विनय झोडगे
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलयं. या वेळी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करण्याचे साकडे घातलेय. या आधीच्या पत्रात पवारांनी साखर कारखान्यांच्या मदतीसाठी साकडे घातले होते, आता रिअल इस्टेटसाठी.
कळलं, पवारांचा श्वास नेमका कुठं अडकलायं तो…?? दोन्ही क्षेत्रे पवारांची खास आवडती. कारण त्यांच्या पक्षाला राजकीय आणि आर्थिक रसद तिथूनच पुरवली जाते. (अर्थात फक्त पवारांच्याच पक्षाला तिथून रसद पुरविली जाते, अशी अंधश्रद्धा बाळगण्याचे कारण नाही. इतरही पक्षांचे छोटे – मोठे नळ तिथे आहेत.) बहुतेक तिथले नळ बंद झाले असावेत किंवा नळ भविष्यात बंद होऊ नयेत, अशी तरी व्यवस्था पवार करत असावेत. पवारांचे हे एक बरं आहे, दोन्ही क्षेत्रांमधल्या विशिष्ट गोष्टी जेव्हा बाहेर येतात, त्यावेळी पवार त्याकडे लक्ष देत नाहीत. त्या क्षेत्रांमधील “व्यवहारांबद्दल” कोणी काही प्रश्न उपस्थित केले तर त्यांना पवार उत्तरे देत नाहीत.
किंबहुना ज्या बिल्डर कम्युनिटीने रिअल इस्टेट क्षेत्र inflation mode मध्ये नेऊन ठेवले होते, म्हणजे सामान्यांच्या भाषेत घरे, दुकाने, गाळे प्रमाणाच्या बाहेर महाग करून ठेवले होते, तेव्हा पवारांनी बिल्डर कम्युनिटीला काही सल्ला दिल्याचे एेकिवात नाही. उलट त्यांच्या पक्षाचा “मोठा गाळा” त्यातून निघत होता ना त्यावेळी म्हणून कदाचित ते गप्प असावेत तेव्हा.
पण बिल्डर कम्युनिटीच्या inflation mode economy मुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्या. मागणी त्यातून घसरली आणि बिल्डर कम्युनिटीने परवडणारी घरे बांधली नाहीत किंवा कमी बांधली, त्यावेळीही पवारांनी त्यांना “ग्राहकहिताचे” सल्ले दिले नाहीत. आधीचे जाऊ द्या. मध्यंतरी पवारांचे भाजपमधले लाडके नेते नितीन गडकरी यांनी बिल्डर कम्युनिटीला एक सल्ला दिला होता, “या अडचणीच्या वेळी येतील त्या किमतीला म्हणजे थोड्या कमी किमतीला घरे, दुकाने विकून टाका. Hold करून ठेऊ नका. पुढे आणखी कठीण काळ येऊ शकतो.”
पण पवारांनी त्यावर देखील काही भाष्य केले नाही. आणि आज बिल्डर कम्युनिटीच्या कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्राचा हवाला देत त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्र वाचविण्याचे मोदींना साकडे घातले आहे. त्यावेळी देखील साखर फेडरेशनचे पत्र पवारांनी आपल्या पत्राला जोडले होते. दोन्ही क्षेत्रांचा पवारांवर फार विश्वास आहे म्हणून तेही पवारांमार्फत पंतप्रधानांपर्यंत आपली पत्रे पोहोचवत असावेत. कदाचित “शिष्य” “गुरूचे” लवकर एेकेल असा त्यामागे हेतू असावा.
नाही म्हणायला अधून मधून MSME, उद्योग ही क्षेत्रेही पवारांनी पत्राद्वारे हाताळली आहेत. पण जोर साखरेवर आणि रिअल इस्टेटवर आहे, हे पवारांच्या पत्राचे उघड गुपित आहे. पवारांचा श्वास नेमका कुठं अडकतोय, हे यातून दिसू राहिले आहे…!!
एवढी पत्रे “गुरूंनी” “शिष्याला” पाठवली पण “शिष्याने” अजूनपर्यंत तरी त्यांची दखल घेतल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असावे याचे…??