कोरोनामुळे सध्या शाळांना सुट्टीच लागल्यासारखे चित्र आहे. मुलांना अभ्यास नाही की परीक्षा त्यामुळे मुले घरात एक तर मोबाईलवर आहेत किंवा टीव्हीपुढे. सध्या घरात प्रत्येकाकडे मोबाईल असतो. इंटरनेट असते. त्यामुळे कुटुंबातील पालकापुढे मोठी समस्या फेर धरून नाचतेय ती म्हणजे मुलांनी इंटरनेट वापरणे चांगले की वाईट. चारपैकी तीन पालकांना इंटरनेट मुलांसाठी सुरक्षित वाटत नसल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. असं असलं तरी इंटरनेट वापरणाऱ्या मुलांचं वय कमी कमी होत चाललं आहे. लंडनच्या एका वेबसाइटने हा अभ्यास केला आहे. यात त्यांनी दोन हजार ब्रिटिश पालकांना सामावून घेतले. वयाची सहा वर्षे होताच जवळपास 76 टक्के मुलांना स्मार्टफोनसारख्या साधनांच्या माध्यमातून इंटरनेट वापरण्याची मुभा मिळते. Brain Search and Enlightenment: Also pay close attention to children’s internet usage
दहा वर्षांच्या मुलांमध्ये हे प्रमाण 92 टक्के तर 12 वर्षाच्या मुलांमध्ये 96 टक्के इतके आहे. सहा ते बारा वर्षे वयोगटांतील मुलांच्या पालकांपैकी फक्त एक चतुर्थांश पालकांनाच मोठ्यांच्या देखरेखीशिवाय मुले ऑनलाइन असली तरी हरकत नाही, असं वाटते. मुलांना सुरक्षित इंटरनेट मिळाले आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे, अशी भावना 95 टक्के सहभागी पालकांनी व्यक्त केली. हे सर्वेक्षण जरी परदेशातील असले तरी सध्या आपल्याकडेही जवळपास अशीच परिस्थीती आहे. ज्या वयात मुलांना फारशी जाण नसते. चांगले, वाईट यातला फरक कळत नसतो त्याच काळात त्यांना इंटरनेट हाताळायला द्यायचे का हा प्रश्न सध्या तमाम पालकांना भेडसावत आहे. अशा वेळी प्रत्येक पालकाने सजग राहिलेच पाहिजे. अशा वेळी मुलांना इंटरनेट माहितीच नाही असे होवूनही चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना इंटरनेट वापरू दिले पाहिजे. पण ते मुला- मुलीचे वय लक्षात घेवून. त्यामुळे आता प्रत्येकाने दिवसभरात किती वेळ इंटरनेट वापरायचे हे ठरवले पाहिजे. तुम्ही जर पालक असाल तर आपल्या मुलांना ते किती वेळ वापरायचे हे सांगितलेच पाहिजे. तसेच ते जेव्हा नेट वापरतात त्यावेळी त्यांच्याकडे लक्षही दिलेच पाहिजे. यातूनच त्यांच्या मेंदूची मशागत होणार आहे हे लक्षात घ्या.