डायटिंग करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तुम्ही दीर्घ काळापासून विशिष्ट डायट फॉलो करत असाल आणि तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर अशा डायटमध्ये केल्या जाणाऱ्या काही चुका त्यास कारणीभूत ठरतात. याबाबत अधिक शास्त्रीय माहिती जाणून घेऊ या. असे म्हटले जाते की, तुम्ही डायटवर असाल तर पनीर खाणे चांगले असते. कारण यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. मात्र, पनीर फॅट युक्त दुधापासून बनलेले असेल तर ते शरीराला फॅट शिवाय कोणतीच पोषक द्रव्ये देत नाही. त्यामुळे तुम्ही पनीर खरेदी करताना त्यात कोणती पोषक द्रव्ये किती प्रमाणात आहेत, हे अवश्य पाहा. The secret of science: Be careful when dieting
पनीर कच्चे खाल्ले तर अधिक चांगले हेही लक्षात ठेवा. तुम्ही मित्रांसोबत शीतपेयांऐवजी ज्यूस किंवा फळांचा रस घेत असाल तर ते फायद्याचे ठरणार नाही. फळांच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ज्यूसमध्ये स्वीटनरचे प्रमाण अधिक असते. तुम्हाला ते पौष्टिक वाटत असेल, परंतु ते शरीराला पुरेशी पोषक द्रव्ये देण्यातही समर्थ नसते. त्यामुळे ज्यूस पिण्याऐवजी फळेच खावीत. फिरायला गेल्यावर किंवा सिनेमा पाहताना समोसे किंवा पास्ता खाण्यापेक्षा पॉपकॉर्न चांगला पर्याय असल्याचा विचार अनेक जण करतात. मात्र, बाहेर मिळणाऱ्या पॉपकॉर्नमध्ये मीठ आणि लोणी अधिक असते, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. त्यापेक्षा कमी तेल-मीठातील पॉपकॉर्न घरीच खावेत. बाजारात मिळणारे पॉपकॉर्न खाण्याचे टाळले पाहिजे. तुम्ही डायटिंग करत असाल आणि सलाड जास्त खात असाल तर त्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी ठेवलेलेच बरे. जास्त मीठ टाकल्यामुळे सलाडमधील पोषक द्रव्ये कमी होतात. अशाच प्रकारे फ्रूट सलाडसाठीही ताज्या फळांचा वापर करावा. सलाडवर जास्त सजावट करणेही टाळले पाहिजे.