आपला मेंदू हा जीवनातील अनेक भल्याबुऱ्या आठवणींचा खजिना असतो. आपली बुद्धीही मेंदूच्या स्मरणशक्तीवर मापण्यात येते. या आठवणी तसेच बुद्धीसंबंधीची स्मरणरूपी माहिती आपल्या मेंदूत कशी साठविली जाते, हे एक कोडेच आहे. हे आठवणींचे कोष आपल्या मेंदूत कुठे व कसे साठविले जात असतील, याचा उलगडा करणे हे मानवजातीपुढील आव्हान राहिलं आहे. या आठवणी ज्या प्रक्रियेद्वारे मेंदूत साठविल्या जातात त्या प्रक्रियेला आपण स्मरणशक्ती म्हणतो. आपल्या मेंदूत साठविल्या जाणाऱ्या या स्मरणकोषांच्या साठवणीच्या रहस्यावरील पडदा दूर सारत मेंदूतील स्मरणशक्तीचे नेमके रसायन उलगडण्यात इंग्लंडमधील तीन शास्त्रज्ञांना यश आले आहे. मेंदूतील स्मरणप्रक्रिया स्पष्ट करण्याच्या संशोधनासाठी टिम बिल्स, ग्रॅहॅम कॉलिनग्रीज तसेच रिचर्ड मॉरिस या तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांना मज्जाविज्ञानातील संशोधनासाठी देण्यात येणारा १० लाख युरोंचा प्रतिष्ठेचा न्यूरोसायन्समधील नोबेलच्या तोडीचा ब्रेन प्राईज पुरस्कारही देण्यात आला. मेंदूतील स्मरणप्रक्रिया ही मेंदूतील मज्जापेशींमधील अभिक्रिया तसंच मेंदूतील रसायनांवर आधारित असल्याचं या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून दिसलं आहे. Your brain is a treasure trove of many good and bad memories of life
स्मरणप्रक्रियेत दोन मज्जापेशींत निर्माण होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या बंधांमुळे स्मरणकोष घट्ट होतात, असं निरीक्षण या शास्त्रज्ञांनी संशोधन सादर करताना नोंदवले. मेंदूतील विशिष्ट भागात स्मरणकोष साठविले जातात, असा आजवरचा समज होता पण या स्मरणगाठी नेमक्या कशा बांधल्या जातात, ही प्रक्रिया या शास्त्रज्ञांनी अचूक उलगडली आहे. स्मरणकोषांच्या नोंदीमुळे मेंदूची रचना बदलते व ती सतत बदलत असते असं लंडनमधील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल रिसर्चच्या टिम बिल्स याचं मत आहे आणि हे बदल मज्जापेशींच्या साखळीत घडतात, असं आता या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. आश्चर्य म्हणजे, या संशोधनाची सुरूवात ४० वर्षांपूर्वी टिम व त्यांचे विद्यार्थी सहकारी तेरजे लोमो यांच्यासह नॉर्वेतील छोठ्या संशोधन संस्थेत झाली. मेंदूतील स्मरणप्रक्रियेवर संशोधन करताना प्रयोगशाळेत गुंगी दिलेल्या सशांच्या मेंदूतील मज्जापेशींच्या अभ्यासात टिम व तेरजे लोमो यांना तेव्हा आढळून आलं की दोन मज्जापेशी स्मरणप्रक्रियेत चेतविल्या जातात, त्यावेळी त्यातील बंध अधिक दृढ होत जातात. मेंदूतील स्मरणक्रियेदरम्यान मज्जापेशींचे बंध दृढ होतात, हा निष्कर्ष ब्लिस व लोमो यांनी सर्वप्रथम सप्रमाण सादर केला.