विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोनाने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले. प्रत्येक भारतीयाने सजग राहिले पाहिजे. मी आपल्याकडे जे मागितले ते सर्व देशवासीयांनी आशीर्वादरुपाने दिले. मी १३० कोटी जनतेला काही मागतोय. मला तुमचे काही आठवडे पाहिजेत. तुमचा वेळ पाहिजे. कोरोना व्हायरसवर अजून लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाग्रस्त देशांमध्ये अचानक रुग्णांची संख्या विस्फोटासारखी वाढली. सर्व देशांनी आपापल्या परीने कोरोनाचा मुकाबला केला. आपल्यासारख्या विकसनशील देशावर वैश्विक महामारीचे संकट सोपे नाही. देशवासीयांनी संयम आणि संकल्प करावा. केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे. स्वत: कोरोनाग्रस्त होऊ नका. इतरांना संक्रमित करू नका. संयम बाळगा. गर्दी करू नका. कोरोनापासून बचावासाठी हे आवश्यक आहे. आपण निष्काळजी राहू नका. आपण सावधानता बाळगा. येत्या काही आठवड्यांसाठी घरातून बाहेर पडू नका. घरातूनच काम करा. सभा, समारंभ सध्या करू नका. जनता कर्फ्यू पाळा. या रविवारी २२ मार्च रोजी सकाळी सातपासून सायंकाळी ९ पर्यंत जनता कर्फ्यू पाळा. २२ मार्चचा हा प्रयत्न आपल्या संकल्पाची परीक्षा असेल. सर्व सामाजिक, सार्वजनिक संस्थांनी जनता कर्फ्यूचा संदेश सर्वांपर्यंत पोचवावा. आपण सर्वांनी हे प्रयत्न करा. या रविवारी अत्यावश्यक सेवा पुरविणार्या लोकांचे प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. आपण सर्वांनी त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. रविवारी सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटपर्यंत आभार व्यक्त करा. ५ वाजता सा़यरन वाजेल. सेवा परमो धर्म: पाळणारा हा देश आहे. डॉक्टरांकडून फोनवर सल्ला घ्या. शस्रक्रिया आवश्यक नसेल तर एका महिन्यानंतरची तारीख ठरवा. अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक टास्कफोर्स स्थापन केला आहे. देशातला गरीब, मध्यमवर्गीयाला आर्थिक फटका बसला आहे. लोकांचे पगार कापू नका.