त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चीनी व्हायरसमुळे आलेल्या संकटाच्या काळात देशातील जनतेच्या सेवाभावाचा सन्मान करणारी सप्तपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे. या सप्तपदीतूनच देश चीनी व्हायरसचा यशस्वीपणे मुकाबला करेल. त्याचे प्रत्यंतर आता दिसू लागले असून संपूर्ण देशात सेवाभावाची भावना निर्माण झाली आहे.
अभिजित विश्वनाथ
नवी दिल्ली : त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चीनी व्हायरसमुळे आलेल्या संकटाच्या काळात देशातील जनतेच्या सेवाभावाचा सन्मान करणारी सप्तपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे. या सप्तपदीतूनच देश चीनी व्हायरसचा यशस्वीपणे मुकाबला करेल. त्याचे प्रत्यंतर आता दिसू लागले असून संपूर्ण देशात सेवाभावाची भावना निर्माण झाली आहे.
चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासियांशी तिसऱ्यांदा संवाद साधला. त्यांच्या या संवादानंतर काही पंचमस्तंभियांनी टीका केली. या सगळ्यामध्ये आकडेवारीचा अभाव होता. प्रत्यक्ष परिस्थिती सांगितली नाही. चीनी व्हायरसविरोधातील लढाई कशी लढणार याचा रोडमॅप सांगितला नाही, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. आरोग्य व्यवस्था की अर्थव्यवस्था यामध्ये पंतप्रधानांनी आरोग्यालाच अधिक प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांनी अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना या लॉकडाऊनमुळे चुकवायला लागलेली किंमत ही भारतीयांच्या जिवापेक्षा मोठी नाही, असे स्पष्ट सांगितले. हे सांगून त्यांनी मानवतेला आपण किती महत्व देतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी ज्या सप्तपदींचा उल्लेख केला त्यातून त्यांनी केवळ काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नव्हे तर १३० कोटी देशवासियांनाच एक कार्यक्रम दिला आहे. जगाचे उदाहरण आहे की सर्वात जास्त मृत्यू हे वृध्दांचे झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. लॉकआऊटचा मु्ख्य उद्देश हा सोशल डिस्टन्सिंग हा आहे. त्यामुळे शारीरिक अंतराकडे लक्ष देण्यास, मास्क घालण्यास त्यांनी सांगितले आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत कोरोना व्हायरस हे डॉक्टर, परिचारिका व पोलिसच असणार आहेत. त्यांचा सन्मान करण्यास मोदींनी सांगितले आहे. चीनी व्हायरसचा फैलाव रोखायचा असेल तर सर्वात प्रथम रुग्णांची माहिती पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. सगळी सरकारी यंत्रणा जरी कामाला लावली तरी देशातील सर्व गरीबांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळेच देशात उपाशीटी कुणालाही झोपू देऊ नका आणि गरिबांना अन्न द्या, असे सांगितल्याने सगळे देशवासियच या कामात योगदान देतील. सध्याच्या परिस्थितीत लोक धास्तीत आहेत. नोकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळे व्यापारी आणि उद्योगपतींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांंना कामावरून कमी करू नये, हे पंतप्रधानांचे आवाहन कोट्यवधी जनतेला धास्तीतुून बाहेर काढू शकते.
रटाळपणे आकडेवाऱ्या फेकत आवाहन करण्यापेक्षा लोकांच्या शक्तीला आवाहन करण्याची पंतप्रधानांची शैली प्रेरणादायी वातावरण निर्माण करून गेली आहे. या भाषणातून राष्ट्रप्रमुख म्हणून मोदींचे एक वेगळे रुप समोर आले आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात हिटलरने इंग्लंडला लक्ष्य केले होते. एकट्या लंडन शहरावर जर्मनीची सातशे विमाने बॉँबफेक करत होती. लोकांना सायरन वाजल्यावर कधीही भुयारामध्ये जावे लागत होते. त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान असलेले विस्टन चर्चील यांनी आपल्या भाषणातून लोकांचे धैर्य कायम ठेवले होते. त्यांना देशसेवा आणि समाजसेवेची प्रेरणा दिली होती. मोदींनी आपल्या भाषणातून असाच परिणाम साधला आहे. विरोधकांकडे त्यांनी सहकार्याची मागणी केली आहे.
संपूर्ण जग कोरोनाच्या औषधांसाठी भारताकडे आशेने बघत आहे. भारत आज जागतिक स्रोत म्हणून उदयास येत आहे. भारतीयांसाठी ही गौरवाची बाब आहे. याचा खूप चांगला मानसशास्त्रीय परिणाम देशवासियांवर होणार आहे. आजाराच्या वेळी व्यक्तीचे मनोबल उंचावलेले असेल तर औषधांचा आणि उपचाराचा परिणाम लवकर होतो. हे मनोबल उंचावण्याचे काम मोदींनी केले आहे. आता राहिला सरकार म्हणून काय प्रयत्न सुरू आहेत याच्या उल्लेखाचा. परंतु, केंद्रीय मंत्रीमंडळातील सगळे मंत्री, सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री दररोज याबाबत भाष्य करत आहेत. केंद्र सरकारकडून प्रशासनाच्या निर्णयांची माहिती दररोज दिली जात आहे. त्यामुळे हिच माहिती देण्यापेक्षा खरोखर प्रेरणादायी भाषण आवश्यक होते. ते मोदींनी केले आहे