विशेष प्रतिनिधी
भोपाळ : काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर आज झाला. मध्ये प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार कोसळले. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप करत राजीनामा देत असल्याची यांची माहिती दिली.
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलें. दुपारी १ वाजता राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सोपविला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मी कधीही सौदेबाजीचे राजकारण केले नाही. मी नेहमी स्वच्छ राजकारण केले. पूर्ण मीडिया आणि जनतेला माहिती आहे की, १५ वर्षाच्या कार्यकाळात कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. मी कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला फोन केला नाही. कधी कोणासाठी शिफारस केली नाही. फक्त विकासाचं काम केलं,” असे कमलनाथ यांनी यावेळी सांगितलं.
भाजपाने मध्य प्रदेशातील जनतेसोबत विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. ज्योतीरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेश सरकार अस्थिर झाले होते. आज पाच वाजेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार होते. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ‘लोकांनी मला पाच वर्षांसाठी बहुमत दिले होते. पण आमच्याविरोधात षडयंत्र रचत भाजपाने जनतेला धोका दिला आहे,’ असे सांगितले. कमलनाथ यांनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.
यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, ‘आपण कोणत्याही खोट्या घोषणा केल्या नव्हत्या. भाजपाला १५ वर्ष मिळाले आणि मला १५ महिने मिळाले,’ असेही यावेळी त्यांनी सांगितलं. सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. “आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. भाजपाने कितीही अडथळे आणले तरी आम्हा विकासाच्या मार्गावर चालत राहणार. जनतेचा आमच्यावर विश्वास असून जनतेचं प्रमाणपत्र मिळेल. आम्हाला भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.