• Download App
    मध्यप्रदेश कॉंग्रेस जात्यात, राजस्थान कॉंग्रेस सुपात | The Focus India

    मध्यप्रदेश कॉंग्रेस जात्यात, राजस्थान कॉंग्रेस सुपात

    अशोक गेहलोत यांनी त्यांच्या मुलाची पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर ढकलली आहे. हा बॉँब कधीही फुटू शकतो. त्यानंतर सुपात असलेले गेहलोत जात्यात येतील. परंतु, त्यापेक्षाही कार्यकर्त्यांचा  कॉँग्रेसवरील उरला-सुरला विश्वास उडून जाईल.


    अभिजित विश्वनाथ
    अखेर मध्य प्रदेशातील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली. सात-आठ महिन्यांपूर्वीच गाजावाजा करत आलेले मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘ऑपरेशन लोटस’ ला यामुळे बळ मिळाले  आहे. परंतु, त्यापेक्षाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा मरगळ आली आहे. जीवापाड मेहनत करून पक्षाला विजय मिळवून दिला तरी नेतेच या पक्षात टिकणार नाहीत. त्यामुळे स्वत:चे राजकीय भवितव्य पणाला लावायचे कशाला  अशा मानसिकतेत कॉंग्रेस कार्यकर्ते आहेत.
    काँग्रेस कठीण परिस्थितीत असताना त्याला नवा चेहरा देण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पक्षात तरुण नेत्यांना स्थान दिले. या माध्यमातून अनेक क्रांतीकारी निर्णय घेणे त्यांना शक्य झाले. देशात नक्षलवादी चळवळीकडे तरुण आकर्षित होत असताना समाजवादी विचारसरणीच्या  या तरुण नेत्यांनी काँग्रेसला जनाधार देण्याचे काम केले. मात्र, जुन्या काँग्रेस नेत्यांना हटविण्यासाठीच या नेत्यांचा वापर करून घेतला होता हेदेखील सिध्द झाले. चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत, रामधन यांनी नंतर काँग्रेसचा त्याग केला. पुढील काळात काँग्रेसला घरघर लागण्यामध्ये हे कारण देखील महत्वाचे ठरले. जनाधार असलेल्या नेत्यांना डावलण्याची काँग्रेसची परंपरा आहे. त्याची किंमत वारंवार मोजावी लागत असूनही काँग्रेस काही शिकली नाही. सामान्य माणसाला उबग आणणारे दरबारी  राजकारण  आणि पक्ष संघटना उभी करण्यासाठी नवी पिढी  आणि सत्तेचा सोपान पार केला की जुन्याच दृढाचार्यांची सद्दी हे कॉँग्रेसचे आजपर्यंतचे धोरण राहिले आहे. यामुळे पक्ष सातत्याने अडचणीत येत आहे.
    खरे तर ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधील दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील नेते म्हणून पुढे येऊ लागले  होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षासाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. राहूल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. परंतु, शिंदे यांच्या स्वत:च्या मध्य प्रदेशातील राजकारणात मात्र त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. राजस्थानात सचिन पायलट यांचीही हिच अवस्था आहे. उपमुख्यमंत्रीपद देऊनही मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांना फारसे गांभिर्याने घेत नाहीत, याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनाही हाच अनुभव आला. रेड्डी  यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि आंध्र प्रदेशातून कॉंग्रेस नामशेष झाली.
    काँग्रेसच्या ओसाड जहागिरीतही दरबारी राजकारण सुरूच आहे. राज्य पातळीवरील नेत्यांचे पंख छाटण्याचे उद्योग कायम आहेत. दोन-तीन नेत्यांना परस्परांमध्ये झुंजवायचे आणि तथाकथित काँग्रेस श्रेष्ठींचे वर्चस्व कायम ठेवायची ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे.  केवळ गांधी-नेहरू घराण्याला दोष देऊन चालणार नाही तर कॉग्रेसची ही संस्कृतीच आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांनी  माधवराव शिंदे, राजेश पायलट, शरद पवार, पी. ए. संगमा यांच्यापासून ते अर्जुन सिंग, प्रणव मुखर्जी या नेत्यांचे पंख काढले. काँग्रेसमधील फुटीची परंपरा त्यामुळे कायम राहिली. १९९६ मध्ये माधवराव शिंदे यांनी नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली  होती.  १९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमध्ये जीव पणाला लावून कम्युनिस्ट पक्षाविरुध्द लढणाºया ममता बॅनर्जी यांच्या वाट्यालाही हेच  आले होते. त्यामुळेच त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापन केली आणि आज पश्चिम बंगालमधून कॉँग्रेस नामशेष झाली आहे.
    ज्योतिरादित्य शिंदे यांचा त्यांच्या परंपरागत मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. याचे कारण त्यांची वैयक्तिक ताकद कमी झाली हे नव्हते तर कॉंग्रेसवर लोकांचा विश्वासच राहिला नव्हता. या परिस्थितीतही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण ताकद लावून प्रचार केला. परंतु, निवडणुकीपासूनच एकमेंकांना हरविण्याचा खेळ सुरू झाला होता. नेत्यांनी एकमेंकांविरुध्द मोर्चेबांधणी सुरू केली  होती. शिंदे यांना एकटे पाडले होते. राजस्थानमध्ये असेच घडत अाहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोठा संघर्ष झाला. पक्षाला राज्यात निवडणुका जिंकून देणाऱ्या सचिन पायलटना गेहलोत यांच्यासाठी दूर ठेवण्यात आले.  यापूर्वी दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले ६७ वर्षीय अशोक गेहलोत यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व सोपविताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करून समजूत काढली. पायलट यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही कायम राहणार आहे.
    राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात तीव्र संघर्ष झाला होता. त्यावरून पायलट यांचे गुज्जर समर्थक अद्यापही नाराज आहेत. दुसऱ्या बाजुला गेहलोत यांच्याविरुध्द नाराजी वाढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात गेहलोत यांनी पक्षाकडे ढुंकून पाहिले नाही. लोकसभा निवडणूक लढत असलेल्या आपल्या मुलाच्या मतदारसंघातच तळ ठोकून राहिले. तरीही त्यांच्या मुलाचा पराभव झाला. यामध्ये गेहलोत यांच्याविषयी नाराजीबरोबरच पायलट यांंच्या समर्थकांनी केलेला विरोधही महत्वाचा होता. यामुळे दोघांमध्ये सध्या सुप्त संघर्ष आहे.  अशोक गेहलोत यांनी त्यांच्या मुलाची पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर ढकलली आहे. हा बॉँब कधीही फुटू शकतो. त्यानंतर सुपात असलेले गेहलोत जात्यात येतील. परंतु, त्यापेक्षाही कार्यकर्त्यांचा  कॉँग्रेसवरील उरला-सुरला विश्वासही उडून जाईल.
    (लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!