मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज काढल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. पण या पडसादाचा एक वेगळाच “राजकीय लाभ” वसंत मोरे नावाच्या मनसेच्या बाजूला काढण्यात आलेल्या पुणे शहराध्यक्षांना झाला…!! Raj Thackeray : What role did he play against Raj Thackeray …
गेले दोन दिवस वसंत मोरे यांच्या मराठी माध्यमांनी राज्य पातळीवर एवढ्या बातम्या चालवून घेतल्या की वसंत मोरे हे जणू महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे – पवार आणि राज ठाकरे यांच्या नंतरचे सर्वात महत्त्वाचे नेते आहेत, असे मराठी माध्यमांच्या बातम्यांमुळे वाटायला लागले…!!
वसंत मोरे यांनी फक्त राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर रुटीन पेक्षा वेगळे मत व्यक्त केले. ते मुस्लिम समाजातल्या काही कार्यकर्त्यांना भेटले. याच्या बातम्या नॉर्मल स्वरूपात आल्या असत्या तर काही वेगळे वाटले नसते. पण माध्यमांनी वसंत मोरे मुस्लिम कार्यकर्त्यांना भेटल्याच्या बातम्या राज्य पातळीवर रंगवल्या. वसंत मोरे यांच्या “नाराजीला” “बंडखोरीचे: स्वरूप माध्यमांनी दिले. वसंत मोरे वारंवार सांगत होते, राज ठाकरे यांच्या मूळ भूमिकेला आपला विरोध नाही. परंतु, काही मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले. त्यांच्याशी बोलणे मला योग्य वाटले म्हणून मी बोललो. पण माध्यमांनी वसंत मोरे यांची बंडखोरी ही मनसेची राज्य पातळीवरची बंडखोरी आहे, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मोरे यांची राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बद्दलच्या जेवढ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या नसतील तेवढ्या बातम्या वसंत मोरे यांच्या हकालपट्टीच्या माध्यमांनी दिल्या.
– तोपर्यंत वसंत मोरे होते कुठे??
एरवी वसंत मोरे मनसेचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या बातम्या स्थानिक पातळीवर पुण्याच्या पेपरांमध्ये आतल्या पानावर येत असत. त्याची दखल वसंत मोरे यांच्या प्रभागात घेतली जात असे. पुणे शहर पातळीवर वर्षा-दीड वर्षात 2 – 4 बातम्या यापेक्षा वसंत मोरे यांना मराठी माध्यमांनी गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वही दिले नव्हते. पण राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या भूमिकेविरोधात वसंत मोरे यांनी किंचित आवाज उठवला आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याच्या बातम्या माध्यमांनी आपल्या हाताशी असलेले आणि नसलेले राजकीय रंग देऊन रंगवल्या…!!
वसंत मोरे यांचे पुण्याच्या राजकारणातली एकूण वजन माध्यमांनी एवढे वाढवले की त्या वजना खालीच ते दडपून जात आहेत की काय असे वाटायला लागले आहे…!!
– सगळे चाललेय राष्ट्रवादीसाठी!!
राज ठाकरे यांना टीआरपी आहे आणि म्हणून त्यांच्या पक्षाच्या बातम्या चालवल्या असे माध्यमे म्हणत असली तरी त्या पलिकडे जाऊन माध्यमांची एक “वेगळी चलाखी” यातून दिसते. मनसेचा नेत्या रूपाली पाटील ठोंबरे मनसे सोडून राष्ट्रवादीत गेल्या आहेत. त्यालाच अनुसरून वसंत मोरे राष्ट्रवादीची वाट धरणार. वसंत मोरे यांना शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांची ऑफर आहे. त्यांना डायरेक्ट मातोश्रीवर बोलावून घेण्यात आले आहे, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. स्वतः वसंत मोरे यांची स्टेटमेंट आहेत, त्या स्वरूपात देण्यापेक्षा ती फार मोठ्या प्रमाणावर रंगवून दिली जात आहेत. हीच यातली वस्तुस्थिती आहे.
त्यातही राष्ट्रवादीला अनुकूल ठरेल असा नॅरेटिव्ह ही माध्यमे गेली कित्येक वर्षे चालवत आहेत. यात रोहित पवार यांचे पंतप्रधानांपासून राज ठाकरें पर्यंतच्या नेत्यांना दिलेले सल्ले, त्यांनी केलेली पावभाजी, हवा येऊ द्या, किचन कलाकार या कार्यक्रमात सामील झालेले रोहित पवार या बातम्या मराठी माध्यमांनी “पॅकेजी जबाबदारीतून” दिल्या आहेत, हे उघड सत्य आहे. सुप्रिया सुळे देखील “राष्ट्रीय महत्त्वाचे” विषय संसदेत लावून धरतात. पवारांची प्रत्येक खेळी ही “पॉवरफुल खेळी”च असते हे मराठी माध्यमे याच “पॅकेजी जबाबदारीतूनच” चालवत राहतात…!! तशाच वसंत मोरे यांच्या बातम्या चालवल्या गेल्याचे दिसून येत आहे…!!