• Download App
    देणाऱ्याचे हात हजार दुबळी "यांची" झोळी...!! | The Focus India

    देणाऱ्याचे हात हजार दुबळी “यांची” झोळी…!!

    लाखो कोटींची पँकेज वाटली पण हाताला काही लागले नाही ना… मग केंद्रापुढे हात कशाला पसरताय? उद्धव बाळासाहेब ठाकरे…!!


    विनय झोडगे

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव आत्तापर्यंत चर्चेचा विषय होते, पण आता ते टिंगल टवाळीचा विषय व्हायला लागले आहे. ते जनतेशी जो संवाद साधताहेत ना त्यातून ना काही ठोस निष्कर्ष काढता येतोय, ना काही महाराष्ट्राच्या हाती लागतयं…!!

    “महाराष्ट्राचे महाआघाडीचे सरकारपण पोकळ पँकेजच्या घोषणा करणारे नाही. आम्ही थेट लोकांना मदत केली. महात्मा फुले योजनेतून लोकांवर उपचार केले,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण यातला तथ्यांश तपासला तर हाती फार थोडे लागते. महाराष्ट्रातील घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्यापेक्षा त्यांनी आजच्या फेसबुक लाइवमध्ये देवेंद्र फडणवीसांना उत्तर देणे पसंत केले. ते त्यांच्या नेहमीच्या भाषेत सडेतोड वगैरे होते. पण त्यात काही substance होता का, हे पाहायला गेले तर निष्कर्ष नकारात्मक येतो.

    म्हणे, महात्मा फुले योजनेतून रुग्णांवर मोफत उपचार केले. किती रुग्णांवर?, मूळात ही योजना कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी लागू केव्हा केली? तर बहुसंख्य कोरोनाग्रस्त उपचार घेऊन बाहेर पडल्यावर. त्यांची नेमकी आकडेवारी ना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, ना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी. सगळाच गोलमाल कारभार. आणि त्यातही महात्मा फुले योजनेचा पैसा सगळा राज्य सरकारचा थोडाच आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की ही योजना आयुष्ममान भारत योजनेची पूरक योजना आहे आणि त्याची आकडेवारी मोदींनी परवाच जाहीर केली आहे. १ कोटी लाभार्थी…!! यापैकी काही लाख लाभार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे उगाच उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी पाठ थोपटून घेण्यात मतलब नाही. श्रेय घ्यायचेच असेल, तर केंद्राबरोबर वाटून घ्यावे. उगाच रेटून बोलण्यात मतलब नाही.

    बरं त्यातही उद्धव ठाकरे सध्या जे बोलतायत ना, त्यामागचे logic ही हरवत चाललेलं दिसतयं. मागे काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजनांनी उद्धव ठाकरे यांना राणा भीमदेवी थाटाच्या भाषणांवरून टोकले होते. कोरोना हा रोग आहे. त्याचे निवारण करताना उगाच लढवय्या महाराष्ट्र वगैरे जाहीर सभेतली भाषणे करू नयेत, असे महाजन म्हणाले होते.

    त्यानंतर दोन फेसबुक लाइव झाली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमध्ये काही फरकच नाही. तीच जुनी शिवसेनेची लढाईची भाषा. त्यात आता आरोप – प्रत्यारोपांची भर. म्हणे, केंद्राने लाखो कोटी रुपयांची पँकेज वाटली. पण हाती काय आलं?. उद्धव यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं झालं तर, “देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी” उद्धव साहेब, महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारची झोळीच दुबळी असेल तर हाती काय लागणार? लागणार नाहीच, उघड आहे.

    पण खरे प्रश्न हे उद्धव ठाकरे यांच्या चमकदार फेसबुक लाइव पलिकडचे आणि त्यांना वरच्या परिच्छेदात दिलेल्या काव्यात्मक उत्तराच्या पलिकडचे आहेत.

    खरंच उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे केंद्राने लाखो कोटी रुपयांची पँकेज वाटली पण हाती काही लागले नाही ना…!! मग केंद्राकडे पैसा मागता कशाला? खुद्द उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांनी केंद्राकडे पैसे, निधी, मदत पँकेज असे शब्द वापरून डझनभर पत्रे पाठविली कशाला? पवार तर दर दोन – चार दिवसाला एक या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रे पाठवताहेत आणि विविध कारणांखाली पँकेजची मागणी करताहेत. हे उद्धव ठाकरे यांना समजत नाही काय? इकडे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करायला तिजोरीत पैसा नाही. विविध खात्यांच्या तिजोऱ्यांमध्ये खडखडाट आहे.

    त्यावर ठोस उपाय काही काढता येत नाही. केंद्राकडे पैसा मागण्याशिवाय पर्याय नाही, हे अजित पवारांनी लक्षात आणून दिले तर उद्धव ठाकरे – शरद पवार जोडगोळीने त्यांनाच “बाजूला ठेवले”… आणि वर केंद्रावरच टीकास्त्र सोडायला हे दोन्ही नेते तयार. केंद्रावर अनाठायी टीकाच करायची ना, जरूर करत राहा. पण मग महाराष्ट्राचे महाराष्ट्रातच भागवा ना…!! तेवढी तरी साफ नियत दाखवा ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे…!! पण नाही, तुम्ही रक्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात… पण पवारांचे शिष्य आहात ना… मग तुमची नियत साफ कशी राहील? त्यात खोट येणारच… यातच उद्धव ठाकरे यांच्या आजच्या फेसबुकक लाइवचे सार दडले आहे…!!

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!