विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शाहीनबागेत चाललेले आंदोलन आज सकाळी पोलिसी कारवाई करून गुंडळले. अपप्रचाराच्या या आक्रस्ताळ्या आंदोलनाचा असाच करुण अंत होणे अपरिहार्य होते. दिल्लीसह देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. पोलिसांनी आंदोलकांना शाहीनबाग रिकामी करण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती धुडकावली. त्यानंतर पोलिसी कारवाई करत अर्ध्या तासात शाहीनबाग रिकामी करण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. अर्थात आज सकाळी जे घडले ते अपरिहार्य होते. एक तर संसदेने बहुमताने संमत केलेल्या सीएए कायद्याविरोधात हे आंदोलन अपप्रचारातून उभे राहिले होते. आंदोलन १०० दिवसांपेक्षा अधिक चालविले होते. शाहीन बागेत बसलेले बाहेरच्या शक्तींच्या हातातले खेळणे असल्यासारखे आंदोलन चालवत होते.
दिल्लीतील निवडणूक संपल्यावर त्याचे राजकीय महत्त्व संपुष्टात आले होते. तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नाही. देश एकजुटीने कोरोना विरोधात लढत असताना आंदोलन चालू ठेवल्याने उरली सुरली सहानुभूती देखील आंदोलकांनी गमावली होती. त्यामुळे पोलिसी कारवाई करून शाहीनबाग गुंडाळावी लागली. मूळात भूसभुशीत पायावर उभ्या केलेल्या या आंदोलनाचा असा करुण “करोनामय” अंत होणे अपरिहार्य होते.