शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव मेंदूच असतो. त्याचे कार्य इतके अव्याहतपणे कसे चालते याचे कोडे अजूनही जगभरातील तज्ञांना उलगडलेले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून येणाऱ्या संवेदनांची क्षेत्रे मेंदूच्या संवेदी बाह्यांगात असतात. संवेदी बाह्यांगाचे एक क्षेत्र कायासंवेदी बाह्यांग असते. त्वचेतील संवेदी ग्राही पेशींद्वारे स्पर्श, दाब, वेदना, कंपने, तापमान यांच्या संवेदनांचे रूपांतर चेता संदेशात केले जाते आणि ते संदेश मेरुरज्जूतील चेतापेशींद्वारे कायासंवेदी बाह्यांगाकडे नेले जातात. तसेच सांध्यांच्या स्थितीबद्दलची माहिती सांध्यांपासून या बाह्यांगाकडे पोहोचते. सूक्ष्म, हळूवार स्पर्श, कंपने, सांध्यांची स्थिती यांसंबंधी माहिती वाहून नेण्यासाठी खास संवेदी मार्ग असतो. How the brain picks up touch, taste, smell
आणखी एका वेगळ्या मार्गाद्वारे वेदना, तापमान, स्थूल, जोरदार स्पर्श यांबाबतची माहिती वाहून नेली जाते. डोळ्यांतील दृष्टीपटलावर प्रकाश पडणे हा दृष्टी ज्ञानाचा पहिला टप्पा असतो. दृष्टीपटलातील प्रकाशग्राही पेशी प्रकाशीय संवेदांचे रूपांतर विद्युत चेता संदेशात करतात. हे संदेश दृष्टीपटलाला जोडलेल्या दृष्टीचेताद्वारे पश्चकरोटी पालीतील दृक् बाह्यांगाकडे पाठवितात. ऐकणे आणि शरीराचा तोल सांभाळणे या क्रियांची सुरुवात आंतरकर्णापासून होते. तोल सांभाळताना आंतरकर्णातील अंतर्लसीका द्रवाची हालचाल होते, तर आवाजामुळे अस्थिकेद्वारे कंपने निर्माण होतात. त्यामुळे चेता संदेश निर्माण होतात आणि ते श्रवण-प्रघाण चेताद्वारे श्रवण बाह्यांगाकडे वाहून नेले जातात. गंधाची जाणीव नासा गुहिकेतील ग्राही पेशींद्वारे होते. ही माहिती घ्राण चेताद्वारे घ्राण कंदाकडे आणि तेथून घ्राण बाह्यांगाकडे नेली जाते. रुचीची जाणीव जीभेच्या ग्राही पेशींपासून होते. ही माहिती आननी चेता आणि जिव्हाग्रसनी चेता यांच्याद्वारे मस्तिष्क स्तंभाकडे जाते. तेथून ती चेतकामार्फत रुची बाह्यांगाकडे पोहोचते. अशाप्रकारे आपण सतत कार्यतत्पर रहात असतो.