भाषेसंबंधी प्रक्रियांची बहुतेक कार्ये मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्यांगात होतात. बाह्यांगाच्या साहचर्य क्षेत्रातील दोन क्षेत्रे, व्हर्निके क्षेत्र आणि ब्रॉका क्षेत्र मानवाच्या भाषेकरिता महत्त्वाची असतात. व्हर्निके क्षेत्र हे नाव कार्ल व्हर्निर्के या जर्मन वैज्ञानिकाच्या नावावरून, तर ब्रॉका क्षेत्र हे पी. पी. ब्रॉका या फ्रेंच वैज्ञानिकाच्या नावावरून पडले आहे. आपण जेव्हा शब्द ऐकतो तेव्हा कानावर पडलेल्या ध्वनितरंगांचा अर्थबोध व्हर्निके क्षेत्र करते.Brain Discovery:How your brain controls language
जेव्हा शब्द वाचला जातो तेव्हा प्रमस्तिष्कावरील संवेलक दृश्य प्रतिमेचा संबंध योग्य ध्वनितरंगांशी जोडतो आणि त्याचे व्हर्निके क्षेत्र अर्थबोध करते. ब्रॉका क्षेत्र शब्दाच्या उच्चारांसाठी लागणाऱ्या स्नायूंना सूचना देते. या सूचना प्रेरक क्षेत्रात जातात व तेथून संबंधित स्नायूंना हालचालीचे संदेश मिळतात. मेंदूच्या प्रत्येक गोलार्धाची शरीराच्या अर्ध्या भागाबरोबर आंतरक्रिया होत असते.
उदा., मेंदूचा डावा भाग शरीराची उजवी बाजू, तर मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो. मेंदूकडून मेरुरज्जूकडे निघालेल्या प्रेरक चेता आणि मेरुरज्जूकडून मेंदूकडे येणाऱ्या संवेदी चेता मस्तिष्क स्तंभामध्ये एकमेकांना ओलांडून बाजू बदलतात. दोन्ही डोळ्यांपासून आलेल्या नेत्र चेता या नेत्रचेताफुली बिंदूत एकत्र येतात आणि तेथे दोन्ही चेता अर्ध्यात विभागल्या जाऊन आणि प्रत्येकीचा अर्धा भाग दुसरीच्या अर्ध्या भागाला मिळतो. डोळ्यांच्या डाव्या अर्ध्या भागातील चेता मेंदूच्या डाव्या भागाकडे आणि उजव्या अर्ध्या भागातील चेता मेंदूच्या उजव्या भागाकडे जातात. दृष्टीच्या क्षेत्रातील डाव्या (उजव्या) भागाची प्रतिमा दृष्टीपटलाच्या उजव्या (डाव्या) भागात पडतात.
परिणामी दृष्टीक्षेत्राच्या डाव्या बाजूकडून येणारे दृष्टी-आदान मेंदूच्या उजव्या भागावर पडतात आणि उजव्या बाजूकडून येणारे दृष्टी-आदान मेंदूच्या डाव्या भागावर पडतात. अशा प्रकारे उजव्या मेंदूला शरीराच्या डाव्या बाजूकडील संवेदांची, तर डाव्या मेंदूला शरीराच्या उजव्या बाजूकडील संवेदांची माहिती मिळते. मेंदूची डावी आणि उजवी बाजू समान असली, तरी त्यांची कार्ये समान नसतात. जसे, डावी ललाटपाली भाषेसाठी महत्त्वाची असते. या भागातील भाषासंबंधित क्षेत्राची हानी झाली तर भाषा समजणे तसेच बोलणे शक्य होत नाही. मात्र उजव्या गोलार्धात तशाच क्षेत्राची हानी झाली तर भाषेचा वापर करताना किरकोळ दोष निर्माण होतात.