विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मास्क आणि सॅनिटायझर्स यांचा समावेश जीवनावश्यक वस्तुंमध्ये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या वस्तुंच्या किमतींवरही केंद्र सरकारने नियंत्रण आणले आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली.
पासवान यांनी सांगितले, की कोरोना विषाणूच्या (कोवीड-19) उद्रेकानंतर भारतीय बाजारपेठांमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे यांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे.
जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत धाग्यांचा वापर करुन तयार केलेल्या दुपदरी आणि तीनपदरी सर्जिकल मास्कच्या किमती 12 फेब्रुवारी रोजी जितक्या होत्या तितक्याच राहतील. मात्र तीनपदरी मास्कची किंमत मात्र किमान 8 ते कमाल 10 रुपये प्रती एवढी निर्धारीत करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पासवान म्हणाले, की 200 मिलिलीटर सॅनिटायझरची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. इतर आकारमानाच्या बाटल्यांनाही हाच दर लागू असेल. येत्या 20 जूनपर्यंत संपूर्ण देशात मास्क आणि सॅनिटायझरच्या याच किमती बंधनकारक असतील.
दरम्यान, कोरोना विषाणूने आतापर्यंत जगात अकरा हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून भारतातील बळींची संख्या पाचवर गेली आहे. भारतातील कोरोनाबाधीतांची संख्या पावणेतीनशेच्या घरात आहे. तूर्तास आटोक्यात असणारी कोरोनाची साथ पसरू नये यासाठी केंद्र सरकारचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत.