विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
ठाकरे यांचे आवाहन :
• एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते.
• खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.
• काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली.
• देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे
• जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील.
• सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील
• प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.
• सर्व माध्यमांना देखील धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात
• ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
• घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत
• ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत.