्यांच्याच अत्यंत विकृत मनोवृत्तीचे दर्शक होता. ‘अंधारातील सावरकर’ या लेखात सावकरांच्या चारित्र्याशी संबधित गलिच्छ आरोप करण्यात आले होते. कॉँग्रेसच्या एखाद्या दुसर्या राज्यातील नेत्याने या पुस्तिकेचे संपादन केले असते तर ठिक होते. पण महाराष्ट्रातील कॉग्रेसचे नेते डॉ. रत्नाकर महाजन यांनी त्याचे संपादन केले आहे. महाजन हे पूर्वाश्रमीचे युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते. नंतर कॉँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर शरद पवारांबरोबर ‘राष्ट्रवादी’मध्ये गेले. तेथून पुन्हा कॉँग्रेसमध्ये गेले. ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांना खासदारकी मिळाल्यावर त्यांनी पक्षावर टीका केली होती. मात्र, त्यावेळी पक्षश्रेष्ठींच्या लक्षात राहण्यासाठी काहीतरी करायला हवे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळेच कॉँग्रेस सेवादलातर्फे काढण्यात आलेल्या ‘शिदोरी’ पुस्तिकेत त्यांनी सावकरांविरुध्द गरळ ओकली. महाराष्ट्रातील एक कॉँग्रेसचा नेता त्यांना विरोध करत होता. मात्र, त्यांनी थेट राहूल गांधींकडे जाऊन परवानगी आणली. भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाचं 10 दिवसीय निवासी शिबिर सुरू असताना शिबिरार्थींना विविध नेते, महापुरुषांबद्दलच्या माहितीपर पुस्तिका वाटण्यात आल्या. यातही ‘वीर सावरकर कितने ‘वीर’?’ नावाने ही पुस्तिका वाटली गेली.
मुळात सावरकरांवर अश्लाघ्य शब्दांत टीका करणार्या
या पुस्तिकेतील महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसे आणि सावरकरांवरील संबंधांचा दावा लॅरी कॉलिंस आणि डोमॅनिक लॅपिएर यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकातील संदर्भातून घेतला होता. मात्र, एका वकीलांनी या लेखकाांवर न्यायालयात दावा केला. त्यानंतर बाजारातील या पुस्तकाच्या प्रती परत घेण्यात आल्या. पुढच्या आवृत्तीतून हा उल्लेख काढून टाकला. आता बाजारात उपलब्ध असलेल्या आवृत्तीमध्ये हा उल्लेख नाही. मात्र, पुस्तिकेतील लेखामध्ये हा उल्लेख मुद्दामहून काढण्यात आला.
सावरकरांच्या आयुष्याबाबत नको त्या खोट्या गोष्टी शोधून काढून त्याची प्रसिध्दी करणारे महाजन जणू शाळेत शिकलेच नाहीत. शाळेचे पाठ्यपुस्तकही वाचले असते तर सावरकारांची जाज्वल्य देशभक्ती त्यांना दिसली असती. स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सेलिस येथील साहसी उडी ते कसे विसरले? ८ जुलै १९१० रोजी कातडी सोलून निघाली तरी त्यांनी शौचालयातून बोटीबाहेर उडी मारली. फ्रान्सच्या पोलीसांनी लाच घेऊन त्यांना इंग्रजांच्या ताब्यात दिले. मात्र, या निमित्ताने सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न पहिल्यांदा जागतिक व्यासपीठावर नेला. फ्रान्सच्या भूमीवर झालेली अटक आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. ब्रिटिशांकडून स्वा. सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे, असे मत कार्ल मार्क्स यांचा नातू लोंगे याने मांडले होते. युरोपातील प्रसारमाध्यमांनीही याबाबत त्यांच्या बाजुने भूमिका घेतली. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला होता.
सावरकरांच्या तरुण पत्नीला, भावजयीला आणि संपूर्ण कुटुंबालाच ज्या यातना भोगाव्या लागल्या ते मराठी माणसाला माहित आहे. सावरकरांनी आपल्या देशभक्तीपर लिखाणातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहेच. १८५७ चा राष्ट्रीय उठाव हे पुस्तक स्वातंत्र्यवीरांनी लिहिले. हे बंड नव्हते तर स्वातंत्र्यसमर होते हे जगासमोर त्यांनी मांडले आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यही केले गेले. या स्वातंत्र्यसमरात हिंदू आणि मुस्लिम एकत्रितपणे लढल्याचे त्यांनी आवर्जून म्हटले होते. सावरकरांची मुस्लिमविरोधी प्रतिमा निर्माण केली गेली याचे कारण म्हणजे त्यांनी अंदमानातील मुसलमानांची मुजोरी मोडून काढली होती. अंदमानात हिंदु आणि मुस्लीम कैद्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाक होत असे. स्वयंपाक झाल्यावर जेवणास बसण्यापूर्वी एक मुसलमान कैदी हिंदूंच्या अन्नपात्रांना स्पर्श करून निघून जात असे. बाटले जाण्याच्या भितीमुळे हिंदू कैद्यांना चार-पाच दिवस जेवता आले नाही. त्यावेळी सावकरांनी हिंदू धर्मावर आक्रमण करणार्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यास सांगितले. एका करवंटीत पाणी घेऊन शुद्धीमंत्र म्हणत सर्वांच्या अन्नावर शिंपडले आणि अन्न आता अभिमंत्रित झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे आता जो हे अन्न खाईल, तो हिंदु झाला, असेही ते म्हणाले. त्यामुळे मग मात्र मुसलमानांवर उपासमारीची वेळ आली. त्यांनी नमते घेतले आणि सर्वांनी आपापले अन्नच खाणे सुरू केले. त्याचबरोबर पठाण अधिकार्यांकडून होणार्या जाचामुळे सुरु झालेल्या
धर्मांतरावरही सावरकरांनी शुध्दीकरण मोहीम सुरू केली. हिंदू म्हणून घेण्यात लाज बाळगण्याचे कारण नाही, असे सावरकर यांनी सांगितले. यामुळे सावरकरांना मुस्लिमविरोधी ठरविण्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न चालू आहे.
कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी सातत्याने सावरकरांवर हल्ले केले. गांधी कुटुंबियांपुढे हाजी हाजी करणारे नेते हिच भूमिका पुढे नेत आहेत. मात्र, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील एका देशभक्ताचा अवमान होत आहे, हे महाराष्ट्रातील नेते लक्षात घेत नाहीत. रत्नाकर महाजन यांनी सावरकरांवरील साहित्य नव्याने वाचायला हवे होते. त्याचा मतितार्थ कॉंग्रेसच्या नेत्यांना सांगायला हवा होता. वैचारिक पातळीवर विरोध असला तरी त्याला व्यक्तीगत पातळीवर येऊ न देण्याची महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा राहिली आहे. पण सावरकर नावाचीच कावीळ झालेले कॉँग्रेसचे नेते हे विसरले आहेत. त्यामुळेच काहीतरी राजकारण होते आणि सावरकरांची टिंगल-टवाळी करण्याची नवी संधी घेतली जाते.